#सेफ्टी फर्स्ट!! (सुरक्षिततेचा मूलमंत्र)

#सेफ्टी फर्स्ट!! (सुरक्षिततेचा मूलमंत्र)

स्मृती कुळकर्णी-आंबेरकर

होणाऱ्या घटना चुकत नाहीत! टाळताही येत नाहीत. पण १२ गावचे (Exactly, ४ खंड आणि २४ देशांचे) पाणी प्यायलेली सोलो ट्रॅव्हलर म्हणून मी काही गोष्टी नक्की सुचवू इच्छिते! अत्याचार कोणावरही होतात, कुठल्याही वयात होतात, मुलगा-मुलगी दोघांवरही होतात पण मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे म्हणून खास टीप्स

Part 1
Domestic Safety –

★ एखादा वाईट प्रसंग, घटना #अनोळखी_ठिकाणीच होते असं नाही. बरेचदा आपल्या पायाखालच्या, नेहमीच्या रस्त्यावरही होऊ शकते. Don’t be Predictable!!! तीच वेळ, तोच रस्ता, तीच पार्किंगची जागा याचं रोजचं दळण दळू नका!! घरून बाहेर पडल्यावर १०० पावलं वाचवून तुम्ही एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचत असाल तर आठवड्यातून २ दिवस लांबचा रस्ता घ्या. १० मिनिटं लवकर निघा. मध्ये एखादं काम असेल तर ते काम करून वाट वाकडी करून इच्छित स्थळी पोहोचा! ऑफिसच्या ठिकाणी कधीतरी वेगळ्या ठिकाणी गाडी लावा. थोडक्यात, घरच्यांव्यतिरिक्त कोणालाही तुमची वेळ, जागा याचे वेळापत्रक माहित असता कामा नये.

★ कुठे निघालोय याची माहिती घरच्यांना प्रत्यक्ष, फोनवरून किंवा तेही शक्य नसेल तर Sms, Whatsapp वर कळवा.

★ रस्त्यावरून चालताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फोनवर खाजगी, वैयक्तिक बोलणे टाळा. कुठे जाणार आहात किंवा कुठे राहणार आहात याची माहिती द्यायची असेल तर text मेसेज पाठवा. फक्त भिंतीला कान नसतात तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना असतात आणि काही लोकं याचा गैरवापर करू शकतात.

★ उबर, ओला याचे लोकेशन शेअर करता येते. कारमध्ये बसल्यावर शक्य असेल तर घरच्यांबरोबर तुमचा रूट आवर्जून शेअर करा.

★ फुकट किंवा कमी पैश्यांमध्ये कोणी तुम्हाला लिफ्ट देत असेल तरीही हा पर्याय निवडू नका. (ईस्थर अनुया हिची २०१४ सालची केस यावर बेतलेली आहे.)

★ क्षुल्लक वाटणारी पण महत्त्वाची गोष्ट. बुक केलेल्या कारमधून प्रवास सुरु झाल्यावर मुली कानात गाणी लावून बिनधास्त झोपून जातात. कारमध्ये एकट्या प्रवास करत असाल तर काहीही करून जाग्या आणि सतर्क राहा. (सगळेच ड्रायव्हर्स वाईट असतात असे नाही, पण हलगर्जीपणा चांगला नाही!)

★ फोन लवकर डिस्चार्ज होत असेल तर पोर्टेबल चार्जर सोबत घेऊन फिरा. तो वेळोवेळी चार्ज असेल याकडे लक्ष द्या. २५% बॅटरी असताना तसाच फोन घेऊन निघायची रिस्क घेऊ नका. २०% बॅटरी झाली तर पटकन उतरते आणि अगदी ५ मिनिटांमध्येही फोन बंद पडू शकतो.

★ रस्ता मोकळा असेल किंवा एखाद्या सुनसान गल्लीमध्ये शिरलात तर तुमचे पाचही सेन्स ऑर्गन्स जागरूक असू द्या. डोळे (सतर्क), कान (मोकळे), नाक (गंध जाणवू शकेल), हात (मोकळे) आणि सगळ्यात महत्त्वाचे डोके (#विचारमुक्त)! कानात एअरफोन घालून गाणी ऐकत चालू किंवा स्कुटी वगैरे ड्राईव्ह करू नका. समोरून कोणी आलं किंवा मागून कोणी पाठलाग करतोय असा संशय आला तरी मोकळ्या हातांनी मुकाबला करू शकाल याची तयारी ठेवा.

★ अनोळखी ठिकाणी अंधार झाल्यावर शक्यतो जाणे टाळा.

★ तुमच्या ओळखीचा, नेहमीचा रस्ता असला तरी रस्त्यावरची लोकं, उभे राहणारे टवाळखोर लोकं यांच्यापासून आपल्याला काही होणारच नाही अशारितीने बिनधास्त राहू नका. (याचा अर्थ असा नाही, घाबरून राहा, पण ती लोकं सतत दिसत असतील तर सजग राहा.)

★ काळजी घेऊनही पाठून, समोरून हल्ला झाला तर बचावाच्या काही बेसिक टेक्निक शिकून घ्या. डोळे, जबडा, सेंटर पॉईंट अश्या जागांवर जोरावर मुक्का मारून तात्पुरती सुटका करून घ्या. हातपाय गाळून घाबरून धीर सोडू नका. नखं हे आपले हत्यार आहे. प्रसंग पडला तर चावा, नखं रुतवा, केस खेचा, त्यांच्या कानात जोरात किंचाळा पण स्वतःची सुटका करून घेण्याचे ध्येय ठेवा!

★ महिला सुरक्षिततेसाठी अनेक ऍप्स आहेत. असुरक्षित वाटलं तर लगेच त्याचा वापर करा. काही घडेल याची वाट बघू नका.
– Pratisaad (ASK) (महाराष्ट्र पोलिस)
– SOS stay safe
– Women safety shield
– Nirbhaya : Be Fearless
– CitizenCOP
यापैकी कोणतेही app डाऊनलोड करून ठेवा.

★ हल्ला झालाच तर महिलांच्या सेफ्टीकरिता बरीच प्रोडक्टसही बाजारात उपलब्ध आहेत. सतत एकटीने प्रवास करावा लागत असेल तर यापैकी कुठलेही एक साधन पर्समध्ये कायम ठेवावे.
– Women Safety electric torch
– Pepper Sprey
– Automatic Alarm Watch
हे सगळे ऑनलाईन मिळते.

★ Last but not the least
Be Alert – Be Safe !!

या भागात आपण डोमेस्टिक सेफ्टीबद्दल जाणून घेतलं पुढच्या भागात आपण International and overall safety बद्दल जाणून घेऊया.

© स्मृती कुळकर्णी- आंबेरकर
१ डिसेंबर २०१९