पिंपरी : “महाविद्यालयाच्या नावलौकिकाच्या दृष्टीने अनेक घटक कार्यरत असतात. जसे की महाविद्यालयाचे शिक्षण, ते देणारा गुणवंत प्राध्यापक वर्ग, इमारत, विद्यार्थी संख्या इत्यादी. त्यापैकीच एक म्हणजे माजी विद्यार्थी. हा माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण येथून शिक्षण घेऊन गेलेला माजी विद्यार्थी बाहेरच्या जगात आपापल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित असतो. व त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडत असते.” असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी येथे केले.
महात्मा फुले महाविद्यालयाचा ‘माजी विद्यार्थी मेळावा’ नुकताच या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड बोलत होते. यावेळी माजी विद्यार्थी व जनरल बॉडी सदस्य माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, उद्योजक जालिंदर कातकडे, सोशल वर्कर मनोज बोरसे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर, प्रहार संघटनेचे संजय गायके, प्रविण पाटील व इतर माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते, महाविद्यालयीन जीवनातील आपले अनुभव व्यक्त केले.
या वेळी बाळासाहेब वाघेरे यांनी महाविद्यालयातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पन्नास हजार रुपये मदत केली. उद्योजक जालिंदर कातकडे यांनी १ लाख रुपये महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या रिसर्च प्रोजेक्टसाठी मदत केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी स्वागत व आभार विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. कामायनी सुर्वे, डॉ. सोनल बावकर यांनी केले.
यावेळी विरोधी पक्ष नेते दत्तात्रय वाघेरे, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे डॉ. नीलकंठ डहाळे, कार्यालय प्रमुख रत्नप्रभा नाईक, नवनाथ शेवाळे तसेच बहुसंख्येने (१५४) माजी विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता