
पिंपरी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अनेकांनी पुस्तक, चित्रपट, मालिका किंवा इंटरनेटच्या माध्यमातून वाचला, ऐकला आहे. मात्र, या इतिहासाच्या पाऊलखुणा प्रत्यक्ष अनुभवता याव्यात, तसेच गडकिल्ल्यांची माहिती व पाहणी तरूणांना करता यावी. यासाठी शिवशंभु प्रतिष्ठानच्या सहाय्याने व सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर यांच्या वतीने शिवनेरी किल्ला मोहिम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी तरूणांना शिव इतिहासाचे धडे देत, गडावर स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले.
या मोहिमेत सुनिल तात्या पालकर, सुनीता चव्हाण, अरुण आब्रे, विजय सुतार, प्रदीप बांद्रे यांसह सुमारे ७० शिवभक्त सहभागी झाले होते. त्यामध्ये सुनिल तात्या यांनी आपल्या पाच महिन्याच्या नातवालाही सहभागी केले होते.
पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरातून तरूणांनी शिवनेरी किल्ल्यावर पोहचत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा या किल्ल्यावर जन्म झाल्याने या किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवभक्त येत असतात. त्यामुळे गडाची साफसफाई जरूरीचे असते. या अनुषंगाने या मोहिमेत सहभागी झालेल्या शिवभक्तांनी गडावरील प्लास्टिक बाटल्या, पिशव्या गोळा करत स्वच्छता अभियान राबवले.
तसेच लहान बालकांचे सांस्कृतीक कार्यक्रमाचा आनंद घेत वृक्षारोपण करत निसर्ग संवर्धनात मोलाचा सहभाग घेतला. त्याचबरोबर युवकांना महारांजांचे थोर विचार संबोधीत करत पोहाडे, दानपट्टा, तलवार बाजी आदींचे धडे देण्यात आले. गडावर स्नेहभोजनाचा आस्वाद घेत या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांनी गडाच्या आठवणी आपल्या स्मृतीत साठवत ही मोहीम उत्साहात पार पाडली.
