थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना थेरगाव मधील बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आहे. पार्थ पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी पार्थ पवार हे थेरगाव येथे प्रचारासाठी गेले असताना त्यांना बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला.

थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा

थेरगाव मधील निलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे, शंकर बारणे यांच्यासह संपूर्ण थेरगाव मधील बारणे परिवाराने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यावेळी बोलताना संभाजी बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी कोणत्याही प्रकारची कामे या भागात केली नाही. खासदार म्हणून कोणताही निधी थेरगाव भागाला देण्यात आला नाही. थेरगाव मध्ये अनेक प्रश्न आहेत मात्र कोणतेच प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे आमचं आडनाव जरी बारणे असलं तरी संपूर्ण थेरगाव मधील बारणेंचा पाठिंबा हा पार्थ पवार यांनाच असणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी थेरगाव मधील सर्व बारणे हे आपली ताकद लावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.