सन १२ व्या शतकात महात्मा बसवण्णा यांनी चांभार समाजातील शीलवंत आणि ब्राम्हण समाजातील कल्याणी यांचा आंतरजातीय विवाह लावून दिला. ब्राम्हण असलेल्या गणेश आणि महार असलेल्या सारजा यांनी प्रेम केल्याबद्दल गावातील लोकांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावित्रीबाई फुल्यांनी त्यांना वाचवून आश्रय दिला. ही घटना १८६८ सालातली. राजर्षि शाहू महाराजांनी तर आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह धनगर असणाऱ्या यशवंतराव होळकर यांच्याशी निश्चित केला. एवढेच नाही तर असे १०० आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यापैकी २५ विवाह त्यांनी पार पाडले. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनीही जात निर्मूलनासाठी आर्थिक स्वातंत्र्य, धर्म ग्रंथांची चिकित्सा आणि आंतरजातीय विवाह अशी त्रिसूत्री सांगितली होती. महात्मा गांधीजीही आपल्या उत्तर आयुष्यात फक्त आंतरजातीय विवाह असेल अशाच विवाहास उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. अर्थात, आपल्या देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला आंतरजातीय विवाहांची आणि त्यासाठी समाजसुधारकांनी केलेल्या प्रयत्नांची परंपरा आहे.
या समाजसुधारकांच्या काळाच्या तुलनेत आज समाज काही शतके पुढे गेला असला तरी जात नावाची अंधश्रद्धा मात्र समाजाच्या मनातून गेलेली नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या काळात समाज उघड उघड जात मानतो, हे मान्य तरी करत होता. आजचा आपला समाज मात्र, याबाबत दुटप्पी; नव्हे दांभिक आहे. एका बाजूला काळाच्या गतिमानतेमुळे आणि धकाधकीच्या आयुष्यामुळे नाईलाजाने गळून पडलेल्या स्पर्शबंदी आणि रोटीबंदीचे उदाहरण देत, आपण जात मानत नाही. याची टिमकी वाजवायाची आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातील मुलगा किंवा मुलीच्या लग्नाची वेळ आली की जातीतीलच सोयरिक बघायची. असा दुतोंडीपणा सर्रास पहायला मिळतो. एवढेच नाही तर दुसऱ्या जातीतील मुला/मुलीबरोबर लग्न केल्याबद्दल आपल्या पोटाच्या गोळ्यांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहिले जात नाही.
पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत घराण्याच्या (खोट्या) इज्जतीचे रक्षण करण्याची जबाबदारी मुलींवर लादली जाते. तिने दुसऱ्या जातीतील मुलाबरोबर प्रेम केले किंवा लग्न केले, म्हणजे खानदानाची इज्जत मातीत मिळवली म्हणत मुलीबरोबर तिच्या पतीचाही जीव घेतला जातो. त्याचा अभिमानही मिरवला जातो. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेतून केलेल्या या खुनांना “ऑनर किलिंग” अशा चुकीच्या नावाने ओळखले जाते. खरंतर महाराष्ट्राचेच नव्हे तर आपल्या देशाचे समाजवास्तव असलेली जात हीच एक अंधश्रद्धा आहे.
अलीकडच्या काळात शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने मुले, मुली घराबाहेर जाऊ लागली आहेत. अशावेळी त्यांचा एकमेकांशी संपर्क येतो. परस्परांचे गुण आवडल्यामुळे त्यांची मैत्री होते. या मैत्रीचे पुढे प्रेमात रुपांतर होते. या सगळ्यांत त्यांच्यासाठी जातीपेक्षा परस्परांचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक गुण महत्वाचे असतात. प्रेमातून पुढे लग्नाची वेळ आल्यावर मात्र जात आडवी येते. खरंतर ज्या व्यक्तीवर प्रेम केले तिच्याशीच लग्न व्हावे वाटणे ही किती पवित्र भावना आहे. मात्र जातीपातीच्या बंधनात गुरफटलेला समाज या लग्नाळू मुला-मुलींना खोटे वागायला भाग पाडतो किंवा जातींच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांचे जीव तरी घेतो.
खरंतर उठसूट आम्ही तुमच्यासाठी हे केलं, ते केलं. आम्ही जे रात्रंदिवस राबतोय ते कुणासाठी? तुमच्यासाठीच ना? असा धोशा लावणाऱ्या पालकांनी आपल्या मुलांसाठी बाकी फार काही न करता त्यांना आपापला जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य दिले, तरी पुरेसे आहे. मात्र, आपल्या समाजातील पालक आपल्या पाल्यांवर प्रेम करतात तेही स्वतःच्या अटींवर. या अटी मुलांनी नाकारल्या तर ते त्यांचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. या पालकांना आपली जात किंवा आंतरजातीय लग्न केल्यामुळे जातीत होणारी बदनामी इतकीच प्यारी असेल तर आपल्या मुलांशी असलेले संबंध तोडावे, मुलांना त्यांच्या कष्टाने जगू द्यावे. पण नाही! हे पालक एकतर स्वतःचे काही बरे वाईट करून घेण्याची धमकी देतात किंवा पोटाच्या पोरांना मारण्याचा तरी निर्णय घेतात. खरंतर हा निर्णय पालक घेतात असे दिसत असले तरी तो तसा वैयक्तिक निर्णय नसतो. एकूणच समाजाच्या दबावामुळे घेतलेला तो निर्णय असतो.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या काही सामाजिक संघटना आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्रे चालवून जातीपातीचे बंध तोडून प्रेमाचे नाते जोडू इच्छिणाऱ्या या तरुणाईच्या पाठीशी उभ्या राहतात. तरुणाईला जात-धर्माचे बंध तोडून मानवी गुणांवर प्रेम करत जीवनसाथी निवडण्याचे आवाहन करतात.
बदलत्या काळाबरोबर आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह स्वीकारले गेले पाहिजेत. स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचे, नातलगांचे, शेजाऱ्यांचे असे विवाह लावण्यात पुढाकार घेतला पाहिजे. किमान त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. अगदीच नाही तरी किमान असे विवाह करणाऱ्यांचा विरोध किंवा उपहास तरी केला जाऊ नये. तर आणि तरच आपल्याला उठता-बसता फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे.
कृष्णात स्वाती, ८६००२३०६६०