पाच वर्षात बेरोजगारीचा प्रश्न कमालीचा बिकट – जय पवार

पाच वर्षात बेरोजगारीचा प्रश्न कमालीचा बिकट - जय पवार

बारामती (लोकमराठी) : मी युवक आहे, युवकांच्या काय समस्या आहेत हे मला माहिती आहे, गेल्या पाच वर्षात बेरोजगारीचा प्रश्न कमालीचा बिकट झालेला असून यावर मात करण्यास माझे प्राधान्य असेल व प्रचारातही बेरोजगारीवर मात करण्याच्या मुद्यावर जोर देणार असल्याची प्रतिक्रीया अजित पवार यांचे चिरंजिव जय पवार यांनी बोलून दाखविली.

अजित पवार यांच्या प्रचारार्थ कालपासून जय पवार हे शहरातील पदयात्रातून सहभागी होत आहेत. कसबा विभागात काल जय पवार यांनी घरोघरी जाऊन प्रचारपत्रकांचे वाटप करत मतदारांशी संपर्क साधला. त्या नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बेरोजगारी वेगाने वाढत असल्याची चिंता व्यक्त करत युवकांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याचे नमूद केले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्याने शेतकरीही अडचणीत आहेत, आघाडीचे सरकार आल्यास निश्चित कर्जमाफी दिली जाईल, असे ते म्हणाले. माझ्या सहकाऱ्यांना संधी द्यायला आवडेल. निवडणूक लढवून सत्ता मिळविण्यापेक्षाही जे युवक काहीतरी करु पाहत आहेत, त्यांना मदत करायला मला आवडेल, माझे सहकारी पंतप्रधानपदापर्यंत जाऊन पोहोचावेत व त्यांनाही संधी मिळावी असे मला वाटते, असे सांगत, जय पवार यांनी आपण कोणत्याही निवडणूकीला उभे राहण्याचा विचार केलेला नसल्याचेही स्पष्ट केले.