स्वयंरोजगार व उद्योजकता विकास कार्यशाळा महात्मा फुले महाविद्यालयात संपन्न

स्वयंरोजगार व उद्योजकता विकास कार्यशाळा महात्मा फुले महाविद्यालयात संपन्न

पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार व उद्योजकता विकास कार्यशाळा गुरुवारी (दिनांक 17 मार्च) पार पडली. सदर कार्यशाळेत पहिल्या सत्रात सुरेश उमप (विभागीय अधिकारी नवी मुंबई) यांचे उद्योजकीय व्यक्तिमत्व उद्योग संधी या विषयावर व्याख्यान झाले. त्या व्याख्यानात त्यांनी उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये सविस्तर विशद केली, तसेच उद्योगाच्या असणाऱ्या विविध संधीचा परामर्श घेतला.

दुसऱ्या सत्रात गणेश खामगळ (संचालक, मिटकॉन फोरम, पुणे) यांचे उद्योजकता विकास शास्त्र व शासकीय योजना या विषयावर व्याख्यान झाले. त्या व्याख्यानात त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय, येथून मिळणारी माहिती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सविस्तर सांगितली. तिसऱ्या सत्रातउद्योजक दिगंबर सुतार, यांनी अनुभव कथन केले. जिद्द, चिकाटी, अविरत परिश्रम व परिश्रमात सातत्य यांच्या बळावर आपण उद्योजक म्हणून कसे यशस्वी झालो, याची तपशीलवार माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड होते. त्यांनी आजच्या या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर गुणवत्तेला माणसातील माणूसपणाला जपणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ. पांडुरंग भोसले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ.शुभदा लोंढे यांनी करून दिला.

कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर व उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, आय.क्यू.ए.सी चेअरमन डॉ. नीलकंठ डहाळे, महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच बा. रा. घोलप महाविद्यालय, सांगवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, औंध, श्रीमती सी.के.गोयल महाविद्यालय, दापोडी, महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी या महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कामायनी सुर्वे, प्रा. विजया पोकळे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. संदीप नन्नावरे यांनी मानले. तांत्रिक सहाय्यक प्रा. प्रीती नेवसे यांनी केले