नागराज मंजुळे आणि आंबेडकरी सिनेमाचा नवा प्रवाह

नागराज मंजुळे आणि आंबेडकरी सिनेमाचा नवा प्रवाह

निखिल वागळे

आतापर्यंत तुमच्यापैकी अनेकांनी झुंड बघितला असेल. फेसबुकवर बऱ्याच मित्रांनी झुंडविषयी उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यामुळे झुंड सिनेमाचं नव्याने परिक्षण करावं असं मला वाटत नाही.

एक माणूस म्हणून मला हा सिनेमा नखशिखांत हलवून गेला. हा उद्याच्या भारताचा सिनेमा आहे असं मला वाटतं. विषमतापूर्ण समाजात जगताना संधी मिळाली की तरुण मुलं कशी सोनं करतात हे नागराज मंजुळे यांनी फार प्रभावीपणे दाखवून दिलं आहे. ही फक्त एका फुटबॅाल टीमची कहाणी नाही, ही बंड करु पहाणाऱ्या बहुजन समाजाची कहाणी आहे. पुन्हा पुन्हा घ्यावा असा हा अनुभव आहे. हा १७८ मिनीटांचा दीर्घ सिनेमा तुम्हाला पकडून ठेवतो. जात-धर्मा पलिकडे तो पोहेचतो. काश्मीर फाईल्स द्वेष निर्माण करत असेल तर झुंड दुर्दम्य आशा निर्माण करतो.

माझा मुद्दा त्या पुढचा आहे. फॅंड्री, सैराट, झुंड या तिन्ही सिनेमात एक समान सूत्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरुन नागराज आपली हटके कहाणी सांगतो. फॅंड्रीमध्ये जब्याने समाजावर भिरकवलेला दगड आठवणीतून जात नाही. सैराट मधलं आंतरजातीय प्रेम आणि संघर्ष, शेवटची हिंसा तुम्हाला विचारात पाडते. झुंड तर पुढे जाऊन बंडाची सकारात्मक दिशा निश्चित करतो.

हा आंबेडकरी सिनेमा आहे. नागराजने हा प्रवाह मराठीत सुरु केला आणि आता त्याला तो हिंदीत घेऊन चालला आहे. दक्षिणेकडे पी. रंजीत वगैरे दिग्दर्शकांनी दलित सिनेमाची ही चळवळ आक्रमकपणे पुढे रेटली आहे. कालापासून असुरनपर्यंत अनेक उदाहरणं देता येतील. पण दक्षिणेचा हा सिनेमा काहीसा ढोबळ वाटतो. नागराजचा सिनेमा अधिक खोलवर जाणारा आहे. तो केवळ आक्रमण करत नाही, तुमच्या विवेकाला हात घालतो.

सिनेमातून दलित प्रश्न आजवर आले नाहीत असं अजिबात नाही. सत्यजित राय, श्याम बेनेगलपासून सुमित्रा भावेपर्यंत अनेकांनी ते प्रभावीपणे हाताळले. पण नागराज किंवा पी रंजीत हे त्यांच्याप्रमाणे आऊटसाईडर नाहीत, ते इनसायडर आहेत. स्वत:च्या आयुष्यात ही वेदना त्यांनी अनुभवली आहे. त्यामुळे त्यांचं सादरीकरण अधिक प्रखर आहे. मी मसानचे दिग्दर्शक नीरज घयावान यांचा समावेशही यात करीन.

७० च्या दशकात दलित साहित्याने जे केलं तेच ही आंबेडकरी सिनेमाची चळवळ करु पहातेय. संगीत आणि इतर कलाक्षेत्रातही या आंबेडकरी प्रेरणेचा प्रभाव जाणवतोय. विठ्ठल उमप, शिंदे मंडळी या प्रवासातले शिलेदार आहेत. दलित चित्रकलेची चळवळही स्थिरावू पहातेय. ही वेगळी संस्कृती आहे, समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याची ताकद त्यात आहे.

वाईट या गोष्टीचं वाटतं की अजून सवर्ण प्रभावाखाली असलेली मुख्य प्रवाहातली माध्यमं यावर चर्चा करायला तयार नाहीत. अर्थात, ज्यांनी फुले-आंबेडकरांची दखल घ्यायलाही अक्षम्य दिरंगाई केली त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? म्हणून सोशल मिडियातून ही चर्चा रेटली पाहिजे.

पुन्हा एकदा, नागराज आणि टीमचं अभिनंदन, एक बंडखोर सिनेमा निर्माण केल्याबद्दल. असंच चालू ठेवा, एक दिन जमाना आपको सलाम करेगा!