पंचहौद मिशन चहापान, भारतीय पत्रकारितेतील पहिले स्टिंग ऑपरेशन

कामिल पारखे

गोपाळराव जोशी हे अर्वाचीन महाराष्ट्रातील एक वादग्रस्त पात्र आहे. अमेरिकेत जाऊन डॉक्‍टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती अशीच गोपाळराव जोशी यांची प्रामुख्याने ओळख आहे. पुण्यातील त्याकाळच्या अनेक थोर व्यक्तींना गणपतरावांनी आपल्या विविध चाळ्यांनी आणि उपद्‌व्यापांनी घाम फोडला होता. पुण्यातील पंचहौद चर्चमधील चहापान किंवा ग्रामण्य प्रकरण या गोपाळरावांनी निर्माण केलेल्या वादात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमुर्ती म. गो. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वगैरेंसारखे भलेभले लोक अडकले.

पंचहौद मिशन चहापान, भारतीय पत्रकारितेतील पहिले स्टिंग ऑपरेशन
पंचहौद चर्च-पवित्र नाम देवालय किंवा होली नेम कॅथेड्रल

विशेष म्हणजे हे चहापान प्रकरण हा वाद गोपाळरावांनी अगदी ठरवून, त्यात अनेक लोकांना गोवून घडवून आणला होता आणि नंतर पुणे वैभव या वृत्तपत्रात आपल्या बायलाईनसह बातमी छापून त्यात पुण्यातील या सनातनी आणि त्याचप्रमाणे सुधारकीं लोकांची नावे दिली होती.

भारतात काही दशकांपूर्वी पत्रकारितेचे युग सुरू झाले होते आणि या नव्या माध्यमाला हाताशी धरून गोपाळरावांनी एक खेळी खेळली होती. ज्या व्यक्तींनी या वादास भीक घातली नाही ते यातून सुटले मात्र सनातन्यांचे पुढारी समजले जाणारे लोकमान्य टिळक यात पुरते अडकले गेले आणि स्वतःच्याच ज्ञातीत, समाजात बहिष्कृत होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. पंचहौद चहापान प्रकरण किंवा ग्रामण्य वाद हा त्यामुळे गोपाळराव जोशी यांनी वृत्तपत्रास हाती धरून घडवून आणलेले भारतीय पत्रकारीतेतील पहिले आणि आणि सर्वांत गाजलेले स्टिंग ऑपरेशन होते म्हणता येईल.

गोपाळराव हे शकुंतला परांजपे यांच्या आईचे चुलते. आपल्या या चुलत-आजोबांविषयी शकुंतलाबाईंनी लिहिलेल्या पुढील वर्णनावरून गोपाळरावांनी पंचहौद चहाप्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन का केले याची कल्पना येते.

“गोपाळरावांना ढोंग आणि दांभिगपणा बिलकुल खपत नसे. नाना सोंगं.करून दुसऱ्याचं ढोंग चव्हाट्यावर आणण्याची त्यांना फार खोड. पाणी शिंपडल्यानं माणूस बदलतं काय, असं म्हणून स्वारी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती झाली आणि पुढल्या रविवारी प्रार्थनेच्या वेळी धोतर नेसून उघड्या पोटावर जानवे घालून चर्चमध्ये जाऊन बसली. तेव्हा तेथील पाद्रयानं हळूच सुचवलं, कि “तुम्ही आता ख्रिस्ती झालात तेव्हा जानवं वगैरे काढून नीट पोशाख करावा.”जानवं घालू नये, असं बायबलमध्ये कुठं. सांगितलं आहे?’ असा सवाल गोपाळरावांनी पाद्रयाला केला आणि लवकरच संगमात स्नान करून, आता माझी सर्व पापं धुऊन निघाली आणि मी पुर्ववत हिंदूच आहे, असा आधार धर्मग्रंथांतून भटभिक्षुकांना दाखवला. ख्रिस्ती धर्माची टिंगल आणि हिंदू धर्माचीही टिंगलच !”

पंचहौद चहापान वादावर टिळक चरित्रकार न. चि. केळकर यांनी तब्बल बत्तीस पाने लिहिली आहेत. पुण्यात आग्यामोहोळ उठवणारे हे गमतीदार प्रकरण हे त्याकाळच्या मूळच्या लिखाणाच्या आधारे समजून घेणे अधिक योग्य ठरेल.

केळकर लिहितात :

“गोपाळरावांचा मिशनरी लोकांत येण्याजाण्याचा बराच प्रघात असे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी पुणे येथील वेताळ पेठेतील पाच हौद मिशनच्या शाळेत, तेथील मुख्य शिक्षक रे. रिव्हिंगटन व तेथीलच एक सिस्टर यांजकडून, पुण्यातील शे पन्नास सुशिक्षित गृहस्थांना व्याख्यानासंबंधाने म्हणून निमंत्रणे केली. त्यातील पाच पन्नास लोक गेले. निमंत्रणातून बहुतेक कोणीही ठळक मनुष्य सुटला नव्हता. जे कोणी विशेष अडचणींमुळे गेले नाहीत असे प्रसिद्ध लोकही फारच थोडे. सुधारणेसंबंधाचा वाद पुण्यात जोराचा सुरू असता एकीकडे रा. ब. रानडे व दुसरीकडे बळवंतराव टिळक अशी माणसे या निमंत्रणावरुन गेली, यावरुन तेथे काही घोटाळा होणार नाही अशी कोणासही साधारण शंका देखील आली नाही. गोपाळरावांचे गुपित फारच सुरक्षित राहिले होते असे दिसते. तथापि या कटांत एक दोन साक्षीदार होतेच, अशी गोष्ट मागाहून उघडकीस आली. जुन्या पक्षाच्या लोकांस आमंत्रणे मुळीच नव्हती, कारण ते यावयाचेच नाहीत हे माहीत. पुण्यातले सुशिक्षित लोक मात्र व्याख्यानाला चटावलेले, व ते मिशन हौसमध्येही बोलावले तरी यावयाचेच, अशा समजुतीने व अनुभवजन्य विश्‍वासाने जी गोळी गोपाळरावांनी झाडली, ती त्यातील बहुतेकांना बिनचुक लागली.”

“पंचहौद मिशनमधील व्याख्यान यथातथाच झाले. पण ही उणीव भरून काढण्याकरिताच की काय म्हणून, मागाहून टेबलावर चहा बिस्किटे आणून ठेवण्यात आली. या व्यवस्थेत गोपाळराव जोशी हे होतेच. त्यांनी मिशनरीसाहेबाला कटात घेतले होते की नाही माहीत नाही. पण चहा देणे ही गोष्ट अगदी आयतेवेळी घडून आलेली नसून, चहा द्यावयाचा संकल्प मात्र, भलेपणाचे का होईना आधीच ठरलेला असावा, झाले. प्रत्येकापुढे चहा व बिस्किटे येऊन बसली, त्यांचे सेवन करावे अशी जरी सर्वानाच इच्छा नव्हती तरी आपणापुढे हे पदार्थ मांडलेही जाऊ नयेत असे निक्षून सांगण्याचे धैर्य मात्र कोणास झाले नाही. ख्रिस्त्याच्या हातचा चहा घेतला तर आपले लोक जसे वाईट म्हणणार, तसे चहा आपल्या पुढे ठेवलाही जाऊ नये इतका त्याचा विटाळ मानलेला दाखविला तर कदाचित मिशनरीही हसणार ! शिवाय इंग्रज लोकांत खाण्याचा पदार्थ पुढे आणून ठेवण्यापलीकडे आपल्यांतल्या प्रमाणे तो घ्याच असे म्हणून आग्रह करण्याचा चाल नाही, यामुळे

सहज बचाव करता येईल असेही पुष्कळांना वाटले. गप्पागोष्टी चालूच होत्या. तेव्हा काहींनी तो चहा पिऊन फस्त केला, काहींनी घोटभरच घेऊन त्याचा मान केला, काहींनी त्याला नुसता हात लावण्याचा देखावा ेक रून तो दूर सारला, व काहींना ही ब्याद आप्या समोरून कोणी उचलून घेऊन जाईल तर बरे असेही वाटत असावे. पण आपल्यासमोरच्या या (चहाच्या) पेल्यात लवकरच संकटमय असे वादळ होणार अशी कोणासच शंका आली नाही, व मौज ही झाली की चहाचे पाणी अखेरपर्यंत भरून राहिलेल्या या चषकसमुद्रात वादळ न होता जे मेले कोरडे झाले त्यातच वादळ उठले. ऑलिम्पस पर्वतावर बसून देवता वादळे उठवितात (असा ग्रीक पुराणातला संकेत आहे) त्याप्रमाणे गोपाळराव जोशी हे मात्र यत्किंचितहि न हसता चहा पिणाऱ्यांच्या तोंडाकडे पाहून आपल्या मनात असे म्हणत असावे की, “सांभाळा वादळ सिद्ध होत आहे.’

पण इतकया या लोकांना मिशन हौसमध्ये नेऊन चहा प्रत्यक्ष पाजण्यापेक्षाहि ते चहा प्याल्याचा बोभाटा होण्यात अर्थात अधिक स्वारस्य होते, व लगेच गोपाळराव जोशींनी “पुणे वैभव’ कचेरीकडे धाव घेऊन, जी काही माणसे मिशन हौसमध्ये आली नव्हती त्यामुळे त्या सुद्धा जी आली होती त्यांची नावे प्रसिद्ध केली. गोपाळरावांचे काम झाले. आता ते बाळासाहेब नातू आहेत, ते रानडे आहेत, ते टिळक आहेत. जेवढा गोंधळ घालतील तेवढा थोडा. तो पहावयाला नारदमूर्ति गोपाळराव हे गाईसारखे गरीब तोंड करून आपले बाजूला उभे. रमाबाई रानडे यांनी आपल्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी आत्मचरित्रात या चहापान प्रकरणाची पुढील शब्दांत माहिती दिली आहे.

“सन 1890 साली ऑक्‍टोबरच्या चवदाव्या तारखेस संध्याकाळी सेंट मेरीज कॉन्व्हेंटमध्ये काही समारंभ होता. त्या संबंधाने मिशनरी लोकांनी शहरातील पन्नासपाऊणशे गृहस्थांना आमंत्रण केले होते. त्याचप्रमाणे काही बायकांनाही आमंत्रणे होती. आम्ही बायका व पुरुष मिळून शंभर मंडळी होती. काहींनी निबंध वाचले व काहींनी भाषणे केली. हे काम आटोपल्यावर झनाना मिशनमधील सिस्टर्सनी आपल्या हातांनीच चहा आणून मंडळीस दिला. काहीजणांनी तर निव्वळ या बायकांचा मान राखण्याकरिता म्हणून त्यांनी पुढे केलेले पेले आपल्या हातात घेतले व तसेच खाली ठेऊन दिले व काहीजण पेले हातात घेऊन चहा प्याले. आम्ही बायका काय त्या दहाबाराजणीच होतो. आमच्याकडे चहा आला, तेव्हा आम्ही सगळ्या जणींनी तो घेण्याचे नाकारले.”

“असो. हा समारंभ आटोपल्यानंतर आम्ही आपल्या घरी निघून आलो. पुढे दोन-तीन दिवसांनीच ‘पुणे वैभवा’त गोपाळ विनायक जोशी यांच्या सहीने ही कॉनव्हेंटमधील सर्व हकीकत प्रसिध्द झाली. व शेवटी पत्रकाराने (गोपाळरावांनी) आपल्या नेहेमीच्या स्वभावाप्रामाणे वस्तुस्थितीला सोडून पुष्कळ कुत्सित टीका केली होती, आणि म्हटले होते, की ‘ हे रावसाहेब आणि रावबहादूर सुधारक लोक प्रत्यक्ष महारांनी बनविलेल्या, पण गोऱ्या मडमांच्या लुसलुशीत हातांनी आपल्या हातात आलेला चहा पिऊन मिटक्‍या मारीत व ढेकरा देत, आपापल्या घरी निघून गेले, ही गोष्ट आमच्या पुणेकर सनातन धर्मभिन्यांस आणि ब्रह्मवृंदास रूचते तरी कशी?”

वृत्तपत्रात छापून आलेल्या यादीने निर्माण केलेल्या परिस्थितीचे केळकरांनी पुढील वाक्‍यात वर्णन केले आहे. “भरलेल्या जठरांत एकादा विषारी कण गेला म्हणजे जसे सगळे अन्न ढवळून निघते, तशी स्थिती पुणे-वैभवाच्या या अंकाने सगळ्या पुण्याची केली.

(यापुढील दिलेली अवतरणे केळकरांच्या पुस्तकातून घेतली आहेत.)

“मिशन हौसमध्ये चहा घेतलेल्या लोकांची नावे प्रसिद्ध झाल्याचा मुख्य परिणाम असा झाली की, सनातन धर्माभिमानी पक्षाला या बंडखोरीची उपेक्षा करणे अशक्‍य झाले.”

तुमच्यात काही पाणी असेल तर ते आता दाखवा. हा पहा धर्माविरुद्ध होणाऱ्या बंडाचा जाहिरनामा ‘पुणेवैभवा’च्या चावडीवर लावला गेला. असा सवाल नातूप्रभृतींना येऊन पडला, व त्यांनाही ती इष्टपत्तीस वाटली असावी. “धर्माभिमान व सरदारी व त्याहूनही विशेष म्हणजे आग्रहीपणा यामुळे धर्माभिमानी पक्षाचे पुढारीपण बाळासाहेब नातू यांच्याकडे आले होते. त्यांनी शंकराचार्यांकडे फिर्याद अर्ज गुदरण्याचा निश्‍चय केला. दरम्यान पुणे – वैभवात प्रसिद्ध झालेली काही नावे उगीच खोटी असल्यामुळे वैभवकर्त्यांवर पुणे मॅजिस्ट्रेट कोर्टात बेअब्रूची फिर्याद होऊन, त्यांना दोनशे रुपये दंड झाला. पण जे खरेच गेले होते व ज्यांनी चहा घेतला होता त्यांचा निकाल शंकराचार्यांशिवाय दुसरा कोण लावणार ? म्हणून श्रींच्या दरबारांतून प्रतिवादींना नोटीस निघून प्रकरण सुरू झाले. प्रायः अशा प्रश्‍नांचा निकाल गावांतील एखाद्या सच्छिष्याला पंच नेमून शंकराचार्य करीत असतात. पण तेथे निम्मा गांव वादी व निम्मा प्रतिवादी असे असल्यामुळे, श्रींना असे वाटले की दोन त्रयस्थ माणसे पाठवूनच याचा निकाल करावा, म्हणून व्यंकटशास्त्री निपाणीकर व न्यायगुरू बिन्दुमाधवशास्त्री धर्म सर्वाधिकारी यांना शिककामोर्तब देऊन पुण्यास रवाना करण्यात आले. व या धार्मिक मुकादम्यात पौष व. 2 दिवशी कामास सुरुवात झाली.”

जानेवारी 1892 अखेर ग्रामण्य कमिशनचे काम पुण्यास जोराने सुरू झाले. “इकडे कमिशनने फिर्यादीचा निकाल वैशाख व।। 1 शके 1894 रोजी पुणे मुक्कामी जाहीर केला…. कमिशनर शास्त्री यांनी वादींचा वर्तानपत्री पुरावा अग्राह्य धरून, व काही तोंडी पुरावा अविश्‍वसनीय मानून (कारण प्रत्यक्ष एक साक्षीदार रामचंद्र बाळकृष्ण लेले हे हिन्दुधर्म सोडून ख्रिस्ती बनलेले होते) तसेच गोपाळराव जोशांचा पुरावा ‘ढुंगणाने सोडून डोईस गुंडाळल्याप्रमाणे’ अव्यवस्थित व खोडसाळ असा ठरवून, आणि रेव्हिंगटसाहेबांचा सर्व आधार गोपाळराव जोशी म्हणून त्यांचाही पुरावा विशेष जमेस न धरतां, शेवटी असा सिद्धांत काढला की, अमुक मनुष्याने अमुकच पदार्थ सेवा केला असे वादींकडून सिद्ध झाले नाही……चहा हा केवळ मिशन हाऊसच्या सभागृहात गोपाळराव जोशी यांच्या कारस्थानाने अगदी वेळेवर पुढे करण्यात आला, वगैरे लिहून कमिशनने खालीलप्रमाणे व्यक्तिशः निकाल दिला…..मिशन हाऊसमध्ये हजर असून चहा घेतलेले 4 असे – बळवंतराव टिळक, वासुदेवराव जोशी, रामभाऊ साने आणि सदाशिवराव परांजपे पैकी टिळकांनी चहा घेतल्यानंतर श्रीक्षेत्र काशीस जाऊन सर्व प्रायश्‍चित्त घेतल्याचा खात्रीलायक दाखला दिला. शिवाय पुण्यासही दोन कृच्छे प्रायश्‍चित्त केले. म्हणून त्यांनी आणखी प्रायश्‍चित्त घेण्याचे कारण नाही असे कमिशनने ठरविले. व बाकी तिघांनी चांद्रायण एक व सांतपन हे प्रायश्‍चित्त घ्यावे असा हुकूम झाला. 8 जणांनी ज्ञाताज्ञातदोषनिवारणार्थ प्रायश्‍चित्त मिळाल्याबद्दल अर्जच दिला होता. सबब त्यांना तो त्यांचा अर्ज बहाल करून सर्व प्रायश्‍चित्त घेण्याचा हुकूम झाला.”

“धार्मिक वादाप्रमाणे टिळकांच्या दृष्टिने यांत एक स्थानिक वाद ही गुंतला होता. रानड्यांना कोणाशी भांडावयाचे नव्हते. म्हणून त्यांनी सरळपणे खुद्द पुण्यास येऊन जवळ जवळ जाहीर रीतीनें प्रायश्‍चित्त घेतलें, व पंचहौद-मिशन चहापानाच्या आरोपाकरितां ते घेतले अशी सरळ कबुली दिली.”

समाजात बहिष्कृत झालेल्या टिळकांवर आलेल्या नामुष्कीचे वर्णन नरहर रघुनाथ फाटक यांनी’लोकमान्य’ या चरित्रात केले आहे. “टिळक लोकनेते असल्याने अनेक लोकांचे त्यांच्याकडे जाणे-येणे असायचे, विविध कार्यक्रमांवेळी भोजन-पंक्ती उठायच्या. ग्रामण्याच्या काळात गोष्टी बंदच झाल्या. बहिष्कृत टिळकांना त्यांच्या विविध धार्मिक कार्यांसाठी भटजी आणि आचारीही मिळेना. कित्येक वेळा टिळकांच्या कुटुंबाला शेजारणी बायांकडून जिन्नस पान्नस करवून घ्यावे लागले, व त्यांच्या एका संस्थानिक मित्रानेंच बाहेरुन जेव्हा आपले आचारी पुरवले तेव्हाच लग्नमुंजीच्या समाराधना उठल्या.”

1893 साली त्यांचा थोरला मुलगा विश्‍वनाथ याचा व्रतबंध झाला. त्यावेळी ब्राह्मण मिळेना. 1893 साली त्यांच्या थोरल्या मुलीचा विवाह झाला. त्यावेळी सुदैवाने त्यांचे व्याही बापूसाहेब केतकर सुधारणावादी आणि प्रार्थनासमाजिस्ट असल्याने टिळकांवरचे संकट टळले.”

लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आढावा घेताना ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांनीही या चहापान प्रकरणावर टिपण्णी केली आहे. “टिळक, गीता आणि रहस्य’ या लेखात हर्डीकर लिहितात: “पुण्यात उपद्‌व्यापी माणसं काही थोडी होती काय? त्यांनी पंचहौद मिशनमध्ये ते चहा पिण्याचं प्रकरण उकरुन काढलं. त्यावेळी आधुनिक मताचे लोक आणि पारंपरिक मताचे लोक असा संघर्ष पेटला होता. टिळक वकील होते. ते रातोरात काशीला गेले; तिथे गंगेत एका डुबकी मारली आणि ते सर्टिफिकेट आणून त्यांच्यासमोर टाकले. लोक याला त्यांच्या प्रतिगामीपणाचा पुरावा मानतात; पण हा त्यांच्या चातुर्याचा पुरावा आहे ! पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही.”

पुणे शहराच्या या एका वादळी घटनेचे साक्षीदार असलेल्या या पंचहौद चर्चने-पवित्र नाम देवालय किंवा होली नेम कॅथेड्रलने-अलिकडेच 130 वर्षे पूर्ण केली आहेत. गोपाळरावांच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे पुणे शहरातील एक मोठा समाज दोन गटांत दुभंगला गेला. एक साधी चर्चहाऊसला भेट देण्याची, तेथे काही मोजक्‍या लोकांनी चहा पिण्याची घटना पण त्यामुळे अख्ख्या शहरातील जीवन जवळजवळ दोन वर्षे कसे ढवळून जाऊ शकते, हे या स्टिंग ऑपरेशनद्वारे गोपाळराव जोशी यांनी दाखवून दिले.

संदर्भ. – नरसिंह चिंतामण केळकर, लोकमान्य टिळक यांचे चरित्र, (पूर्वार्ध सन 1899 अखेर), (1923)

– रमाबाई रानडे , आमच्या आयुष्यातील काही आठवणी वरदा प्रकाशन (2012)

– निवडक शकुंतला परांजपे, संपादक विनया खडपेकर, राजहंस प्रकाशन (2017)

– विनय हर्डीकर, टिळक, गीता आणि रहस्य’ साधना दिवाळी अंक

————

Camil Parkhe

Journalist, author, blogger

9922419274

https://camilopark.blogspot.com
https://camilpark.blogspot.com
https://camilparkhe.blogspot.com