पाणी पुरवठा विषयी शहर महिला कॉंग्रेसचे गुरुवारी पिंपरीत आंदोलन

पाणी पुरवठा विषयी शहर महिला कॉंग्रेसचे गुरुवारी पिंपरीत आंदोलन

पिंपरी (दि. २२ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात पवना धरणातून आणि काही भागात एमआयडीसीतून पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी पवना धरण शंभर टक्के भरले होते. शहरात २४x७ पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन मनपा प्रशासन आणि पदाधिका-यांनी अनेकवेळा दिले होते. अद्यापही शहरात अनियमित आणि अवेळी अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. या विषयावर दि. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने मनपा भवनावर जन आंदोलन करीत हंडा मोर्चा काढला होता. त्यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी पुढील पंधरा दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करु असे महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले होते.


आयुक्त राजेश पाटील आणि त्यांच्या प्रशासनाने अद्यापही पाणी पुरवठ्याबाबत गांभिर्य दाखविलेले नाही. याचा निषेध म्हणून गुरुवारी (दि. २४ मार्च) सकाळी १०:३० वाजता पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नढे बोलत होत्या. यावेळी जेष्ठ नेत्या निगार बारस्कर, डॉ. मनिषा गरुड, निर्मला खैरे, वैशाली शिंदे, सीमा हलकट्टी, रिटा फर्नांडिस आदी उपस्थित होते.यावेळी सायली नढे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराला रोज ६०० एमएलडी पाणी लागते. यापैकी ३० एमएलडी पाणी एमआयडीसीकडून दिले जाते. उर्वरीत पाणी पवना धरणातून घेतले जाते. तसेच पवना धरणातून वाघोली पाणी पुरवठा योजनेसाठी हि ३० एमएलडी पाणी दिले जाते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांसाठी २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहीनी प्रकल्प, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना आणि आंद्रा धरणातूनही पाणी घेऊन शहरातील नागरीकांना देणार होते. मागील पाच वर्षात पवना बंद जलवाहिनी प्रकल्प जैसे थे आहे. भाजपाचे पदाधिकरी या प्रकल्पाविषयी शहरात एक बोलतात आणि मावळात दुसरेच बोलतात. नागरीकांची दिशाभूल करण्यात भाजपने पाच वर्षे घालवली. भामा – आसखेड – आंद्रा पाणी पुरवठा योजनेसाठी हजारो कोटींचा खर्च करुन अद्यापही प्रकल्प पुर्ण झालेले नाहीत. भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेले पाणी पुरवठ्याचे एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. उलट प्रशासनाने मार्च एण्डिंगचे कारण सांगून नागरिकांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यासाठी अनेक पथके नेमली आहेत आणि युध्द पातळीवर मिळकत कर वसुली तसेच पाणी पुरवठा तोडण्याचे काम सुरु आहे याचाही महिला कॉंग्रेस निषेध करीत आहे.


एमआयडीसीकडून आकुर्डी, निगडी, भोसरी, आनंदनगर झोपडपट्टी आणि मनपा भवन समोरील रत्ना हॉटेल परिसरासाठी पाणी पुरवठा होतो. जुन्या कनेक्शनसाठी १८ ते १९ रुपये प्रती हजार लिटर दर असा एमआयडीसी दर आकारते. हा दर मनपाच्या पाणी पट्टी दरापेक्षा दुपट्टीहून जास्त आहे हा नागरिकांवर अन्याय आहे. शहरातील पाण्याची गरज पाहता केंद्र सरकारच्या अनुदानातून अमृत योजना प्रकल्पही राबविण्यात येत आहे. यामध्येही २४ तास मुबलक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मागील पाच वर्षात या योजनेसाठी शहरातील बहुतांशी रस्ते खोदाई करुन जलवाहिनीटाकण्यासाठी हजारो कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. अशा विविध योजनांव्दारे नागरिकांच्या पैशाचा चुराडा मागील पाच वर्षात भाजपाच्या पदाधिका-यांनी केला आहे. आगामी आठ दिवसात शहरातील झोपडपट्टी, गावठाण व चाळींमधिल परिसरातील पाणी पुरवठा प्रशासनाने सुरु करावा अशी मागणी गुरुवारच्या आंदोलनाव्दारे महिला कॉंग्रेस करणार आहे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.