विशेष लेख : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…..

विशेष लेख : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.....

डॉ. संदीप वाकडे

आज दिनांक २३ जुलै. आजचा हा दिवस ‘वनसंवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज एकविसाव्या शतकामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निर्माण होणाऱ्या विविध संस्था आपण पाहत आहोत. याचे कारण उशिरा का होईना आपल्याला समजलेले पर्यावरणाचे महत्त्व हे होय.

अलीकडे आपण पाहतो की अनेक नेते मंडळी स्वतःच्या वाढदिवसाचा डामडौल करतात आणि तो मी काहीतरी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला अशी शेखी मिरवितात. या सामाजिक उपक्रमामध्ये ते व त्यांचे कार्यकर्ते ओसाड जमिनीवर किंवा रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे घेऊन वृक्षारोपण करताना दिसतात. फोटोसेशन्स करून बातमी वर्तमानपत्राला देतात. झाडे लावून ही मंडळी मोकळी होते पण झाड लावले म्हणजे आपली जबाबदारी पार पडली असे नव्हे तर ते झाड जसे आपण पोटच्या लेकरांचे संगोपन करतो, त्यांना लहानाचे मोठे करतो, अगदी तसेच ते झाडही जपले पाहिजे, वाढवले पाहिजे. पण वस्तुस्थिती अशी आहे की या वर्षी ज्या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड केली आहे, त्याच खड्ड्यांमध्ये पुढील वर्षीही वृक्षलागवड होताना दिसते. याचे कारण वृक्षाच्या संगोपनाची झटकलेली जबाबदारी हे होय. त्याचप्रमाणे वाढत्या नागरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होताना आपण पाहतो आहे. या पाठीमागील कारण ‘विकास’ हे असले तरी आपण हेही विसरतोय की या वृक्षतोडीमुळे, मानवी जीवनालाही हानी पोहोचत आहे. फक्त मानव विकासाच्या ओघात आंधळा झाल्यामुळे या गोष्टींकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. वृक्ष टिकवण्यासाठी धडपडणार्‍या ज्या विविध संस्था आहेत त्याही अल्प प्रमाणात आहेत. यासाठी प्रत्येकानेच ही बाब गांभीर्याने घेऊन, वनसंवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

अशा या पर्यावरणाचे महत्त्व हे २९७ वर्षांपूर्वीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना समजलेले होते. त्यांनी आपल्या प्रजेमध्येच नव्हे तर प्रजेबाहेरही हा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोलाचे योगदान दिलेले दिसते. त्यांनी आपल्या प्रजेमध्ये तेथील शेतकऱ्यांना किमान २० झाडे लावलीच पाहिजेत असा कटाक्ष केला होता. या वीस झाडांमधील ११ झाडे सरकारी व उर्वरित नऊ झाडे लावणाऱ्या व संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांची होती. यालाच ‘नऊ ग्यारह कानून’ असे म्हणत असत. “झाड जर जीर्ण झाले असेल तर तेवढंच तोडावे. ते सुद्धा धन्यास राजी करून व द्रव्य देऊन धन्याच्या संतोषे तोडावे” असे त्या भरलेल्या दरबाराला उद्देशून म्हणत असत. ‘वृक्ष तोडणे म्हणजे प्रजापीडणच!’ असे त्यांना वाटत असे. वृक्षतोडीला आळा बसावा यासाठी त्यांनी लढवलेली शक्कलही आज वनसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या विविध संस्था निर्माणकांना दिशादर्शक अशीच आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवींनी आपल्या प्रजेमध्ये वृक्षलागवडीसाठी लिंब, औदुंबर, वड, पिंपळ, कवठ, आंबा व फणस इत्यादी धार्मिक अधिष्ठान असलेल्या वृक्षांचा समावेश केलेला दिसतो. जेणेकरून प्रजेतील लोकांकडून वृक्षतोडीला आळा बसेल, अशी त्यामागची त्यांची धारणा असल्याचे पाहायला मिळते. “वृक्ष वर्षा दोन वर्षात होतात असे नव्हे. लेकरासारखी बहुत काळ जतन करावी लागतात.” असे त्यांना वाटत असे. पशुपक्ष्यांसाठीही अहिल्यादेवींनी राखीव कुरणे ठेवल्याची नोंद सापडते. “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

पक्षीही सुस्वरे। आळविती।।” असा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग अहिल्यादेवी सार्थ करून दाखवतात, असेच म्हणता येईल.

त्यांनी रयतेच्या मनामध्ये वृक्षाविषयीची आपुलकी निर्माण केली होती. वृक्षतोडीसारखे कृत्य करणे म्हणजे ईश्वरी अपराध केल्यासारखे आहे, असे रयतेच्या मनामध्ये त्यांनी रुजविले होते. त्यांच्या या वृक्षलागवडी संबंधी प्र.दि. कुलकर्णी असे म्हणतात की, “ज्यांची मुळे खोलवर दूरवर जाऊन जमिनीत नैसर्गिक गारवा कसा टिकेल अशीच झाडे त्यांनी लावली. यातूनच आजची अभयारण्याची कल्पना उदयास आलेली दिसते.”

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी हे वृक्षसंवर्धनाचे कार्य आपल्या प्रजेपुरतेच मर्यादित न ठेवता, हे कार्य प्रजेबाहेरही चालू ठेवल्याचे दिसते. त्यांनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील ‘जेजुरी’ या तीर्थक्षेत्री चिंचेची बाग निर्माण केल्याचे दिसते. त्यांनी या क्षेत्री जेजुरी गावचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी एका विस्तीर्ण तलावाची निर्मिती केली होती, त्या तलावा भोवताली ही चिंचेची बाग निर्माण केली होती. आजही या तीर्थक्षेत्री गेल्यावर या तलावाच्या भोवती चिंचेची जुनाट वृक्ष पर्यटकांच्या नजरेस पडतात.

त्याचप्रमाणे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ‘पंढरपुर’ या तीर्थक्षेत्रीही एक ‘तुळशीबाग’ निर्माण केली होती. पण सद्य:स्थितीत ती बाग अस्तित्वात दिसत नाही. बहुतेक ती तेथील वाढत्या शहरीकरणाचा बळी ठरली असावी, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

एकुणच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची दूरदृष्टी ही आजच्या पर्यावरणप्रेमींना दिशादर्शक अशीच आहे,असे म्हणता येईल.

लेखक
प्रा.डॉ.संदीप वाकडे
सहाय्यक प्राध्यापक,
मराठी विभाग,
एस.एम.जोशी कॉलेज, हडपसर, पुणे-28. मो.नं. ९४२०४६९२९०