कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही इच्छा, ध्येय सिद्ध करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. हा त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून “ईद – उल – अजहा” (बकरी ईद) हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो.
यानिमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी आपले सण अधिकाधिक समाजाभिमुख आणि मानवतावादी करणे हेच धर्माचे उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्यावतीने बकरी ईद निमित्त पशुची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये काळानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि २१ जुलै) छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सी.पी.आर.) कोल्हापूर येथील रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र अंनिस चे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अरुण शिंदे, कॉ. दिलदार मुजावर, गौतम कांबळे, महेश कांबळे, रोहन चोडणकर, भारतजीवन प्रभूखोत, राजवैभव शोभा रामचंद्र, यशवंती शिंदे, रविंद्र वाळवेकर आणि निशांत सुनंदा विश्वास कार्यकर्ते उपस्थित होते.