प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्रासाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार
  • भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन धर्मसंस्थापनेसाठी कार्य करूया – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मुंबई : इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती करू नका, अशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची शिकवण होती. आजही भारतातील प्रत्येक भागात छोटे पाकिस्तान निर्माण झाले आहेत. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे हिंदूंना संपवण्याची धमकी देत आहे. अशा स्थितीत हिंदूंनाही स्वरक्षणासाठी आपली ताकद वाढविण्याशिवाय पर्याय नाही. रामराज्य स्थापन करणे, हा आपला उद्देश आहे, हे विसरता कामा नये. प्रभु श्रीराम हे आपले आदर्श आहेत; मात्र शत्रूला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कृष्णनीतीचा उपयोग करायला हवा. महाभारतात भगवान श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेतले नाही; त्यांनी युद्ध करण्यासाठी प्रेरणा दिली. आपणही भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन धर्मसंस्थापनेसाठी कार्य करायला हवे. असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी केले. मुलुंड येथील पद्मावती बँक्वेट सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या दोन दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री) अनुराधा वाडेकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रदीप महाराज पाटील, वसई (मेधे) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला, महाराष्ट्र प्रदेश वारकरी संप्रदायाच्या तीर्थक्षेत्र समितीचे कार्यकारी प्रमुख ह.भ.प. सुभाष गोविंदबुवा बन यांची वंदनीय उपस्थिती या अधिवेशनाला लाभली. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील अधिवक्ता, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते, विविध संप्रदाय, मंडळे यांचे प्रतिनिधी यांसह एकूण 32 संघटनांचे 143 हिंदुत्वनिष्ठ येथे सहभागी झाले होते.

‘हिंदु राष्ट्र’ हे राष्ट्रीय आंदोलन झाले पाहिजे ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

कोरोना महामारीचे संकट आपण सर्वांनी अनुभवले. आता जागतिक महायुध्दाचे सावट आहे. युध्दकालीन स्थिती, युध्दकाळामुळे भारतात निर्माण झालेली गृहयुध्दाची शक्यता आणि अराजकता अशा संकटांचा पुढे सामना करताना काळानुसार आपणाला आचरण करावे लागेल. हिंदुत्वनिष्ठांसाठी हिंदु राष्ट्र हे अंतिम ध्येय आहे आणि हिंदुत्वनिष्ठच हेच हिंदु राष्ट्राचे प्रवक्ता आहेत. आपापल्या संघटनांचे कार्य करताना हिंदु राष्ट्र हा केंद्रबिंदू ठेऊन कार्य केले पाहिजे. ‘हिंदु राष्ट्र’ हे राष्ट्रीय आंदोलन झाले पाहिजे !

हिंदु धर्माला राजाश्रय देणार्‍यांना सत्तेत आणले पाहिजे – पू. मोडक महाराज, संस्थापक, श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट

हिंदुत्वनिष्ठांच्या हाती भगवंताने धर्मरक्षणाचा झेंडा दिला आहे. धर्मकार्य करण्यांचे मार्ग वेगवेगळे असले, तरी उद्देश ‘हिंदु धर्माचे रक्षण’ हाच आहे. पूर्वी राजाश्रय असल्यामुळे हिंदु धर्म प्रबळ होता. सद्यस्थितीत राजाश्रय नसल्यामुळे धर्मरक्षणाचे कार्य करावे लागणार आहे. यासाठी धर्माला राजाश्रय देणार्‍यांना सत्तेत आणले पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता सुभाष झा म्हणाले की , ‘न्यायालयाने विविध निर्णय दिले असताना शाळांमध्ये ‘हिजाब’च्या मागणीसाठी धर्मांध आंदोलने करतात. यांसारखे अनेक मुद्दे उपस्थित करून धर्मांध भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. मलेशियासारख्या अनेक इस्लामिक देशांत हिजाबलाच थारा नाही. मग भारतात याविषयी मुजोरी का ?’

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रवक्ता डॉ. विजय जंगम म्हणाले , ‘हिंदु धर्माला विविध जाती-पातींमध्ये विभागण्याचे काम या देशात विशिष्ट शक्ती कार्यरत आहेत. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. वीरशैव आणि लिंगायत समाज हा हिंदु धर्माचाच भाग आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे’.

या अधिवेशनाच्या प्रथम दिवशी संत आणि मान्यवर यांच्या शुभहस्ते सनातन संस्थेच्या ‘परात्पर गुरू डॉ.आठवलेजीके वर्ष 1992 में आयोजित अभ्यासवर्ग’ या हिंदी भाषेतील ग्रंथांचे प्रकाशन झाले. या अधिवेशनातील गटचर्चेत राष्ट्र व धर्मकार्य करतांना येणार्‍या समस्यांवर उपाययोजनेविषयी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमींना अवगत करण्यात आले. अधिवेशनाच्या सांगता समारोपात हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी ठराव पारित करण्यात आले. शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेत ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’चा गजर करत लोककल्याणकारी हिंदु राष्ट्रासाठी झोकून देऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.