पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन

अहमदनगर : पत्नीला आत्महत्येसह प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैन्यदलातील सैनिकाला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांनी कर्जत येथील हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (ता. २) धरणे आंदोलन केले.

प्रदिप अनिल शिंदे (रा. पाटेगाव) असे अटक केलेल्या सैनिकांचे नाव आहे. तर स्नेहा प्रदिप शिंदे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरला स्नेहा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना प्रदिप यांना समजताच ते कर्तव्यावर असलेल्या ठिकाणांहून कमांडींग ऑफिसरच्या सूचनेनुसार थेट कर्जत पोलिस ठाण्यात हजर झाले. तेथून ते पोलिसांसह पत्नीच्या अंत्यविधीसाठी गावी गेले.

मात्र, स्नेहा यांच्या आईने प्रदिप यांच्यासह सासरची मंडळी व इतर नातेवाईकांविरोधात फिर्याद दिल्याने कर्जत पोलिसांनी प्रदिप यांना अटक केली.

फिर्यादीत म्हटले आहे की, हुड्यांतील राहिलेले तीन लाख रूपये माहेरून आणण्यासाठी स्नेहा यांचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून स्नेहा यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, शिंदे यांच्यासह दोन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर इतर नातेवाईक फरार झाले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य व जय जवान जय किसान फाउंडेशन कर्जत यांच्या वतीने केलेल्या आंदोलनात अनेक माजी सैनिक सहभागी झाले होते. तसेच कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले.

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सैनिकाला अटक | अटकेच्या निषेधार्थ माजी सैनिकांचे धरणे आंदोलन

निवेदनात म्हटले आहे की, गुन्हाची कोणतीही शहानिशा न करता सैनिकाला अटक करण्यात आली आहे. ही बाब अन्यायकारक असून योग्य ती चौकशी करून सैनिकाला न्याय देण्यात यावा.

दरम्यान, या वर्षी जूनमध्ये प्रदिप यांचे लग्न झाले होते. त्यानंतर एक महिन्यानंतर प्रदिप कर्तव्यावर रूजू झाले होते. असे त्यांच्या मामाने सांगितले. अधिक तपास उपनिरीक्षक अमरदीप मोरे करत आहेत.