घातक शस्त्र व अंबर दिव्यासह डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने आरोपी केला जेरबंद

घातक शस्त्र व अंबर दिव्यासह डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने आरोपी केला जेरबंद

अहमदनगर : दोन तलवारी आणि अंबर दिव्यासह वाहन जप्त करून एकास मोठ्या शिताफीने कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव आणि पथकाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ३१ रोजी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव हे रात्रगस्त करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वर येथील दत्तू मुरलीधर सकट रा. सपकाळवस्ती याने आपल्या घरात व वाहनात विनापरवाना बेकायदा दोन घातक लोखंडी तलवारी लपवून ठेवल्या आहेत. अशी माहिती मिळताच बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री.जाधव यांनी तात्काळ त्यांचे कडील पोलीस पथक बोलावून टाकळी गावात वस्तीवर जाऊन सकट याच्या राहत्या घराची आणि दारा समोर उभी असलेल्या पांढऱ्या रंगाची टाटा सफारी(एम. एच.१६आर ४८३३)याची झडती घेतली असता त्यात दोन लोखंडी तलवारी आणि एक नारंगी रंगाचा अंबर दिवा असा मुद्देमाल मिळाला असून आरोपी दत्तू सकट यास ताब्यात घेण्यात आले असून कर्जत पोलीस ठाण्यात पोकॉ. आदित्य बेलेकर यांच्या फिर्यादीवरून आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. प्रबोधकुमार हंचे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सफौ.गौतम फुंदे, पोना. केशव व्हरकटे, पोकॉ. हृदय घोडके, सागर जंगम, आदित्य बेलेकर, गोवर्धन कदम, वैभव सुपेकर, संतोष साबळे, मच्छीद्र जाधव, चापोकॉ दादाराम म्हस्के, मपोकॉ. रत्नमाला हराळे यांनी केली आहे.

या गुन्ह्यातील आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहे का? किंवा अंबर दिव्याचे वाहन वापरून कोणाची फसवणूक केली आहे का?या बाबत सखोल तपास पोलीस करीत आहे.” – अण्णासाहेब जाधव, पोलीस उपधीक्षक, कर्जत विभाग