‘बांबूच्या झोपडी’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना

'बांबूच्या झोपडी'मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना

पुणे (लोकमराठी) : गणेशोत्सव ‘इको फ्रेंडली’ साजरा करण्याकडे मागील काही वर्षांपासून पुणेकरांचा कौल वाढत आहे. अनेक नागरिक आपल्या घरातील गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करत आहेत. त्यात नितीन कुलकर्णी हे एक असून त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये सुंदर आणि पर्यावरणपूरक “बांबूच्या झोपडी’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.

कोथरूड येथील व्यावसायिक असलेले कुलकर्णी यांनी या वर्षी बांबूच्या पट्ट्यांपासून निर्माण केलेल्या चटईचा वापर करत “झोपडी’ हा दहा फुटी देखावा साकारला आहे. देखाव्यासाठी वापरलेल्या सर्व गोष्टी या पर्यावरणपूरक असून झोपडीच्या छतासाठी गवताचा वापर केला आहे. तसेच देखावा सजावटीसाठी घरातील झाडांचा वापर करण्यात आला आहे. कोणतीही विद्युतरोषणाई न करता वातीच्या पंत्यांचा वापर सजावटीसाठी त्यांनी केला आहे. कुलकर्णी हे मागील चार वर्षांपासून वेगवेगळ्या विषयावर पर्यावरणपूरक गणपतीची सजावट करतात. कुलकर्णी म्हणाले, “”गेल्या चार वर्षांपासून आम्ही पर्यावरणपूरक सजावट करत आहोत. या वर्षी बांबूची झोपडी बनविण्यात आली असून दहा दिवसांनंतर महापालिकेच्या हौदामध्ये गणपतीचे विसर्जन करतो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला पाहिजे.”