रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : लॉकडाऊन काळात अंदाजे मीटर रिडींगद्वारे आलेले अव्वाच्या सव्वा बिल नंतर तोडपाणी करून लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाला आहे. पिंपरीतील माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश रोचिरमानी यांनी हा धक्कादायक प्रकार उघड केला आहे. मात्र, या प्रकाराची तक्रार रोचिरमानी यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊनही महावितरणकडून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी आहे की, रोचिरमानी यांना महिन्याला अडीच ते तीन हजार रुपये येणारे वीज बिल, मार्च २०२० ते ऑगस्ट २०२० दरम्यान ३४ हजार रुपये आले. या बिलाबाबत रोचिरमानी यांनी महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयात भरपुर चकरा मारल्या. मात्र, बिल बरोबर असल्याचे सांगत बिलात कमी होणार नाही. असे रोचिरमानी यांना सांगण्यात आले.
त्यामुळे रोचिरमानी यांनी बिलाची सविस्तर माहिती घेण्यासाठी १४ डिसेंबर २०२० रोजी माहिती अधिकार कायद्यान्वये अर्ज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महावितरण अधिकाऱ्यांनी तो स्विकारला नाही. त्यानंतर महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना भेटल्यानंतर ११ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांचा माहिती अधिकार अर्ज स्विकारण्यात आला.
परंतू, अर्ज केल्याच्या बदल्याच्या भावनेने २४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस किंवा पंचनामा न करता महावितरणने त्यांचा मीटर काढून नेला. त्यावेळी त्यांचे बिल ५० हजार झाले होते. मात्र, मीटर काढून नेल्यानंतर त्याची नोंद महावितरण दफ्तरी करण्यात आली नाही. असे रोचिरमानी यांनी सांगितले.
दरम्यान, बेकायदा वीज मीटर तोडल्याप्रकरणी रोचिरमानी यांनी महावितरण कार्यकारी अभियंता व पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र, पोलिस व महावितरण यांच्याकडून कोणतीच कारवाई झाली नाही. त्यानंतर रोचिरमानी यांनी २५ हजार भरून ८ मार्च २०२१ रोजी जुना मीटर बसवून घेतला. मात्र, जास्त आलेल्या बिलासंदर्भात त्यांचा पाठपुरावा सुरूच होता.
तोडपाणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध
महावितरणचे कर्मचारी वीज बिलात तोडपाणी करून जुना मीटर गायब करतात व नवीन मीटर बसवून देतात. अशी माहिती रोचिरमानी यांना मिळाली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा त्यांनी शोध सुरू केला.
महावितरणचा हा भ्रष्टाचार उघड आणण्यासाठी ते स्वतःच बळीचा बकरा बनले. त्यांचे ६१ हजार ७०० रूपयांच्या बिलाची ३० ते ३५ हजारांवर तोडपाणी ठरली. सायबू शेख व दत्ता साखरे यांना प्रथम १० हजार रोख दिले. असे रोचिरमानी यांनी सांगितले.
त्यानंतर १७ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांचा जुना मिटर काढून घेऊन गेले आणि त्यांना थेट वीजपुरवठा सुरू केला. मात्र, बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला असल्याची नोंद महावितरण कार्यालयात करण्यात आली.
भ्रष्टाचार उघड होण्याच्या भीतीने धाड
दरम्यानच्या काळात रोचिरमानी यांनी महावितरणच्या कार्यालयात केलेले माहिती अधिकार अर्ज व तक्रार अर्ज याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळताच त्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे त्यांनी १० डिसेंबर २०२१ रोजी रोचिरमानी यांच्या घरावर चोरीची वीज वापरता म्हणून अचानक धाड टाकली. मात्र, त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी त्यांना नवीन मीटर न देता थेट वीज जोड दिला असल्याची व्हिडीओ रेकॉर्डींग रोचिरमानी यांनी धाड टाकणार्या अधिकाऱ्यांना दाखवली.
त्यानंतर १४ डिसेंबर २०२१ रोजी ४५ हजार व २३६ रूपये पुर्नजोडणी शुल्क भरून २५ डिसेंबर २०२१ रोजी सुट्टीच्या दिवशी त्यांना नवीन मीटर बसवून दिला. मात्र, त्यांचा जुना मीटर कुठे आहे. याबाबत महावितरणला माहित नाही.
चौकशी समिती नेमून कारवाई करणार
याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश चाकुरकर म्हणाले की, असे प्रकारे कोण करत असेल तर, यावर चौकशी समिती नेमून योग्य ती कारवाई करण्यात येईल.