सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • सर्वांसाठी पाणी’ धोरणाचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, ता. 7 : मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नागरी निवारा परिषद गोरेगांव येथे बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांसाठी असणाऱ्या “सर्वांसाठी पाणी” धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार सर्वश्री सुनिल प्रभू, राजहंस सिंह, रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ.इकबालसिंह चहल आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी “सर्वांसाठी पाणी !” धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पर्यावरणाची कमीत कमी हानी करून विकास कामे करावयाची आहेत. महानगरपालिकेची बेस्ट सेवा ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून वाहतूक,पाणी, आरोग्य सुविधा, महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा वाढविण्याच्या होत असलेल्या कामाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.