समस्त मानवजातीविषयी कळवळा असणारे भारतरत्न बाबासाहेब

समस्त मानवजातीविषयी कळवळा असणारे भारतरत्न बाबासाहेब

समस्त मानवजातीविषयी कळवळा असणारे भारतरत्न बाबासाहेब
जगदीश काबरे

स्त्रियांच्या प्रगती वरुन देशाची प्रगती ठरते म्हणून स्त्री-पुरुष समानता असणे आवश्यक आहे असे बाबासाहेबांचे मत होते. म्हणूनच स्त्री-पुरुषांना समान वेतन, बाळंतपणाची रजा, घटस्फोटाचा पोटगी कायदा, वारसा हक्कात मुलींना संपत्तीत समान वाटा मिळण्याचा कायदा असे अनेक लाभ स्त्रियांच्या पदरात पाडणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या शिक्षित स्त्रिया आणि उच्चवर्णीय जेव्हा त्यांच्याबद्दल “ते तर त्यांचे नेते आहेत”, असे तुच्छतेने बोलतात तेव्हा ते कृतघ्नपणाचा कळस गाठत असतात. ज्या बाबासाहेबांनी स्त्रियांना व्यक्ती म्हणून ओळख मिळावी वर उल्लेखलेले कायदे करून पुरुषकेंद्री समाजाला बाध्य केलं, त्याच बाबासाहेबांविषयी अशा पद्धतीने जेव्हा आजचे शिक्षित – सुशिक्षित नव्हे, त्यांचा एका जातीय दृष्टिकोनातून विचार करत असतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. हे म्हणजे उपकार कर्त्यावर अपकार करणे आहे.

खरेतर बाबासाहेबांसारखी विद्वान माणसे ही ना कोणत्या एका जातीची असतात, ना एका धर्माची; ती तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारी असतात. त्यांना एकाद्या जातीत बंदिस्त करून त्यांच्याविषयी संकुचित विचार करणे हा तर आपला करंटेपणा झाला.

पाश्‍चात्त्य लोक माणसाकडे फक्त माणूस म्हणूनच बघतात. म्हणूनच ते त्यांच्या विद्वत्तेची कदर करू शकतात. बाबासाहेब विकसित देशात वंदनीय ठरले ते त्या लोकांच्या ह्या विशाल आधुनिक दृष्टिकोनामुळेच. आपल्याकडे मात्र विद्वत्तेपेक्षा त्या माणसाच्या जातीवरून त्याचे महत्त्व ठरते, हे दुर्दैवी आहे. माणसाची बुद्धिमत्ता ही त्याच्या जाती-धर्मावर अवलंबून नसून त्याच्या मेंदूच्या प्रगल्भतेवर अवलंबून असते हे स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांच्या हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तो सुदिन.

म्हणून आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी आंबेडकरांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय या चतु:सूत्रीच्या मार्गाने जाण्याचा संकल्प करुया.

त्याचबरोबर हेही लक्षात ठेवूया की, जे शिक्षण पूर्ण करण्यासाठी साडेआठ वर्षाचा कालावधी लागतो, ते शिक्षण परदेशात जाऊन 18-18 तास अभ्यास करून, एका पावाच्या तुकड्यावर दिवसभर राहून केवळ दीड वर्षात आंबेडकरांनी पुर्ण केले. MA Phd (columbia ) D.sc.(London), L.L.D.(Osmania), D.Litt & Bar at Law (London) या विश्वविख्यात पदव्या बाबासाहेबांनी अथक परिश्रमांनी मिळविल्या. यापैकी D.sc. अर्थात Doctor of science ही पदवी ‘London School of Economics’ येथून प्राप्त करणारे बाबासाहेब हे आजपर्यंतचे एकमेव भारतीय आहेत. त्यांचा विक्रम अजूनही कोणी मोडलेला नाही, म्हणून London School of Economics संस्थेने बाबासाहेबांचा पुतळा या संस्थेच्या प्रवेशद्वारावरच उभारलेला आहे, आणि त्यांच्या नावे अभ्यासकेंद्रही सुरू केले आहे.

त्यांच्या या अचाट कर्तृत्वामुळे डोळे दिपून जाऊन माझे काही मित्र बाबासहेबांना परमपूज्य म्हणतात, पण मला ते मान्य नाही. मला वाटते त्यांची पूजा करण्यापेक्षा आणि फक्त त्यांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या विचारांची उभारणी करणे म्हणजेच त्यांना खरे आभिवादन करणे होय. आज त्यांच्यामुळे बहुजन समाज शिकला… संघर्षही करीत आहे… पण संघटित झाला नाहीय. तेव्हा बाबासाहेबांच्या जयंती निमित्य मी सर्व भिम आनुयायांना विनंती करतो की, ‘शिका संघर्ष करा पण त्याचबरोबर संघटितही व्हा…! बाबासाहेबांची फक्त मूर्ती पुजू नका… नुसतेच “जय भीम” म्हणून निळे फेटे लावून आणि डीजेच्या तालावर दारू पिऊन उन्मादाने धिंगाणा घालू नका. तर त्यांच्या विचारांची कास धरून विवेकाशीलतेने वागून… वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून, सुशिक्षित समाजाचे घटक व्हा.’

कालपर्यंत ज्यांना चक्क जनावरे समजले जात होते ती तर ढळढळीत आपल्यासारखीच माणसे आहेत, आणि आपण ज्यांना कालपर्यंत माणसे समजत होतो ती तर सारी हिंसक हिंस्त्र जनावरे आहेत; हे ज्या महामानवा मुळे समजले त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक होण्याची मी पात्रता माझ्या अंगी आणीन अशी त्यांच्या जयंती निमित्त आज प्रतिज्ञा करत आहे.

समस्त मानवजातीविषयी कळवळा असणारे भारतरत्न बाबासाहेब