लॉकडाऊनमध्येही पीसीईटीच्या तर्फे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु

लॉकडाऊनमध्येही पीसीईटीच्या तर्फे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु
  • पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा सर्व शाखांमध्ये उपक्रम

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी (पुणे) : कोरोना संसर्गामुळे मागील बारा दिवसांपासून देशभर लॉकडाऊन आहे. शासनाच्या आदेशानुसार मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बहुतांश शाळा महाविद्यालयातील अभ्यासक्रम शिकविणे अद्यापही बाकी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. ही विद्यार्थ्यांची अडचण विचारात घेऊन पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या अंतर्गत असणा-या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर प्रभावीपणे करण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

पीसीईटी अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय, तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर व मॅनेजमेंट महाविद्यालय आहेत. या सर्व शाखांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर गुगल क्लासरूम, झूम मिटींग यासारख्या अत्याधुनिक ॲप्लीकेशनव्दारे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे. या ऑनलाईन पद्धतीत प्राध्यापक विद्यार्थ्यांना लेक्चर देतात व ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचे शंकानिरसन करतात. त्यांचे मूल्यांकन देखील प्राध्यापकांना करणे सोपे झाले आहे. विद्यार्थीदेखील मोठ्या उत्साहाने या पद्धतीचा अवलंब करीत आहेत.

हा उपक्रम संस्थेचे डिजिटल मार्केटींग हेड प्रा. केतन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आणखी आवड निर्माण व्हावी म्हणून #pcet challenge या हॅशटॅगने सोशल मिडिया चॅलेंज सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना दिले आहे. याचाच एक भाग म्हणून ऑनलाईन लर्निंगमध्ये सहभागी झाल्यावर विद्यार्थी, प्राध्यापक विविध सोशल मिडियावर पोस्ट करून इतरांना देखील प्रेरीत करीत आहेत. विद्यार्थ्यांनीदेखील लॉकडाऊन काळात इतर गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा अभ्यासात वेळ सत्कारणी लावावा त्यामुळे हा उपक्रम संस्थेच्यावतीने सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती प्रा. केतन देसले यांनी दिली.

याबाबत डॉ. गिरीष देसाई यांनी सांगितले की, ऑनलाईन लर्निंग अंतर्गत युटूब व्हिडिओ बनविणे, शैक्षणिक विषयांवर ब्लॉग लिहिणे, विविध सोशल मिडीयांच्या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह लेक्चर घेणे यासारख्या विविध डिजिटल लर्निंग पर्यायांचा अंर्तभाव यात करण्यात आला आहे. प्रा. देसले व इतर प्राध्यापक वर्ग या नवीन डिजिटल संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असतात.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्यासह उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, एसबीपीआयएमचे संचालक डॉ. पी.एन. नारायण, आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, तळेगाव एनएमआयटीचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत घरी रहावे व आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.