पिंपरी : नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ३२ मधील तापकीरनगर-ज्योतिबानगर-रहाटणी परिसरातील अनेक पथदिवे बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत असून तातडीने पथदिवे सुरू करण्यात यावेत. अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ३२ मध्ये तापकीरनगर, ज्योतिबानगर, रहाटणी या भागाचा समावेश होतो. सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या या भागात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. प्रामुख्याने सार्वजनिक रस्त्यांवरील वीजेचे खांब नुसतेच नावाला आहेत. दिवे सुमारे सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. याबाबत रहिवाशांनी तक्रारी करुनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. केवळ ठेकेदार पोसण्याचे काम अधिकारी वर्ग करत आहे. सार्वजनिक दिवाबत्ती बंद असल्याने किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. अंधाराच्या साम्राज्यामुळे चोर्या वाढल्या आहेत. या घटना पाहता आझाद कॉलनी, अश्विनी कॉलनी, राजवाडेनगर परिसर आणि प्रभाग क्रमांक ३२ मधील पथदिवे दिवे सुरु करावेत. असे तापकीर यांनी निवेदनात नमुद केले आहे.