डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार जागृती दिन’ साजरा

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात 'राष्ट्रीय मतदार जागृती दिन' साजरा

औंध : येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ‘राष्ट्रीय मतदार जागृती दिन’ साजरा करण्यात आला. (मतदार बना, सुशिक्षित, जागृत व निर्भय बना) आपल्या लोकशाही देशात प्रतिनिधी निवडून देण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. म्हणून कोणत्याही लोकशाही देशात मतदान यंत्रणा महत्त्वाची असते. भारत देशात मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मतदार दिन सादर केला जातो. 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने मतदार बना, सुशिक्षित, जागृत व निर्भय बना अशा हेतूने डॉ.आंबेडकर महाविद्यालयात सामाजिक सुरक्षित अंतर राखून मतदार जाणीव जागृतीचा उपक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.रमेश रणदिवे सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मतदानाची पार्श्वभूमी सांगताना ते म्हणाले इ. स.1935 साली मतदानाचा अधिकार इंग्रजांकडून आपल्याला मिळाला. तेव्हा भारतातील 11 प्रांतांमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जनतेला दिला. ब्रिटिशांचा सुधारणावादी दृष्टिकोन व भारतीयांना देशाच्या प्रशासनात सहभागी करून घेण्याच्या हेतूने इंग्रजांनी हा अधिकार दिला.

1947 साली भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर नवीन घटना तयार करण्यात आली. राज्यघटना कलम 324 नुसार 25 जानेवारी 1950 रोजी भारतात स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. निवडणूक यंत्रणा निपक्षपाती असावी यासाठी आयोगाच्या अध्यक्षांची निवड राष्ट्रपतींकडून केली जाते. तर त्यांना काढून टाकण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. लोकशाही देशामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून सरकार चालविले जाते. सुरुवातीला कोणत्याही भारतीयाला वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला जात होता. यात धर्म, पंथ, जात, स्त्री-पुरुष असा भेद केला जात नाही..

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात 'राष्ट्रीय मतदार जागृती दिन' साजरा
प्रा. सुशीलकुमार गुजर

राजीव गांधी यांच्या कालखंडात निवडणुकीचे वय 21 वरून 18 वर्षे केले गेले. लोकशाहीमध्ये मतदान हे शांततापूर्ण मार्गाने सत्तांतर घडविण्याचे एक साधन आहे. पाच वर्षाच्या कालखंडात सरकार जनहिताचे काम करीत नसेल, तर रक्तहीन राज्यक्रांती म्हणजेच मतदान करून सरकार पाडता येते. प्रत्येक व्यक्तीला मतदान करता येते. एक मत एक मूल्य हे तत्त्व पाळले जाते. मतदाराने कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता सत- सत विवेकबुद्धीने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असते. सरकारच्या कामाचा लेखा-जोखा म्हणून मतदान आवश्यक आहे.

मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृकता निर्माण करण्याच्या हेतूने 25 जानेवारी हा दिवस मतदान प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. मतदान प्रेरणा दिनाचा मुख्य हेतू म्हणजे नवीन मतदार नोंदणी करणे, देशातील ज्या व्यक्तीचे वयाची अठरा वर्षे पूर्ण केली आहे अशा प्रत्येक नागरिकाला मतदार म्हणून नाव नोंदविण्यास प्रवृत्त करणे. हा या दिवसाचा पहिला हेतू आहे. दुसरा हेतू म्हणजे तो राजकीय व्यवस्थेत सामान्य व्यक्तींना सक्रीय बनविणे. मतदानात सहभाग घेतल्याने जुन्या विचारसरणी असलेल्या लोकांचा प्रभाव कमी करता येतो. नवीन प्रेरणा देणारे कुशल नेतृत्व देशाला बहाल करता येते. तिसरा हेतू म्हणजे अधिकाधिक तरुण मतदारांना राजकीय प्रक्रियेत सहभाग घेण्यास प्रवृत्त करणे. जेणेकरून जात, पैसा, धर्म यासारख्या अपप्रवृत्तींना त्याचबरोबर घराणेशाही, गुंडागर्दी यापासून लोकशाहीला दूर ठेवता येऊ शकते. तर चौथा हेतू म्हणजे एक मत एक मूल्य हे तत्त्व रुजविणे असे मतदार दिवसाचे मुख्य चार हेतू आहेत.

अशा प्रकारे आपल्या देशाला सार्वभौम सक्षम राष्ट्र बनविण्याच्या हेतूने आपण मतदानात सहभागी होऊन देशाला प्रगती पथाकडे घेऊन जाऊ शकतो. मतदान करून आपण सक्षम नेतृत्व देऊ शकतो. अशा नेतृत्वामुळे देश जगात महान झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेबाबत बोलताना एक इशारा दिला होता. तो म्हणजे मतदाराने सत्ताधीशांवर विश्वास ठेवावा. मात्र अंधविश्वास मात्र ठेऊ नये. अंधविश्वास किंवा पूर्ण अधिकार दिल्यास अशा राजकीय पक्षांकडून संविधान नष्ट करण्याचा धोका संभवतो. म्हणून आज मतदार दिवसाच्या दिवशी आपण सर्वांनी जागृत, सजग व कर्तव्यदक्ष नागरिक बनले पाहिजे. असे मत प्रा.डॉ.रमेश रणदिवे यांनी व्यक्त केले.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात 'राष्ट्रीय मतदार जागृती दिन' साजरा

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.अरुण आंधळेसाहेब म्हणाले शिक्षण क्षेत्र हे जागरूकता निर्माण करण्याचे खरे व्यासपीठ आहे. शिक्षणाचे महत्त्व कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले इत्यादी विचारवंतांनी महत्त्वाचे मानले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणामध्ये एक विचार मांडला तो म्हणजे “विद्यार्थ्यांनी राजकारणात पडू नये. परंतु आपलं स्वातंत्र्यही गमवू नये”.याचाच अर्थ आपण मतदानाच्या मार्गाने शांतताप्रिय पद्धतीने बदल घडवू शकतो. आपण सरकारला टॅक्स देतो. या टॅक्सच्या पैशातून सरकार देश चालविते. परंतु जेव्हा सत्ताधाऱ्यांना सत्तेची गुर्मी चढते. अशावेळी या पैशाचा दुरुपयोग होतो. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आपण जागरूक नागरिक बनून मतदान केले पाहिजे. असे आवाहन केले.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात 'राष्ट्रीय मतदार जागृती दिन' साजरा
प्रा. डॉ. रमेश रणदिवे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.सुशीलकुमार गुजर यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा.सौ.नलिनी पाचर्णे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अविनाश जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवकांबरोबर बहुसंख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.