विश्वंभर चौधरी
आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी जनता कर्फ्यु लागला होता. मग दिल्लीच्या सर्वोच्च सरांनी टीव्हीवर येऊन ‘आज रात बारा बजे के बाद..’ वगैरे नोटाबंदीच्या वेळची हिरोगिरी केली आणि एक दुःस्वप्न सुरू झालं. गरीब माणसं मुलाबाळांसह, बायकांसह, वृद्धांसह शेकडो किलोमीटर तळपत्या उन्हात डांबरी रस्त्यावर चालायला लागली. काही मेली, काही जन्माचं दुखणं घेऊन घरी पोचली. शहरात होती ती उपाशी राहिली, कुठल्या तरी मदतीच्या प्रतिक्षेत त्यांचे प्राण कंठाशी आले.
आपल्यापेक्षा अप्रगत देश असलेल्या बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी चार दिवसांची मुदत घोषित करून मग लाॅकडाऊन लावला पण आपल्या अकराव्या अवताराची… असो.
चालणारांना, मरणारांना एकच एक धर्म किंवा जात नव्हती. ते नसल्यामुळे राजकारणात त्याचा उपयोग नव्हता. म्हणून विवेक अग्निहोत्री सारख्या अलौकिक प्रतिभेचा धनी असलेल्या दिग्दर्शकाला या विदारक तितक्याच नागड्या सत्यावर चित्रपट काढावा असं वाटलं नाही.
गरीब माणसं मरण्यासाठीच जन्मतात. त्यांना या देशात कोणी वाली नसतो, नाही, असणार नाही. अस्मिता आणि द्वेषाच्या बाजारात हा माल खपत नाही. म्हणून त्याला भाव नाही.