“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

"विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी" - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

पिंपरी : “शेतकरी, कामगार, देवदासी, अस्पृश्य समाज यांच्या उद्धारासाठी निस्पृह वृत्तीने विठ्ठल रामजी शिंदे यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यामधील दुवा म्हणजे वि. रा. शिंदे यांचे कार्य. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर निस्पृह वृत्तीने काम केले. ते खऱ्या अर्थाने महर्षी या पदवीला पात्र होते. त्यांच्या उपेक्षित कार्याला समाजापुढे आणण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले.” असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे मांडले.

रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “थोर पुरुषांचे जीवन चरित्र हे आचरणात आणण्यासाठी त्यांच्या कार्याचे नेहमी स्मरण केले पाहिजे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्र व कार्य हे असेच स्मरणीय आहे.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारती यादव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शहाजी मोरे, आभार शुभदा लोंढे, सूत्रसंचालन डॉ. कामायनी सुर्वे यांनी केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमाचे संयोजन केले.

या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य संजोग वाघेरे पाटील, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव पाटील, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. नीलकंठ डहाळे, कला, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे, कार्यालयाचे प्रमुख श्री. गायकवाड सर, उज्वला तावरे आणि सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.