पिंपरी : रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या वेळी ‘कवितेतील जगणं आणि जगण्यातल्या कविता’ या विषयावर सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. त्यावेळी ते म्हणाले की, “रसिकांच्या प्रेमावर कवित्व हे तरलेलं असतं केवळ खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही. शब्दांना वेदनेची झालर असत नाही तो पर्यंत कवी होता येत नाही.” या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे होते.
आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले की, ‘जागतिकीकरणात इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येकाने आपल्या मातृभाषेच्या संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या मराठी भाषेत अभंग, ओवी, भारुडे, विराण्या, म्हणी, उखाणे, वाक्प्रचार, कथा, कादंबरी, ललित साहित्य व लोकसाहित्याने परिपूर्ण असलेला अनमोल ठेवा आहे. त्याचे जतन व संवर्धन करणे प्रत्येक मराठी माणसाचे आद्य कर्तव्य आहे’. या वेळी ग्रंथालय विभागाच्या वतीने ऑनलाईन ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. तृप्ती अंब्रे यांनी ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ संपदेची सविस्तर माहिती दिली.
या मराठी भाषा पंधरवडा निमित्त ‘मराठी स्वाक्षरी लेखन’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे व कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर यांनी केले. प्राध्यापिका सौ. रूपा गोसावी यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. पांडुरंग भोसले आणि प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे कार्यालय प्रमुख श्री. राजेंद्र गायकवाड, सौ. उज्वला तावरे आणि सर्व प्राध्यापक वर्ग यांनी सहकार्य केले. प्रा. प्रीती नेवसे यांनी तंत्र सहायक म्हणून काम पाहिले.