काळेवाडी : नागरिकांशी असलेल्या सामाजिक व सलोख्याच्या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते व काळेवाडीतील विद्यादीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अक्षय गंगाराम माने यांनी प्रभाग क्रमांक २२ मध्ये सुमारे ५०० किलोग्रॅम तिळगूळ वाटप केले. मकरसंक्रांती निमित्त डॉ. माने यांनी राबवलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रभागातील विविध प्रश्नांवर मनसोक्त चर्चा केली.
मकरसंक्रात या स्नेहवर्धक सणाचे आधुनिक अंग म्हणजे शुभेच्छापत्रांची देवाणघेवाण. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात कागदावरील शुभेच्छांची जागा सोशल मिडियाने घेतली असली तरी शाब्दिक शुभेच्छांसोबत तिळगुळ देणे आपुलकीच्या दृष्टीने गरजेचे आहे. या भावनेतून डॉ. अक्षय माने यांनी तिळगूळ वाटपाचा उपक्रम राबविला.
या निमित्ताने प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना अनेक नागरिकांनी त्यांच्याशी प्रभागातील विविध प्रकारच्या समस्या व प्रभागाच्या विकासासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी प्रभागात नवीन व महत्वाकांक्षी चेहऱ्याला संधी देण्याचा नागरिकांचा एकंदरीत सुर असल्याचे जाणवले. असे डॉ. माने यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले.
दरम्यान, डॉ. माने यांनी कोरोना महामारीच्या अनुशंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून हा उपक्रम राबविला. तसेच नागरिकांनी या कोरोनाबाबत विनाकारण भीती न बाळगता योग्य ती काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन डॉ. माने यांनी यावेळी केले.