पुस्तक परीक्षण
प्रा. दत्तात्रय तुकाराम आसवले
‘प्रकाशवाटा: एक आकलन’ हा संदर्भग्रंथ प्रा. डॉ. अतुल चौरे यांनी लिहिला असून तो अक्षरवाड्.मय प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. हा संदर्भग्रंथ सहा प्रकरणांमध्ये विभागला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीलाच आत्मचरित्र संकल्पना व स्वरूप हे प्रकरण दिले आहे. कोणतेही आत्मचरित्र अभ्यासताना आत्मचरित्र संकल्पनेच्या संदर्भात विचार केला जातो. डॉ. अतुल चौरे यांनी तोच धागा पकडून लेखन केले आहे. त्यामध्ये त्यांनी आत्मचरित्र संकल्पनेचे स्वरूप, आत्मचरित्र लेखनामागील लेखकाचा हेतू, आत्मचरित्र या साहित्य प्रकाराची बदलती संकल्पना, चरित्र-आत्मचरित्र-आत्मकथन या संकल्पनातील साम्यभे आणि इतर वेगवेगळ्या अभ्यासकांच्या व्याख्यांचा विचार करून आत्मचरित्र संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यासाठी त्यांनी विविध संदर्भग्रंथांचा वापर केला आहे. त्या संदर्भग्रंथांची क्रमवार यादी दिली आहे.
त्यानंतर त्यांनी ‘प्रकाशवाटा’ या आत्मचरित्राशी संबंधित असणारा मुख्य भाग सांगितला आहे. त्यामध्ये त्यांनी लोकबिरादरी प्रकल्प निर्मितीची प्रेरणा आणि वाटचाल या प्रकरणाअंतर्गत बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाची वाटचाल सांगितली आहे. तसेच लोकबिरादरी प्रकल्पाच्या निर्मितीचा विस्तृतपणे वेध घेतला आहे. लोकबिरादरी प्रकल्पाचे स्वरूप स्पष्ट करताना आरोग्याला दिशा देणारा दवाखाना, शैक्षणिक विकासाची शाळा, वन्यजीवन संरक्षण प्राण्यांचे गोकुळ, शेती विकास हाच आदिवासींचा विकास, न्याय-निवाडा जातपंचायतीचा, अनाथालय लहान मुलांचे गोकुळ अशा प्रकरणांच्या शीर्षकाखाली ‘प्रकाशवाटा’ या आत्मचरित्रातील अनेक गोष्टींवर डॉ. अतुल चौरे यांनी नेमकेपणाने भाष्य केले आहे. लोकबिरादरी प्रकल्पाच्या वाटचालीसंदर्भात भाष्य करताना त्यांनी आरोग्य सेवा, शैक्षणिक विकासाची शाळा, शेती प्रकल्प, लोक अदालत, जात पंचायत इतर गोष्टींची सविस्तर मांडणी केली आहे. लोकबिरादरी प्रकल्पाला मिळालेल्या समाजमान्यतेची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. समाजजीवनातील ज्या-ज्या समाजघटकांनी लोकबिरादरी प्रकल्पाची दखल घेतली त्या सर्व संस्थांचा उल्लेख त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने या कामाची दखल घेऊन दिलेले अनेक पुरस्कार तसेच फिलिपाइन्स या देशाने दिलेला रँमन मॅगसेसे पुरस्कार या सर्व पुरस्कारांबद्दलची विस्तृत माहिती या संदर्भग्रंथात वाचायला मिळते. या ग्रंथातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘प्रकाशवाटा’ या आत्मचरित्रात जे समाजदर्शन आले आहे. त्या आदिवासी समाजजीवनाची डॉ.अतुल चौरे यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. विशेषत: डॉ. प्रकाश आमटे यांचा नागपूर, चंद्रपूर, बल्लारपूर, अल्लापल्ली आणि हेमलकसा या भागातील जीवनप्रवासाचा सविस्तर आढावा प्रस्तुत ग्रंथात घेतला आहे.
हेमलकसा भागातील भौगोलिक परिस्थितीचे चित्रण, आदिवासी बांधवांचा जीवनसंघर्ष त्याचबरोबर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांचा संघर्षमय जीवनप्रवास विस्तृतपणे नोंदवला आहे. तसेच डॉ. अतुल चौरे यांनी त्यावर आधारीत आपले अभ्यासपूर्ण मत नोंदवले आहे. या ग्रंथाच्या शेवटी ‘प्रकाशवाटा’ या आत्मचरित्राचे वाड्.मयीन मूल्यमापन केले आहे.
यामध्ये त्यांनी ‘प्रकाशवाटा’ या आत्मचरित्राचे आशयसूत्र, आत्मचरित्रातून आलेला प्रांजळपणा, प्रकाशवाटामधून आलेल्या विविध व्यक्तिरेखा, आत्मचरित्राची भाषाशैली, निवेदनशैली, स्थळ वर्णन, प्रसंग वर्णन, विविध घटना-प्रसंग त्याचबरोबर ‘प्रकाशवाटा’ या शीर्षकाची यथार्थता अशा सर्व अंगांनी डॉ.अतुल चौरे यांनी या संदर्भग्रंथात मांडणी केली आहे. शेवटी ‘प्रकाशवाटा’ या आत्मचरित्राबद्दलचे काही निष्कर्ष त्यांनी नोंदवले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एस.वाय.बी.ए. या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी ‘प्रकाशवाटा’ हे आत्मचरित्र लावले आहे. त्यादृष्टीने ‘प्रकाशवाटा: एक आकलन’ हा संदर्भग्रंथ संशोधक अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व दिशादर्शन ठरेल अशी आशा वाटते.
लेखक : प्रा. डॉ. अतुल चौरे
प्रकाशक : अक्षरवाड्.मय प्रकाशन, पुणे.
पृष्ठसंख्या : 96
मुल्य : रुपये 120
……………………………………..
प्रा. दत्तात्रय तुकाराम आसवले
रमेश फिरोदिया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, साकुर, ता.संगमनेर, जि. अहमदनगर पिन- ४२२६२२