नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या कायद्याला विरोध करणारे आंदोलक आणि या कायद्याचं समर्थन करणारे लोक यांच्यात वादावादी झाली. जाफ्राबागमधून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. रविवारपासून आंदोलकांनी इथला रस्ता अडवून धरला होता. सोनवारपासून इथं हिंसाचार सुरु झाला. यामध्ये एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, दिवसभर सुरू असलेल्या हिंसक घटनांनंतर दिल्लीतल्या चांदबाग, भजनपुरा, ब्रिजपुरी, गोकुळपुरी आणि जाफ्राबाद या भागात 24 तारखेची रात्र भीतीने भरलेली होती. वृत्तांकनासाठी फिरत असताना ओल्ड ब्रिजपुरी भागात सर्फराझ अली भेटले. काकांच्या अंत्यसंस्काराहून ते येत होते. त्यांचे वडील बरोबर होते, त्याचवेळी जमावाने त्यांना घेरलं.
“त्यांनी मला नाव विचारलं. मी वेगळं नाव सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला कपडे उतरवायला सांगितलं. माझं नाव सर्फराझ असल्याचं सांगितलं. त्यांनी मला रॉडने मारहाण करायला सुरुवात केली आणि आगीत ढकललं.”
ओल्ड ब्रिजपुरीतल्या अॅम्ब्युलन्समधल्या बेडवर बसून सर्फराझ बोलत होते. सर्फराझ यांची गरोदर पत्नी घरी त्यांची वाट पाहत होती. गोकुळपुरीत बाईकवरून जात असताना त्यांना थांबवून हे घडलं. हे घडलं तेव्हा खूप माणसं तिथून जात येत होती. जमाव प्रत्येकाची ओळख परेड करत होता, असं सर्फराझ यांनी सांगितलं.
हसन आणि सत्यप्रकाश दिल्ली सरकारची अॅम्ब्युलन्स चालवतात. ओल्ड ब्रिजपुरीतल्या मेहर हॉस्पिटलमधून कॉल आल्याचं हसनने सांगितलं. सर्फराझ नावाच्या रुग्णाला जीटीबी हॉस्पिटलला पाठवण्याची आवश्यकता असल्याचं समजलं. हसन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की मला त्या भागात जायला भीती वाटत होती म्हणून आम्ही रुग्णाला मुख्य रस्त्यावर यायला सांगितलं. सर्फराझच्या भावाने त्यांना अॅम्ब्युलन्सपर्यंत आणलं.
दिवसभरात आधी सीलमपूरमधल्या सुभाष मोहल्लातून एका व्यक्तीला गोळी लागली आहे, असा कॉल आल्याचं हसनने सांगितलं. हसन म्हणाले,”आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो, मी रुग्णाबरोबर मागच्या बाजूला होतो. रक्तस्राव होत होता. सत्यप्रकाशने गाडी पुढे नेली. जमावाने गाडीच्या बॉनेटवर हल्ला केला, मग विंड शिल्डला ठोकलं. त्यानंतर त्यांनी रॉडने खिडकी तोडली. अॅम्ब्युलन्स आहे याची त्यांनी पर्वा केली नाही. ही दिल्ली सरकारची अॅम्ब्युलन्स आहे. आम्ही हिंदू-मुस्लीम असा भेद करत नाही. पण लोक कसलाच विचार करत नाहीत.”
चांदबाग, भजनपुरा, मौजपूर, जाफ्राबाद या भागांमध्ये सोमवारी दिवसभर हिंसक घटना घडल्या होत्या. ओल्ड मुस्तफाबाद इथे एका पीडिताच्या घरी आम्ही निघालो होतो परंतु त्या दिशेने जाणारे रस्ते बॅरिकेड लावून बंद करण्यात आले होते.
जाफ्राबाद मेट्रो स्टेशनजवळ नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारं आंदोलन गेले काही दिवस सुरू आहे. शंभरहून अधिक पुरुष तसंच बायका इथे आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. चांदबागेजवळ नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देणारी माणसं जय श्रीरामच्या घोषणा देत होती. ते पोलिसांच्या बरोबरीने उभे होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बॅरिकेडच्या पल्याड नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं.
सगळीकडे प्रचंड प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ओल्ड ब्रिजपुरी भागात हातात मशाली आणि रॉड घेतलेली माणसं पाहायला मिळत होती. तरुण मुलं होती, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या हातातही काठ्या होत्या. आम्ही मनोजला भेटलो (नाव बदललं आहे) ते याच भागात राहतात. जेव्हा जमाव हिंसक झाला तेव्हा मी तिथे होतो असं मनोजनं सांगितलं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारी मंडळी शांततेने आंदोलन करत होते. मात्र अचानक दगडफेकीला सुरुवात झाली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र पोलिसांची संख्या त्याहूनही जास्त होती.
पोलिसांनी स्थानिकांना मदत करायला सांगितलं. आजूबाजूच्या परिसरातील काहींनी पोलिसांना मदत केली. मनोज बोलत असताना काही अंतरावर एक गाडी जाळण्यात आली. आम्ही काहींशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या सर्व भागांमध्ये गस्तीपथक तैनात करण्यात आली आहेत. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रात्रभरात कुठेही हिंसाचार झाला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
शाहीन बागच्या धर्तीवर जाफ्राबाद इथल्या महिला नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. रविवार आणि सोमवारी झालेल्या हिंसक घटनांनंतर जाफ्राबादमध्ये या भागाला पोलिसांच्या छावणीचं स्वरुप आलं आहे. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर जमले आहेत. रात्रभरात पुरुष तसंच महिला आंदोलन करत होत्या.
आंदोलनकर्त्यांपैकी एकाने बीबीसीला सांगितलं की “आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन करत होते. आम्हाला शांतता हवी आहे, हिंसा नाही. सोमवारी झालेल्या हिंसक प्रकारानंतर लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. संविधानात्मक मार्गाने आमचं आंदोलन सुरू आहे. भारत हा आमचा देश आहे. सरकारने आमचं म्हणणं ऐकून घ्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हालाही रस्त्यावर बसणं आवडत नाही.”
जशी रात्र सरत होती तशी माणसं परतू लागली. काहीजणांनी मात्र आंदोलनाच्या जागी बसणंच पसंत केलं. दगड, काठ्या, जमावाने जाळलेल्या वस्तू रस्त्यावर पडून आहेत. पोलीस स्थानिकांच्या मदतीने हे सगळं बाजूला करण्याचं काम करत आहेत. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीनंतर मौजपूरमधलं वातावरण हिंसक झाल्याचा आरोप केला जात आहे.
कपिल मिश्रा यांनी रॅलीमध्ये दिल्ली पोलिसांना अल्टीमेटम दिला की रस्त्यावरच्या आंदोलकांना दूर करा, अन्यथा ते कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरतील. पोलिसांनी तसंच अन्य राजकीय नेत्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप राजधानी दिल्लीत असताना दिल्लीत हिंसक घटना तीव्र झाल्या आहेत.