सर्वसामान्यांच्या नजरेतुन साहेब

सर्वसामान्यांच्या नजरेतुन साहेब

अॅड. बाळासाहेब आ. खोपडे

मी राष्ट्रवादी पक्षाचा सभासद नाही समर्थकही नाही. किंवा पवार साहेबांना भेटलोही नाही. उलटपक्षी माझे मोठे बंधू सुरेश खोपडे (IPS rtd.) यांनी सुप्रीयाताई सुळे यांचे विरूध्द लोकसभेची निवडणूक लढवीली होती. तरीही माझ्या सर्वासामान्य नजरेने दिसलेले पवार साहेब यांचेबद्दल लिहीलेला लेख इडीच्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रसिध्द करित आहे.

“सर्वसामान्यांच्या नजरेतुन साहेब”

साधारण १९६७-६८ साल असावे. मी ५ वी किंवा सातवीत असेल. आमच्या मोरगांवातील आमची मराठी शाळा एका टोलेजंग वाड्यात भरत असे. दगडी व विटांचा भलाथोरला बुरूज. खुप मोठा भव्य लाकडी दरवाजा त्यावर मोठाले बाहेरच्या बाजुस टोक काढलेले जाडजुड खिळे. बहुतेक हत्तीने धडका देउ नये म्हणून बसवलेले असावे अस सांगितलं जायच. दरवाजाला उजव्या बाजुस खाली चौकोणी लहान दिंडी दरवाजा ठेवलेला. दारातुन आत गेल की उजव्या बाजुला चौथरा. समोर मोठ आंगण आंगणात वाळु पसरवलेली. आंगणानंतर तीन मजली मोठी तिन कप्याची इमारत. पाठी मागे आड व त्याभोवती दगडी फर्सी बसविलेली. प्रत्येक मजल्यावर प्रशस्त खोल्या. इमारतीत पहिली ते सातवी पर्यत वर्ग भरूनही आर्धी इमारत रिकामी राहायची. दरवाजा ते इमारत याच्या मधे मोठ अंगण. शाळेत कसल्याश्या जयंत्या, पुण्यतीथीचे सभा, कार्यक्रम त्या मोकळ्या जागेत भरत. भाषण ठोकायला मी सगळ्यांच्या पुढे असे. वर्ग शेणाने सारवायचा असेल तर त्या वर्गातील मुलांना त्या मोकळ्या जागेत बसवल जाई.

एक दिवस कसलीही जयंती पुण्यतीथी नसतांनाही सर्व विद्यार्थ्यांना खाली आणुन बसवल. विद्यार्थ्यांचा गोंधळ चालु होता. तेवढ्यात टकले गुरूजी मोठ्या दरवाज्यातुन धावत पळत आले. विद्यार्थ्यांना दरडावून गप्प बसवल व आदबिने ऊभे राहिले. त्यांच्या सोबत इतरही शिक्षक आदबीने उभे राहिले. मोठ्या मुख्य दरवाजातून मुख्याध्यापका सोबत एक तरूण जोडप आत आले. सहाफुटाच्या आसपास उंची,भव्य कपाळ गोय्राकडे झुकणारा रंग अंगात पांढरा शुभ्र झब्बा पायजमा. सोबतीला डोक्यावर पदर घेतलेली तरूणी.

त्यांचा सत्कार मुख्याद्यापक ढेरे गुरूजींच्या हस्ते झाला. तेव्हा समजल की ते तरूण गृहस्थ म्हणजे आमदार शरदचंद्र पवार व सोबत त्यांच्या पत्नी प्रतीभाताई. त्यांच नुकतच लग्न झालेल होत. व ते गणपतीला दर्शनाला जाण्याऐवजी आमच्या मराठी शाळेला भेट देण्यासाठी आले होते.

१९७२ सालच्या पडलेल्या भंयकर दुष्काळात संपूर्ण महाराष्ट्र होरपळुन निघाला होता. पवार साहेबांच्या प्रयत्नाने दुष्काळी कामे सुरू झालेली. मी त्यावेळी एसएससी. जुनी ११ वी मध्ये होतो. वार्षीक परिक्षा केंद्र १६ की.मी. अंतरावरील निरा येथे होते. त्या काळी बारामती, निरा, सासवड येथेच परिक्षा केंद्र होती. दुष्काळी कामावर काम करून माझ्या सारख्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत होते. निरा येथे परिक्षे साठी राहण्याची व्यवस्था शाळेने केली होती. परंतु दहा दिवस खायच काय हा मोठा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्यांना पडलेला. परंतु पवार साहेबांनी निरा, बारामती, सासवड परिसरातील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने सर्व केंद्रावर दहाही दिवस सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था केली होती. जेवणही आगदी पंचपक्वान्नच आयुष्यात कधीही न मिळालेल पुरी भाजीच जेवण. परिक्षेच्या शेवटच्या दिवशी पेपर झाल्यावर मोठा मांडव घातलेला. त्यात सर्व प्रतिष्ठित, व्यापारी मंडळी, पवार साहेब विद्यार्थ्यां सोबत जेवायला मांडी घालुन बसलेले .दुष्काळातही जेथे खायला मिळायची पंचायत तेथे आम्हाला सूग्रास जेवण मिळाले.जेवणानंतर सभा झाली.अर्थातच विद्यार्थ्यांच्या तर्फे मी भाषणं केले.पवार साहेबांची तुलना शुभाषचंद्र बोस यांचे बरोबर केली होती व त्यावर पवार साहेबांनी मला आडवलेल चांगलच आठवतय.त्या नंतर पवारसाहेब रेडीओवरील व वर्तमानपत्रातील बातम्यातुन भेटत राहीले.शालेय शिक्षण संपवून मी नविनच निर्माण केलेल्या सासवड कॉलेज मध्ये २० रूपये अनामत रकमेच्या जोरावर कमवा शिका योजने अर्तंगत प्रवेश घेतला होता.त्या काळात व आजपर्यंत पवारसाहेब,ना.ग गोरे,अहिल्या रांगणेकर , एस एम जोशी, मोहन धारीया, ग प्र प्रधान, भाई वैद्य,मृणाल गोरे,जॉर्ज फर्नांडीस,संभाजीराव काकडे यांची भाषणे ऐकली,लिखाण वाचल.त्यांना प्रत्यक्षात कधी भेटलो नाही.पंरतु हि माणंस का कोणास ठाऊक उगीचच खुपच जवळची, आपुलकीची व हक्काची वाटायची.

आमच्या लहानपणी बारामती तालुक्यात काकडे घराणे राजकीय ,सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सहकार क्षेत्रात खुपच तालेवार व नावाजलेल इतक होत की तालुक्यात गावगन्ना संध्याकाळच्या पारावर गावकय्रांच्यात त्यांच्या विषयीच्या गप्पा चालत असे.परंतु त्या घराण्याची जागा पवार घराण्याने कधी घेतली हे लोकांना समजल सुध्दा नाही.

पवार साहेबांच्यावर अनेक आरोप झाले.विशेषतः ठाकरी भाषेत जास्त झाले. “बारामतीचा म्हमद्या” हा आरोप वाचला की मला जातीय सलोखा विशेषतः हिंदू मुस्लिम सामाजिक सलोख्यासाठी धडपडणारे पवार साहेब दिसतात.”मैद्याच पोत” हाआरोप वाचलाकी ७१-७२ च्या भयानक दुष्काळात दुष्काळी कामावर लोकांसाठी गावागावात पीठाची (आटा), गव्हाची, सातुची, मिलोची (आमेरीकेहून आयात केलेली लाल ज्वारी की जी तेथील डुक्करांच खाद्य) सुकडीची पोती पोहचविण्यासाठी आटापीटा करणारे शरद पवार दिसतात.

“त्यांच्या विरूद्ध भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे आहेत” हा आरोप वाचला की खिल्लारीच्या भुकंपात वाताहात झालेल्या गावागावातुन मदत कार्यासाठी बैलगाडीतुन प्रसंगी पायी वणवण फिरणारे शरद पवार दिसतात.”पाठीत खंजीर खुपसनारे” ह्या आरोपावर सत्ता असो वा नसो पडद्या पाठीमागे राहून असंख्य आर्थिक ,सामाजीक ,शेतविषयक सुधारणेसाठी धडपडणारे पवारसाहेब दिसतात.गायीच काय पण कोणत्याही पाळीव जनावरां बाबत, त्यांच्या उपयुक्तते बाबत कसलीही आक्कल नसणारे, गोरक्षणाच्या नावाखाली सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर धुमाकुळ घालणाऱ्या तथाकथित गोरक्षकांच्या हैदोसाच्या पार्श्वभूमीवर ,महाराष्ट्रात लागोपाठ पडलेल्या दुष्काळात शेतकऱ्यांच्याकडील जनावरांच्या साठी ठीक ठीकाणी चारा छावण्या उघडून जनावरे जगवण्याची धडपड करणारे,फळबागांना ,दुग्धव्यावसायाला प्रोत्साहन देणारे पवारसाहेब, शेतकरी,शेतमजुरी पार्श्वभूमी असलेल्या आम्हा लोकांनाआभाळाहूनही मोठे वाटतात.

नाही नाही ते आरोप सहज चिकटणारे व्यक्तीमत्व असणारे बहुदा देशातील एकमेव नेता जेव्हा आमच्या वस्तीजवळिल ओढ्याची खोली वाढवीण्याच्या कामाची पहाणी करण्यासाठी स्वतःजातीने येऊन कांही सुचना करून व कार्यकर्त्याच्या पाठीवर चांगल्या कामासाठी थाप मारून जातो तेव्हा वैयक्तिक, राजकीय स्वार्थासाठी त्यांच्यावर आरोपकरणारांची खरोखर किवच येते.

सन १९९१साली सुप्रीया ताईचं लग्न होते.लग्न बारामतीला होत.लग्नाच्या एक आठवडा आधी पवार साहेब आमच्या गावात, वस्तीवर अचानक आले.पवारसाहेब आले हि बातमी वाय्रासारखी सगळीकडे पसरली गावातील बरीच लोक कामधंदा सोडुन देवळाच्या कट्टयावर जमली.पवारसाहेब मुख्यमंत्री आसुनही निवांत होते.पोलीस पाटिल विष्णू ढोलेकदम यांनी त्यांच स्वागत केल.पवार साहेबांनी सांगीतल माझ्या मुलीच पुढच्या आठवड्यात लग्न आहे.लग्नाच निमंत्रण द्यायला आलेलो आहे.लग्ना दिवशी खुप गर्दी असणार आहे.तेथे मी तुम्हाला भेटू शकणार नाही.लग्नात जेवणाची व्यवस्थाही नसणार आहे.आज मी सर्व वाड्या वस्त्यांवर निमंत्रण द्यायला जाणार आहे.हे ऐकल्या बरोबर विष्णू पाटलांनी तत्काळ पळत जाऊन प्रेमचंदकाकाच्या दुकानातु टोपी फेटा, ड्रेसच कापड, साडी ब्लाउज पीस आणुन गावांतर्फे पवार साहेबांच्या डोक्यात थरथरत्या हाताने कपाळाला कुंकवाचा उभा टिळा लावून नवीकोरी टोपी घालुण लग्नाचा आहेर केला.असा आहेर गावकऱ्यांकडून ना कोणाला या पुर्वी मिळाला ना येथुनपुढे कधी मिळेल. धुळ उडवीत कच्या रस्त्यावरू त्यांच्या गाड्यांचा ताफा आमच्या परिसरातील वाड्या वस्तीवरून मुलीच्या लग्नाच निमंत्रण द्यायला फिरू लागला. निवडणूकीत मत मागायला आमच्या मतदारसंघात कधीही न फिरनारे साहेब वधुपीता म्हणून पाच दहा घर असलेल्या वस्तीवरही जाऊन लग्नाच निमंत्रण देत होते.शेतकरी ,शेतमजुर, बाया ,बापड्या ह्या राजबिंड्या आधुनिक राजाला आपल्या पडक्या घरासमोर, जनावरांच्या घोट्यासमोर पाय उतार झालेल पाहून अश्चर्याने वेडे व्हायचेच बाकी राहिले होते.कोणाला सुचेल अस आपआपल्या परिने ह्या वधुबापाच स्वागत करित होते.घरातील पत्र्याच्या ट्रंकेतिल ठेवणीच्या नव्या टोप्य लोकांनी आहेर म्हणून साहेबांच्या डोक्यावर चढवल्या होत्या.कोणी फेटा ,कोणी टोपी ,कोणी साडीचोळी, कोणी पुर्ण पोशाख आयत्यावेळेस जमेल अस व त्यांच्या डोक्यावर कोणत्याही आपेक्षेचे ओझे न ठेवता.आमच्या परिसरात ह्या निमंत्रणाची दंत कथाच बनून राहिलीय.लग्नात मा.पंतप्रधान स्व.चंद्रशेखर , स्व.राजीव गांधी हे ज्या आपुलकीने हजर होते तेवढ्याच किवां त्यापेक्षा अधिक आपुलकीने आमच्या भागातील शेतकरी ,शेतमजुर जून्या पण धुतलेल्या कपड्यात हजर होते.व लग्नात मिळालेला पेढा खाउन पोट भरल्या तृप्त मनाने आपआपल्या घरी गेलेले मी पाहिले.

ह्या निमंत्रणाची व आहेराची चर्चा अजूनही दंतकथेसारखी लोकांच्यात होते. माझा आहेर पवारसाहेबांनी कसा स्वीकारला हे अभिमानाने व छाती फुगवून सांगणारी व्यक्ती प्रत्येक वाडी वस्तीवरअजूनही हमखास भेटेलच.

पवारसाहेब पंतप्रधान होऊ शकले नाही याच सर्वात जास्त दुःखा आम्हा बारामतीकर मतदारांना झाले आहे. सरकारी वकील म्हणून २५ वर्षेच्या काळात बदली साठी किंवा इतर कसल्याही कामासाठी कधीही पवारसाहेबांच्या कडे मीच काय बारामती तालुक्यातील कोणताही रहिवासी आधिकारी गेला नसणार.पंरतु आम्हीच काय पण त्यांना कधीही न भेटलेल्या व इतर सर्व सरकारी अधिकाऱ्यांत कर्मचाऱ्यांच्यात व सर्वसामान्य मतदारात आपुलकीची, विश्वाची, आधाराची भावना असणारा भारतातील एकमेव राजकीय नेता म्हणजे श्री शरदचंद्र गोविंदराव पवार मु.पो. काटेवाडी ता.बारामती जिल्हा पुणे त्यांच्या संसदीय सामाजिक कार्यास माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसाचा मानाचा मुजरा व त्यांना उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा.

  • अॅड. बाळासाहेब आ. खोपडे, माजी सरकारी वकिल व “सदस्य” शिस्तपालन समीती, महाराष्ट्र व गोवा बार असोशियेशन