सेक्युलवाद्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध का ? या विषयावर विशेष संवाद !

सेक्युलवाद्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध का ? या विषयावर विशेष संवाद !

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला ‘व्ही.पी. सिंग सरकार’सह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – श्री. ललित अंबरदास, काश्मिरी विचारवंत

मुंबई : वर्ष 1990 मध्ये केंद्रात व्ही.पी. सिंग यांचे सरकार असतांना एका दिवसात काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झालेला नाही, तर त्याची सिद्धता खूप वर्षे आधीपासून चालू होती. आधी पैसा पुरवठा, शस्त्रास्त्र प्रशिक्षण, शस्त्र पुरवठा केला गेला. वर्ष 1989 मध्ये फारूक अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. त्या वेळी काश्मिरी हिंदूंचे नेते टिकालाल टपलू, तसेच न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांच्यासह अनेकांच्या हत्या केवळ ते ‘हिंदू’ होते, म्हणून करण्यात आल्या. खरे तर जवाहलाल नेहरू आणि काँग्रेस यांनी काश्मिरमध्ये ‘कलम 370’ आणि ‘कलम 35 अ’ लागू केल्यापासून हिंदूंच्या नरसंहाराला प्रारंभ झाला होता. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांचा पक्षही उत्तरदायी आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काश्मिरी विचारवंत आणि अभ्यासक श्री. ललित अंबरदास यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘सेक्युलवाद्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध का ?’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात सहभागी झाले होते. ‘काश्मिरी नरसंहाराला केवळ ‘व्ही.पी. सिंग सरकार आणि त्यांना पाठिंबा देणारा भाजप जबाबदार आहे का’, या काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देतांना वरील वक्तव्य केले. अशाप्रकारे दिशाभूल करणार्‍या अनेक आरोपांचे खंडन करतांना श्री. ललीत अंबरदास यांनी सडेतोड उत्तरे दिली.

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट मुसलमानांच्या विरोधात आहे, तसेच त्या वेळी हिंदूंच नव्हे, तर हजारो मुसलमानही मारले गेले, या प्रश्‍नावर उत्तर देतांना श्री. अंबरदास म्हणाले की, 90 च्या दशकात मशिदींच्या ध्वनीक्षेपकावरून हिंदूंच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. ‘यहा चलेगा निजाम-ए-मुस्तफा’, ‘ए हिंदू काश्मीर छोडकर चले जाव’, ‘हिंदूंनो, तुम्ही तुमच्या बायका येथेच सोडून निघून जा’ अशा घोषणा हिंदू देत होते का ? तसेच सैन्यात देशासाठी काम करणारे फैय्याज आणि औरंगजेब आदी एक-दोन काश्मिरी मुसलमान सोडले, तर बहुतांश मुसलमान हे जिहाद, आतंकवाद, तसेच भारतविरोधी कारवाया करतांना मारले गेले आहेत. त्यांची मोजदाद हिंदूंसह करता येणार नाही. 

तसेच काश्मिरी मुसलमानांनी तेथे हिंदूंना वाचवले असते, तर हिंदूंना काश्मीरमधून विस्थापित होण्याची वेळ आली नसती. तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी खर्‍या अर्थाने काश्मिरी हिंदूंना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यामुळेच आज काश्मीर भारतात आहे. यामुळेच काँग्रेस, कम्युनिस्ट, लिबरल, सेक्युलवादी हे जगमोहन यांना सतत लक्ष करून बदनाम करत आहेत; पण ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे काँग्रेस, कम्युनिस्ट, लिबरल, सेक्युलवादी यांनी 32 वर्षे लपवलेले सत्य जगासमोर आल्यामुळेच ते बिथरले आहेत. आता मोदी सरकारने काश्मिरमध्ये ‘हिंदूंचा नरसंहार झाला’ हे वास्तव स्वीकारून संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमाप्रमाणे त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही श्री. अंबरदास यांनी संवादाच्या समारोपाच्या वेळी केली.