” ही सोगली भाजी, कातोर रे भाजी! ”
कामिल पारखे
आपण जर गोव्यातील पणजीला कधी गेला असाल तर तेथील मांडवीच्या तीरावर असलेला आदिलशाही राजवाडा किंवा जुने सचिवालय तुम्ही नक्कीच पाहिले असेल. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चला पणजीत होणाऱ्या कार्निव्हलची मिरवणूक येथूनच पुढे सरकत असते. या मध्ययुगीन काळातील राजवाड्याच्या दोन्ही बाजूच्या प्लाझांवर दोन पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या दोन पुतळ्यांपैकी एक पुतळा गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा आहे. राजवाड्याच्या दुसऱ्या बाजूला असलेला पुतळा कुणाच्याही मनात कुतुहल निर्माण करेल अशा स्थितीत आहे. या पुतळ्यामधे एक मनुष्य आपले दोन्ही हात उभारून एका स्त्रीला संमोहित करण्याचा प्रयत्न करत आहे असे जवळून निरीक्षण केल्यास दिसून येते. हा पुतळा 18 व्या शतकातील युरोपमधील वैज्ञानिक सोंहनविद्या शास्त्राचे जनक आणि गोव्याचे सुपुत्र ऍबे डी फरिया यांचा आहे.
1980 च्या दशकात मी पणजीतील दी नवहिंद टाइम्स या स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रासाठी बातमीदार म्हणून काम करीत होतो. तेंव्हा हा एकमजली आदिलशाही राजवाडा तात्कालीन गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे सचिवालय वा मंत्रालय होते. प्रतापसिंह राणे तब्बल अकरा वर्षे या कें द्रशासित प्रदेशाचे आणि नंतर स्वतंत्र गोवा राज्याचे मुख्यमंत्री होते. गोव्याचे त्यावेळी 28 आमदार असत आणि दमण आणि दीवचा प्रत्येकी एक आमदार असे. मंत्रिमंडळात एकूण साडेतीन सदस्य असत, म्हणजे मुख्यमंत्र्यासह तीन कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री ! या मंत्रालयाच्या एका कोपऱ्यात असलेली एक खोली आम्हा पत्रकारांसाठी एक प्रेस रुम म्हणून दिली होती. मुख्यमंत्री, इतर मंत्री वा मुख्य सचिव वा इतर सचिवांना पत्रकारांशी बोलायचे असल्यास वा आम्ह्लांला त्यांना भेटायचे असल्यास प्रेस रुमची ही व्यवस्था खूपच सोयीस्कर होती. त्या प्रेस रुम मधील शेवटच्या कोपऱ्यात आम्हा इग्रंजी पत्रकारांसाठी एक मोठा, अवजड टाईपरायटरही होता. नेहमीच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मी प्रेस रुम वापरु लागलो. तसेच गोवा सरकारच्या विधानसभा अधिवेशनाच्या काळात बेमुदत कालावधीकरिता प्रेस रुम वापरता येत असे. या प्रेस रुमच्या बाजूलाच साधारण 10 मीटर अंतरावर ऍबे डी फेरिया यांचा हा पुतळा आहे.
पणजीतून मिरामारपर्यंत जाणाऱ्या नयनरम्य डी. बी. बांदोडकर रस्त्यावर आणि मांडवी नदीच्या तीरावर अनेक दिग्गजांचे पुतळे आणि इतिहासाच्या खुणा जपणाऱ्या अनेक वस्तू आणि कलाकृती आहेत. गोवा सोडून आज अनेक वर्षे झाली असली तरी या ऍबे डी फरिया यांच्या या पुतळ्याबाबतचे माझ्या मनातील आकर्षण आजही कमी झालेले नाही. पोर्तुगीज राजवटीत म्हणजे 1945 साली पणजीत उभारण्यात आलेला ऍबे डी फरिया यांचा हा पुतळा त्या ठिकाणी आजही सन्मानपूर्वक राहिला आहे याचे कारण म्हणजे ऍबे डी फरिया यांचे महत्त्वपूर्ण योगदान. दहा फूट उंचीचा ऍबे डी फरिया यांचा हा कांस्य पुतळा पाहून या परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल निर्माण करतो. ऍबे डी फरिया यांचा जन्म गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या कांदोली या गावात 31 मे 1756 मध्ये झाला. या गोमंतकीयाने नंतर युरोपात एक कॅथोलिक धर्मगुरु म्हणून नाव कमावले, पॅरीसमध्ये संमोहनशास्त्रात त्यांनी मोल्यवान योगदान दिले, संमोहनशास्त्रावर फ्रेंच भाषेत त्यांनी ग्रंथ लिहिला, गोव्यातील पोर्तुगीज राजवट उलथून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रसिध्द पिंटो उठावातही त्यांचा सहभाग होता, हे विशेष. त्यामुळे ऍबे डी फरिया यांचे व्यक्तिमत्त्व इतिहासकारांना आकर्षित करते. त्यांच्या व्यक्तिमत्वावर आधारीत एक पात्र एका कादंबरीतही रेखाटण्यात आले आहे आणि त्या कादंबरीवर बेतलेला चित्रपटही खूप गाजला आहे.
ऍबोट किंवा मठामध्ये राहणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरुस फ्रेंच भाषेत ऍबे म्हणतात. पोर्तुगीज भाषेत ऍबाद किंवा पाद्री म्हटले जाते. इंग्रजी वा इतर भाषेत या गोमंतकीयास फादर फरीया म्हणून संबोधिले जाऊ शकेल. उत्तर गोव्यातील बार्देस तालुक्यातील कांदोली हे जोस कस्टडिओ फरिया किंवा ऍबे डी फरिया यांचे जन्मस्थळ. जोस कस्टडिओचे वडील कैतानो व्हितोरिनो डी फरिया हे मूळचे बार्देस तालुक्यातीलच कोलवाले या गावचे. सोळाव्या शतकाच्या अखेरीस अनंत शेणई या सारस्वत ब्राह्मणाने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. कैतानो हे या अनंत शेणई यांचे वंशज होते. ऍबे डी फरिया यांच्या आईवडिलांची पार्श्वभूीही वेगळीच होती. त्याचे वडील कैतानो हे ख्रिस्ती धर्मगुरु होण्यासाठी सेमिनरीत शिकत होते. परंतु धर्मगुरुपदाची दीक्षा मिळण्याआधीच त्यांनी सेमिनरी सोडली. कांदोलीच्या रोझ मारिया डिसोझा या युवतीशी त्यांचे लग्न झाले. या दांपत्याला जोस कस्टडिओ हा मुलगा झाला. त्या दोघांमध्ये कधीही सुसंवाद असा नव्हताच. त्यामुळे हे लग्न फक्त सहा वर्षेच टिकले. त्यानंतर ते दोघे पतिपत्नी परस्पर संमतीने वेगळे झाले. परस्परापासून वेगळे झाल्यानंतर कैतानो आणि रोझ मारिया डिसोझा या दोघांनीही सन्यासी धार्मिक व्रत स्वीकारण्यासाठी चर्चची परवानगी मिळवली. विवाहीत व्यक्तींना अशाप्रकारे सन्यासी व्रतबंध सहसा दिले जात नाही. अशाप्रकारे कैतानो यांनी धर्मगुरुपदाचे शिक्षण घेण्यास पुन्हा सुरुवात केली तर रोझा एक नन होण्यासाठी जुन्या गोव्यातील सांता मोनिका कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. सांता मोनिका कॉन्व्हेंट या मठाची भव्य वास्तू अजूनही अस्तित्वात आहे.
सन्यासी धर्मगुरुपदाचे शिक्षण घेणारे वडिल आणि मठामध्ये जोगिण असलेली आई यांचा मुलगा म्हणून जोस कस्टडिओला स्थानिक समाजाने कलंकित मानले, त्यामुळे त्याला खूप मनस्ताप सहन करावा लागला. कैतानो फरिया हे अत्त्यंत महत्त्वाकांक्षी होते. आपल्या मुलाची ही परिस्थिती पाहून गोव्यात राहून तो कधीही प्रगती करु शकणार नाही, असे यांना वाटले. त्यामुळे आपल्या मुलासोबत 1771 मध्ये गोवा सोडून ते पोर्तुगालला आले. तेथे जोस कस्टडिओ धर्मगुरु होण्यासाठी एक मठात दाखल झाला. पुढे रोम येथे धार्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 12 मार्च 1780 रोजी त्यांचा धर्मगुरु म्हणून दीक्षाविधी झाला. विशेष म्हणजे रोम येथील विद्यापीठात ईशज्ञान विषयात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या काही गोमंतकीय धर्मगुरुंमध्ये सिनिअर फरिया आणि ज्युनियर फरिया यांचा समावेश होता. ज्युनियर फरिया यानी नंतर तत्त्वज्ञानात आणखी एक डॉक्टरेट पदवी मिळवली.
एक उत्तम प्रवचनकार म्हणून ऍबे फरिया प्रसिध्द होते. असे म्हटले जाते की रो येथील प्रसिध्द सिस्टाईन चॅपलमध्ये पवित्र आत्म्याच्या सणानिमित्त उपदेश करण्यासाठी पोप पायस सहावे यांनी ऍबे फरियांना 1780 साली निमंत्रित केले होते. त्यावेळी ते फक्त 24 वर्षांचे होते. गोव्यातील राशोल सेमिनरीतील प्राध्यापक फादर आयवो सोझा यांनी लॅटिन भाषेतील या प्रवचनाचे इंग्रजीत भाषांतर केले आहे.
ऍबे फरिया यांच्या जीवनातील एका महत्वपूर्ण धटनेचा त्यांच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्या घटनेने त्यांना जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. रोवरून लिस्बन येथे परतल्यानंतर पोर्तुगालच्या राणीने आपल्या चॅपेलमध्ये प्रवचन देण्यासाठी या तरुण धर्मगुरुला निमंत्रित केले. ऍबे फरिया चॅपेलचे पुलपीट चढून गेल्यावर बोलण्याआधी त्यांना दरदरुन घाम फुटला. त्यांचे वडिल त्या पुलपीठाजवळच होते. आपल्या चिरंजीवाची ती अवस्था पाहून त्यांनी त्याच्या कानात आपल्या मातृभाषेत म्हणजे कोकणीत फक्त एकच वाक्य उच्चारले. ते वाक्य ऐकताच ज्युनियर फरियाची भीती पूर्ण गायब झाली. ते वाक्य असे होते. ”पुता, ही सोगली भाजी, कातोर रे भाजी!” (अरे बाळा, समोरची ही सगळी भाजी, कापून टाक ही सगळी भाजी !”) आपला आत्मविश्वास कमावल्यावर त्यांनी राणी आणि इतर जमलेल्या लोकांसमोर प्रभावी उपदेश केला. या छोट्याशा घटनेचा तरुण ऍबे फरियावर खोलवर परीणाम झाला. त्या केवळ एका वाक्यामुळे आपल्या मनातील भीती दूर होऊन भितीची जागा प्रचंड आत्मविश्वासाने कशी घेतली याचा त्यांना सतत अचंबा वाटत राहिला. यामुळेच संमोहनशास्त्राबाबत खोलवर संशोधन करण्याचे बीज त्यांच्या मनात रोवले गेले.
सिनियर फरिया आणि ज्युनियर फरिया हे दोघेही 1787 मध्ये गोव्यात घडलेल्या पोर्तुगीज सरकारविरोधी पिंटो बंडात सक्रिय होते. त्याकाळात गोमंतकीय धर्मगुरुंमध्ये आणि स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पोर्तुगीज सत्तेविरुध्द असंतोष खदखदत होता. गोमंतकीय धर्मगुरुंना आणि लष्करी अधिकाऱ्यांना नेहेमीच सापत्नपणाची वागणूक मिळते, त्यांना डावलले जाते, अशी त्यांची भावना होती. याचीच परिणती 1787 सालच्या पिंटो बंडात झाली, गोव्यातील साम्राज्यवादी पोर्तुगीज सरकारविरोधी स्थानिक लोकांनी केलेला हा दुसरा उठाव होता. पोतुर्गीज सरकारने हे बंड मोडून काढले. पोर्तुगीज सरकारकडून त्यांच्याविरुध्द कारवाई टाळण्यासाठी ज्युनियर ऍबे फरिया लिस्बनहून फ्रान्सला पळून गेले. त्यानंतर फ्रान्स हीच त्यांची कर्मभूमी बनली. फ्रान्समध्ये त्यांनी संमोहनशास्त्राची अभ्यास करुन या कलेचे प्रात्यक्षिक करुन तेथे मोठे नाव कमावले. एक कॅथोलिक धर्मगुरु संमोहनशास्त्राचे समर्थन करतो हे अनेक धर्मगुरुंना आणि चर्चच्या अधिकाऱ्यांना आवडले नाही. संमोहन करणी हे सैतानाचे कृत्य आहे असे त्यांच्या विरोधकांचे म्हणणे होते.
मात्र संमोहन विद्या आणि कॅथोलिक चर्चची शिकवणी परस्परविरोधी नाही असे ऍबे फरिया यांचे म्हणणे होते. संमोहनविद्येत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींना संमोहित करणे अशक्यच असते, त्यामुळे संमोहन विद्यामध्ये कुणावरही कसल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही, असा त्यांचा दावा होता. असे म्हटले जाते की ऍबे फरिया यांनी आपल्या संमोहन्विद्येचे सुमारे 5000 लोकांवर प्रयोग केले आणि या प्रयोगातून त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या मानसिक रोगांतून बरे केले होते.
ऍबे फरिया यांचे 20 सप्टेंबर 181 साली निधन झाले. फ्रेंच भाषेत प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकात सं ोहन विद्येची अनेक मार्गदर्शक तत्वे त्यांनी मांडली होती. त्यांच्या मृत्युपूर्वी काही दिवस आधी हा ग्रंथ प्रकाशित झाला होता.
मात्र त्यांच्या मृत्युनंतर एका शतकानंतर ऍबे फरिया यांना आधुनिक सोंहनविद्येचे जनक म्हणून मान्यता मिळाली. ऍबे फरिया यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कार्यावर आधारित बहुतेक सर्व पुस्तके फ्रेंच वा पोर्तुगीज भाषांत आहेत. ऍबे फरिया यांच्या फ्रेंच भाषेतील महान ग्रंथाचा कोकणी कवी आणि फ्रेंच विद्वान मनोहरराय सरदेसाई यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहेत.
पणजी येथील ऍबे फरिया यांचा पुतळा गोमंतकीय जेष्ठ शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांनी घडवलेला आहे. दिनांक 20 सप्टेंबर 1945 रोजी या शिल्पाचे अनावरण झाले. ऍबे फरिया यांचा पुतळा गोव्याची राजधानी पणजी येथे एका प्रमुख ठिकाणी असला तरी गोव्यातील व भारतातील पुष्कळ लोकांना ऍबे फरिया हे गोव्याचे व भारताचे एक महान पुत्र होते याची माहिती नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रतापगढ किल्यावर असलेला शिवाजी महाराज यांचा कांस्य पुतळादेखील शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामत यांचीच निर्मिती आहे.
दक्षिण गोव्यातील मडगाव शहरातील एका महत्त्वाच्या रस्त्यास ऍबे फरिया – रुआ ऍबे डी फरिया – असे नाव दिले आहे. गोव्यात कांदोली गावात ऍबे फरिया यांच्या पूर्वजांचे घर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. ऍबे फरियांच्या 250 व्या जयंतीनिमित्त 2006 साली पोर्तुगाल सरकारने ऍबे फरियांच्या पणजीतील पुतळ्याच्या छायाचित्रावर आधारीत एक खास पोस्टकार्डाचे अनावरण केले होते. ऍबे फरिया यांचे फ्रान्समध्ये निधन झाले. आणि त्यांची कबर पॅरिस शहरातील मोन्तमार्ट परिसरात कुठेतरी आहे असे म्हटले जाते. मोन्तमार्ट हा परिसर तेथील टेकडीवर असलेल्या भव्य सेक्रेड हार्ट बॅसिलिकासाठी प्रसिध्द आहे. अभिजात आणि आधुनिक चित्रकलेचे रसिक असलेल्या लोकांचेही हे आवडते स्थळ आहे.
काही वर्षापूर्वी कुटुंबियाबरोबर युरोपच्या दौऱ्यावर असताना पॅरिसमध्ये आमचे मोन्तमार्ट परिसरातच वास्तव्य होते. मोन्तमार्टच्या गजबजलेल्या रस्त्यांवर फिरताना, तेथील मेट्रोतून प्रवास करताना तेथे ऍबे फरिया या प्रसिध्द गोमंतकीयाचे चिरसमाधीचे ठिकाण कोठे असेल असा विचार माझ्या मनात येत असे. गोव्याच्या या महान सुपुत्राची कबर कदाचित कधीही सापडली जाणार नाही. मात्र संमोहनविद्येच्या क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान आणि त्यांचा वारसा कधीही विस्मृतीत जाणार नाही.
—————-
Camil Parkhe
Journalist, author, blogger
9922419274