‘ऑल इंडीया पिस मिशन’ चे शांततेचा संदेश देणा-या चर्चासत्राचे पुण्यात आयोजन
पिंपरी, पुणे (दि. २१ मार्च २०२२) देशाची शांतता आणि अखंडता कायम ठेवणे हे सर्व देशवासियांचे प्रथम कर्तव्य आहे. परंतू मागील आठ वर्षात देशामध्ये अशांतता, व्देष निर्माण करण्याचे काम काहि संस्था, संघटना करीत आहेत. कट्टरतावादाची विचारसरणी जोपासणा-या अशा संस्थांचा सर्वांनी निषेध केला पाहिजे आणि त्या विरुध्द लढून सर्व धर्मसमभाव वाढीस लावण्याचे काम केले पाहिजे. या उद्देशाने ‘ऑल इंडीया पिस मिशन’ (All India Peace Mission) देशभर काम करीत आहे. अशा व्देषाच्या आणि अशांतता निर्माण करणा-या वातावरणात शांततेचा आणि सद्भावनेचा संदेश देशभर देण्यासाठी यावर्षी विविध परिसंवाद, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती ऑल इंडिया पिस मिशनचे संस्थापक अध्यक्ष दया सिंह यांनी दिली.
या वर्षी गुरु तेग बहादूर सिंह साहेब यांची ४०० वी जयंती (प्रकाश वर्ष) शिख समाज देशभर साजरी करीत आहे. शिख समाजाचे ९ वे गुरु तेग बहादूरसिंग साहेब यांनी आपले जीवन शिख, मुस्लिम, हिंदू समाज यांच्यामध्ये प्रेमपुर्वक, आदरभाव संवाद वाढण्यासाठी समर्पित केले. त्यांनी घालून दिलेली आदर्श विचारसरणी आणि त्यांचे जीवन चरित्र आगामी काळात देशाची अखंडता टिकविण्यास मार्गदर्शक ठरेल. यासाठी १७ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे येथे ‘हक – ए – अमन’ (Right To Peace) या शिर्षकाखाली राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादामध्ये ऑल इंडिया पिस मिशनचे संस्थापक अध्यक्ष दया सिंह, राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र सिंह वालिया, भोलासिंह अरोरा, समिर शेख आणि संस्थेचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ऑल इंडिया पिस मिशनचे संस्थापक अध्यक्ष दया सिंह यांनी दिली.
सोमवारी (दि. २१ मार्च) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दया सिंह बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समन्वयक राजेंद्रसिंह वालिया उपस्थित होते. मागील आठ वर्षात काही व्यक्ती, संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष हे देशातील शांतता भंग करण्याचे काम करीत आहेत. यातून शिख आणि मुस्लिम समाजाला लक्ष करुन वेगळे पाडण्याचा जाणिवपुर्वक प्रयत्न केला जात आहे. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये हे प्रकर्षाने जाणवले. उत्तर प्रदेशात ८० विरुध्द २० अशी मतांची विभागणी करण्यात आरएसएस सारख्या संस्था यशस्वी झाल्या. हिंदुत्वाच्या नावाखाली काही हिंदू एक झाले आणि इतर हिंदूमध्ये फुट पडली त्यामुळे भाजपा तिथे यशस्वी झाले. पंजाबमध्ये आरएसएसने अरविंद केजरीवाल यांना पुढे करुन पंजाबी समाजात फुट पाडली. विशेषता शिख आणि हिंदूमध्ये फुट पाडण्यात ते यशस्वी झाले आणि आपचे सरकार प्रथमच पंजाबमध्ये आले. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आरएसएस सारख्या कडव्या विचारसरणीच्या व्यक्ती व संस्थांनी, संघटनांनी हिजाबचा मुद्दा काढला. त्यामुळे ओवेसी यांच्या सारखे मुस्लिम नेतृत्व पुढे येत आहे. यातून आणखी कट्टरतावाद वाढत जाईल. हिजाबचा मुद्दा फक्त मुस्लिमांपुरताच मर्यादित नसून पुढील काळात शिख समाजाला देखिल यामुळे धोका उद्भवतो असे प्रतिपादन दया सिंह यांनी केले.
याविषयी बोलताना ते म्हणाले की, शिख मुली डोक्यावर ‘दस्तार’ घेतात यावर देखील कट्टरतावादी आक्षेप घेतील. हे संविधान विरोधी आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शिख – मुस्लिम – हिंदू या सर्व धर्मियांचे महत्वपुर्ण योगदान आहे. ‘ काश्मीर फाईल’ चित्रपट आणि त्यांना प्रोत्साहन देणा-या संस्था, संघटना देशाला नविन धोक्याच्या वळणावर नेऊ पाहत आहे. काश्मीर फाईलला एवढे पाठबळ मिळत असेल तर १९८४ साली झालेल्या दंगलीची फाईल काढणार का ? तसेच १९९९ मध्ये बिल क्लिंटन भारतात येणार होते. त्यावेळी ३५ शिख व्यक्तींची हत्या झाली. त्याची फाईल काढणार का ? असा प्रश्न दया सिंह यांनी उपस्थित केला. आमची अशी मागणी आहे की, असे जुने वादविवाद असणारे मुद्दे उपस्थित करुन देशाची शांतता आणि अखंडतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करुन नये. अशा कट्टरतावाद आणि धार्मिकतावादामुळे भारताची पुन्हा फाळणी होण्याची भिती दया सिंह यांनी व्यक्त केली. अशा कलुषीत वातावरणात गुरु तेग बहादूर सिंह साहेब यांचे जीवन चरित्र मार्गदर्शक ठरेल असा आशावाद ऑल इंडिया पिस मिशनचे संस्थापक अध्यक्ष दया सिंह यांनी व्यक्त केला.