देशभरातील दुकाने सुरू होणार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडची बंदच राहणार

देशभरातील दुकाने सुरू होणार, पुणे आणि पिंपरी-चिंचवडची बंदच राहणार
  • केंद्र सरकारचा मोठा निर्णय
  • मास्क बंधनकारक, ५० टक्के कर्मचारी, सोशल डिस्टन्सिंगचे बंधन

मुंबई : देशभरात लॉकडाऊनमध्ये आजपासून मॉल्स वगळता इतर दुकानदारांना आपली दुकानं सुरु करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स वगळता इतर दुकानदारांना लॉकडाऊनमधून सवलत दिली असली तरी ही सवलत देताना काही अटी देखील घातल्या आहेत. मास्क बंधनकारक, ५० टक्के कर्मचारी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या अटींसह दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. त्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील दुकाने तुर्तास सुरू होणार नाहीत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रेसनोटनुसार, गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. परंतु कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. तसंच शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बाजारपेठांमधील दुकानं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसंच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल.

मद्य विक्री करणाऱ्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचंही स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. सलून आणि ब्युटी पार्लर्स देखील बंद राहणार आहेत. तर ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे, असंही सरकारनं स्पष्ट केलंय.

महत्वाचं म्हणजे या सवलती हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोनमध्ये लागू नाहीत. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने या शहरांतील दुकाने सुरू होणार नाहीत. आतापर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला अशीच दुकानं सुरू होती. आता त्यात बदल करुन इतर दुकानं सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे

  • ग्रामीण भागात शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने सुरु होतील.
  • शहरी भागात एकेकटी दुकाने, मॉल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भाग नसलेली कोपऱ्यावरची दुकाने, रहिवासी सोसायट्यातील दुकाने उघडी राहतील.
  • तर मार्केट एरियातली, मॉल्स आणि मॉलमधील दुकाने बंदच राहतील.
  • ऑनलाईन ई कॉमर्स कंपन्याही फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच डिलीव्हरी करु शकतात.
  • लॉकडाऊन दरम्यान रेशन, भाजीपाला आणि फळांच्या दुकानासह केवळ आवश्यक वस्तू असलेली दुकाने उघडण्याची परवानगी आधीपासूनच आहे.
  • दुकाने केवळ ५० टक्के कर्मचार्‍यांसह आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालून उघडता येऊ शकतात.