नव्या पिढीची जबाबदारी…

नव्या पिढीची जबाबदारी...

चंद्रकांत झटाले

आजची पिढी मग ती सुशिक्षित असो की अशिक्षित ती कोणत्याही विषयावर प्रचंड आक्रमक होताना दिसत आहे. त्यांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि कानांनी ऐकू येणाऱ्या परिस्थितीवर विश्वास न ठेवता, मीडिया किंवा राजकीय नेते-पक्ष काय सांगतात त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. ही पिढी अचानक भरकटली की पद्धतशीरपणे भरकटविली गेली? या पिढीची जबाबदारी काय? या सर्वांवर चिंतन झालं पाहिजे.

या देशातील युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. फक्त त्या उर्जेला योग्य दिशा देण्याची गरज आहे. ही दिशा देतांना त्यांना त्यांच्याच पद्धतीने सांगितले जाणे गरजेचे आहे. ज्यांच्या हातात उद्या आपला देश जाणार आहे ती नवीन युवा पिढी आजच्या परिस्थितीत अनेक विषयांबाबत गोंधळलेली दिसते. काय खरं? काय खोटं? हे पडताळून पाहण्यात कमी पडते आहे. आजच्या पिढीचे आदर्श देखील आक्रमक असणारे नेते आहेत. नेत्यांची दूरदृष्टी-प्रगल्भता, अभ्यास, कृतिशीलपणा ह्या गोष्टी दुय्यम ठरून फक्त आणि फक्त बोलणे आणि जाहिरातीवर ही पिढी स्वतः ला लुटून देतेय. देशाचा विकास कशाला म्हणतात? देशाला घेऊन दूरदृष्टी म्हणजे काय? देश कोणत्या कारणांनी प्रगती करतो-पुढे जातो? याबद्दल युवकांमध्ये कमालीचे अज्ञान आहे. माणूस, देश आणि देशहितापेक्षाही आज धर्माला-व्यक्तीला अवाजवी महत्व दिले जात आहे.

माझे भविष्य काय असेल? कसे असेल? यापेक्षा स्वतःच्या पक्ष-नेत्याची जास्त काळजी करणारी, प्रॅक्टिकली विचार न करता भावनेच्या आहारी जाणारी ही पिढी आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. ही पिढी अचानक या 5-7 वर्षात घडलेली नाही. ही पिढी पद्धतशीरपणे आपल्या डोळ्यादेखत घडविल्या जात होती पण आपल्याला ते दिसत नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला होणार्‍या त्रासापासून रयतेची सुटका व्हावी, परकीय गुलामगिरीतून देश मुक्त व्हावा म्हणून स्वराज्य निर्माण केले हे सांगितल्याचं जात नाही. ते धर्माच्या रक्षणासाठी मुघलांशी लढले असेच सांगितले जात होते तेव्हा आपण गप्प होतो. हजारो मावळ्यांच्या बलिदानाने उभे राहिलेले हे स्वराज्य शत्रूला मिळू नये म्हणून अनन्वित छळ सहन करून शेवटी प्राणांची आहुती देणार्‍या छत्रपती संभाजी राजांना धर्मवीर म्हंटले गेले तेव्हासुद्धा आपण गप्पच होतो. या देशात जोही लढला तो धर्मासाठीच लढला, देशासाठी नव्हे हेच इथे सांगितले गेले तेव्हाही आपण गप्पच असतो. स्वातंत्र्य लढ्यात आयुष्य झोकून देणार्‍या आणि बलिदान देणार्‍या स्वातंत्र्यसेनानींना एखाद्या धर्माचे समर्थक-विरोधक म्हणून विभागल्या जाते तेव्हही आपण गप्पच असतो. घरात सुद्धा बालपणापासून ह्या पिढीला शिकविल्या गेलं की देवबाप्पा(देव, अल्लाह, ख्रिस्त) समोर कुणीच नाही. ना माय-बाप, ना भाऊ-बहीण, ना मैत्री ना कोणते नाते-गोते, ना माणूस ना देश. मग हाच मुलगा मोठा होऊन धर्मासाठी कुणाशीही भिडायला तयार होतो. त्याला या देशापेक्षा आणि देशातील माणसांपेक्षा धर्म मोठा वाटायला लागतो. आणि धर्म मोठा वाटायला लागला की धर्मासाठी (खोटं खोटं का असेना) भांडणारा व्यक्ती, त्याच उदात्तीकरण करणारा नेता सर्वोच्च वाटायला लागतो. त्यावेळी हा नेता किंवा व्यक्ती आपल्या धर्माचा फायदा करतोय की नुकसान हेसुद्धा त्यांना कळत नाही. ह्यातूनच आपल्या देशात धर्माचे राजकारण मजबूत होत गेले आहे. काही आई-वडिलांच्या ह्या गोष्टी लक्षात येतातही परंतु तोपर्यंत मुलांची मते पक्की झालेली असतात.

नव्या पिढीने शांतपणे एक विचार करायला पाहिजे की, धर्माने माणसाला काय दिले? धर्मामुळे मनुष्याची किती प्रगती झाली-विकास झाला? जगातील सर्वात जास्त युद्धे ही धर्मामुळे झालीत आणि सर्वात जास्त माणसे ही धर्मामुळे झालेल्या लढायांमध्ये मारल्या गेलीत. धर्माने शिक्षणाचा अधिकार दिला नाही, धर्माने समानतेचा अधिकार दिला नाही, धर्माने छत्रपती शिवाजी महाराज पराभूत व्हावे आणि औरंगजेब जिंकावा म्हणून कोटी चंड यज्ञ केला, धर्माने राजर्षी शाहूंना वेदोक्त मंत्राचा अधिकार नाकारला, धर्माने विधवाविवाह बंदी घातली, धर्माने स्त्रियांना समान अधिकार नाकारला, धर्माने समुद्र ओलांडून जाण्याला बंदी घातली, धर्माने माणसामाणसात भांडणे लावलीत आजही धर्माच्या नावाने ही नवीन पिढी भरकटली जात आहे. नुकतीच कर्नाटकात ज्याची धर्मांधांकडून हत्या झाली आणि ज्याच्या नावाने राजकारण सुरु आहे त्या हर्षा च्या बहिणीने सुद्धा आपल्या बयाणात सांगितले आहे की, हिंदू आणि हिंदुत्वाच्या राजकारणात फसून माझ्या भावाचा जीव गेला आहे. माझी सर्व हिंदू-मुस्लिम भावांना विनंती आहे की धर्माच्या राजकारणात फसू नका आणि आपल्या आई-वडिलांचे चांगले पाल्य बना. यावरून तरी आपण शिकले पाहिजे. जीव गेल्यावर कसला आलाय धर्म आणि कसली आली आहे जात? राजकारण्यांचे यात काहीच जात नाही, तुमचं-आमचं मात्र आयुष्य खराब होवून जातं.

आजच्या पिढीचा प्राधान्यक्रमच गडबडलाय. इतिहासाचा अभ्यास करून त्यातून शिकून भविष्याची योजना आखत वर्तमानात जगले पाहिजे परंतु आम्हाला इतिहासातच जगायला आवडते. विज्ञानामुळे झालेली अद्वितीय प्रगती विसरून आपण इतिहासच कसा श्रेष्ठ होता यातच गुंतून पडतो. याबाबत विंदा करंदीकरांनी 4 ओळी लिहून ठेवल्यात की,

इतिहासाचे अवजड ओझे,

डोक्यावर घेऊन ना नाचा,

करा पदस्थल त्याचे आणिक

चढुनी त्यावर भविष्य वाचा..

चांगल्या-वाईटाच्या व्याख्या या लहान पणापासून मुलांच्या डोक्यात नकळतपणे पक्क्या बसविल्या जातात. कपाळावर टिळा लावणे, पूजा-अर्चा करणे, धार्मिक असणे, माळा-गंडे दोरे बांधणे, मंदिरात जाणे, शाकाहारी असणे म्हणजे तो अतिशय चांगला माणूस मग तो रोज कितीही लोकांना फसवत असेल, खोटं बोलत असेल, अवैध कामं करत असेल तरी तो चांगलाच. ह्या उलट देव-धर्म ना मानणारा, राशी-भविष्य न मानणारा, मांसाहार करणारा हे लोक म्हणजे जणू राक्षसच मग ते लोक कितीही प्रामाणिक असोत. हे संस्कार बालवयातच मुलांवर केले जातात. मग समाज जो धार्मिक, शाकाहारी आहे त्याने कितीही चुका केल्यात तरी त्याला डोक्यावर घेतो. यातूनच मग आसाराम, राम रहीम आणि साधूंच्या वेशातले नेते ह्या पिढीच्या मेंदूचा ताबा घेतात आणि त्यांना हवा तसा ह्या पिढीचा वापर करून घेतात.

आज या देशातली युवा पिढी सर्वच बाजूंनी संकटात सापडलेली आहे. देशातील महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी, नवीन रोजगार नाही. ज्यांचे होते त्यांचे गेले. देशावर 103 लाख कोटींच्या वर गेलेले कर्ज, देश इतका संकटात असतांना सुद्धा आज युवकांना आपल्याकडे रोजगार नाही आपलं भविष्य काय असेल? यापेक्षा आपल्या जाती-धर्माच्या नेत्याची अस्मिता आणि कुण्या व्यसनी नट-नट्यांची प्रकरणे महत्वाची वाटतात. माणसापुढे धर्म महत्वाचा वाटतो. माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही हे या पिढीला शिवकवलेच गेले नाही. आपला पक्ष, आपला नेता, आपला धर्म इतका महत्वाचा होऊन जातो की त्यापुढे देश, देशाची सुरक्षा, देशाचा विकास ह्या गोष्टी नगण्य होऊन जातात. ही झापडे इतकी पक्की असतात की एखादं 100 कोटींचं प्रकरण खूप महत्वाचं वाटत परंतु गुजरातमध्ये देशातील सर्वात मोठा 23 हजार कोटींचा बँक घोटाळा किंवा हजारो कोटींची ड्रग्ज पकडल्या जाणे ही लक्ष न देण्याजोगी चिल्लर बाब वाटते. कोणत्याही पक्षाचे राजकारणी दुधाने धुतलेले नाहीत त्या प्रत्येकाची चिकित्सा करण्याची वृत्ती या नवीन पिढीत रुजवली पाहिजे.

एखादी व्यक्ती आवडते म्हणून आपण तिच्या देशासाठी घातक आणि चुकीच्या निर्णयाचं सुद्धा समर्थन करत असू तर आपण चुकतोय. एखादी व्यक्ती आवडणे ही वेगळी गोष्ट आहे आणि तिचे निर्णय ही वेगळी गोष्ट आहे. विरोधासाठी विरोध जसा योग्य नाही अगदी तसच समर्थनासाठी समर्थन पण नकोच. युवकांनी व्यक्त होतांना एखाद्या पक्षाचे, प्रदेशाचे, धर्माचे, जातीचे होऊन नव्हे तर फक्त एक भारतीय म्हणून व्यक्त झाले पाहिजे.

आज आपण गाडीवर -सोशल मीडियावर सहज लिहितो की गर्वच नाही तर माज आहे हिंदू असल्याचा, बौद्ध असल्याचा, भगवं वादळ , निळं वादळ, मराठा असाल तर लाईक कराल-बौद्ध असाल तर लाईक कराल. आपल्या मायबापाच्या जाती-धर्मात जन्माला येणं यात आपलं कर्तृत्व ते काय? आपल्याकडे कुठला पर्याय होता? मराठा समाजात हजारो राजे होऊन गेले पण नाव कुणाचं घेतलं जातं? छत्रपती शिवाजी महाराजांचं. माळी समाजात अनेक समाज सुधारणेचे कार्य करणारे होऊन गेलेत पण नाव कुणाचं घेतलं जातं? महात्मा ज्योतिबा फुलेंचं. दलितांमध्ये अनेक नेते होऊन गेलेत पण फक्त बाबासाहेबांचंच नाव घेतलं जातं कारण त्यांचं असामान्य कर्तृत्व. ह्या कार्य-कर्तृत्वाचा अभिमान आपण बाळगला पाहिजे न की जाती-धर्माचा.

युवकांमध्ये सुद्धा आस्तिक- नास्तिक, पुरोगामी-प्रतिगामी असे गट पडले आहेत. अस्तिकांना वाटत नास्तिक म्हणजे राक्षसच आणि नास्तिकांना वाटत आस्तिक म्हणजे अगदी बावळटच. प्रतिगाम्यांना वाटत पुरोगामी म्हणजे देशाचे दुष्मणच तर पुरोगाम्यांना वाटत हा देश फक्त प्रतिगाम्यांमुळेच खड्ड्यात जातोय. कुणीच कुणाला समजून घ्यायला तयार नाही. एखाद्या व्यक्तीचे एखाद्या बाबतीतले विचार म्हणजे त्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व नाही हे आपण केव्हा समजुन घेणार? कुठलीही व्यक्ती ही कोणत्याही धर्माची-विचारांची-पक्षाची असण्याआधी सर्वप्रथम ती माणूस आहे हे आपण केव्हा कबूल करणार?

आपल्याच जवळच्या लोकांसोबत आपण अशा नेत्यासाठी संबंध खराब करतो ज्याला कधी आपण प्रत्यक्षात बघितलेले सुद्धा नसत. परंतु देशासाठी आपण कुणाशीच संबंध खराब करत नाही ही शोकांतिका आहे. आजकाल झुंडीच राजकारण झालेले आहे. डोक्यात काय आहे याला अज्जीबात महत्व नाही , डोकी किती आहेत याला महत्व आलेलं आहे. हजार लोक सांगतात म्हणून आपणही तेच बोलायला आणि तसेच वागायला लागतो जे की पूर्णपणे चुकीचे आहे.

आपण कधी कोणत्या गोष्टीला महत्व द्यायला पाहिजे याची समज आजच्या युवकांना आली म्हणजे अर्धे प्रश्न सुटतील. कोणताही विचार करतांना, निर्णय घेतांना देश सर्वात आधी असला पाहिजे.

प्रत्येक पिढीची एक जबाबदारी असते. 16 व्या शतकात छत्रपती शिवरायांनी व मावळ्यांनी आपली जबाबदारी ओळखुन स्वराज्य निर्मिती केली, महात्मा गांधी, भगतसिंग, पटेल, आझाद,सुभाषचंद्र बोस आणि क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या तावडीतून देश सोडविणे ही आपल्या पिढीची जबाबदारी ओळखली व त्यावर अंमल केला. आजच्या आपल्या पिढीची जबाबदारी आहे धर्म-पक्ष-जात-प्रांत यांच्या नावाने माणसा माणसात जे भांडणं लावण्याचे कार्य जोरात सुरू आहे ते अयशस्वी करून जातीय सलोखा निर्माण करणं. शेतकर्‍यांच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे आणि आपल्या भावना इतक्या मजबूत बनविणे की समाजकंटकांच्या कुठल्याही छोट्या-मोठ्या हल्ल्याने त्या दुखावू नयेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विविध मुद्दे निर्माण करत आपले लक्ष विचलित करून देशहित पायदळी तुडवून काही मोजक्या लोकांच्या हाती सत्ता-पैसा केंद्रित करण्याचा प्रयत्न आपल्या चिकित्सक बुद्धीने या पिढीने हाणून पाडला पाहिजे. यासाठी जर आपल्याकडे आज वेळ नसेल तर उद्या वेळ आपल्या हातून निघून गेलीच म्हणून समजा…

चंद्रकांत झटाले : 98229 92666