दररोज पन्नास गोरगरिब कुटुंबांना किराणा वाटप; ३५०कुटुंबाना मदत

दररोज पन्नास गोरगरिब कुटुंबांना किराणा वाटप; ३५०कुटुंबाना मदत
  • एनयुजेएमचे सदस्य नगरचे पत्रकार जितेंद्र आढाव व आधार संस्थेचे सुदाम लगड यांचे अभिनंदनीय काम

लोकमराठी न्यूज नेटवर्क

अहमदनगर : अहमदनगर शहर व परिसरात लॉकडाउनमुळे रोजीरोटी बंद झालेल्या शंभर कुटुंबीयांना दररोज अन्न-धान्य, किराणामाल व मोफत जेवण देण्याचे ध्येय मनाशी बाळगून दोन तरुणांनी पंधरा दिवसांपासून काही मित्रांच्या देणगीच्या सहकार्यातूंन ही मोहीम सुरु केली. आता दररोज किमान पन्नास कुटुंबापर्यंत पोहोचत आहे. त्यांना मित्र परिवाराकडून शंभर रुपयांपासून ते थेट पाच हजारांपर्यंत मदत झाली आहे.

श्रीगोंदे तालुक्यातील पत्रकार नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचे सदस्य जितेंद्र आढाव व आधार संस्थेचे सचिव सुदाम लगड या तरुणांकडून एका कुटुंबाला १५ दिवस पुरेल एवढे अन्न-धान्य आणि किराणा अशा गरजू लोकांना दिला जात आहे. त्यासाठी त्यांना काही सामाजिक संस्थांचीही मदत मिळत आहे. या युवकांच्या माध्यमातून आत्तापर्यंत नगर शहर व परिसरातील सुमारे तीनशे पन्नास कुटुंबाना मदत करण्यात आली आहे.

झोपड्यात राहणारे आणि रोजंदारीवर काम करणारे, परप्रांतीय मजूर, ट्रॅफिक सिग्नलवर विक्री करणारे तसेच गरजू कुटुंबाना किराणा माल आणि इतर जीवनावश्यक सामग्री देण्यात आली आहे. अनेक भागातील गरजू मजुरांना हे किराणा किट दिले जात आहे. आत्तापर्यंत अहमदनगर महापालिका परिसर, सावेडी रोड, भिंगार, केडगाव, माळीवाडा, बोल्हेगाव, नागापूर, टिळक रोड, कायनेटिक चौक, दाळमंडई, बांबू गल्ली, तारकपूर, जुने बस स्टँडपरिसर ते स्टेशन रोड परिसर व नागरदेवळे आदी परिसरात वाटप केले.

संपूर्ण काळजी घेऊन मास्क, हॅन्डग्लोज आणि सॅनिटायझर वापरून गरीबांना मदतीचे वाटप केले जात आहे. या युवकांना गोरखनाथ खेडकर, प्रदीप कराळे, रावसाहेब कातोरे, राधिका लगड, सचिन चौधरी, अनिल बनकर, विनायक आढाव, आकाश रासकर, योगेश सांगळे, राजू दावभट, नारायण राऊत, असिफ सिद्दीगी, सागर गोंटे, संदीप पवार, प्रदीप आढाव, अनुप दीक्षित आणि अंबादास इंगळे व आदी व्यक्तींचे आर्थिक व वस्तू स्वरूपात सहकार्य लाभले.

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेद्रकुमार व अध्यक्ष शीतल करदेकर यांनी या कार्याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.