हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे तात्या | बस नाम ही काफी हैं ‘एसीपी आर. आर. पाटील’

हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे तात्या | बस नाम ही काफी हैं 'एसीपी आर. आर. पाटील'

रोहित आठवले

वलयांकित असूनही लोप्रोफाईल आयुष्य जगलेले, स्वता:ला हायप्रोफाइल न समजणारे, हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे असे पोलिस अधिकारी म्हणजे तात्या.. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील..

दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सख्खे बंधू असणारे तात्या म्हणजेच राजाराम रामराव पाटील हेही आर. आर. पाटील; पण तात्या म्हणून राज्यभर परिचित आहेत. पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तात्या आज निवृत्त होत आहेत.

पोलिस खात्यात भरती होणारे आणि वयपरत्त्वे निवृत्त होणारे अधिकारी मी खूप पाहिले. मात्र, १२ वर्ष गृहमंत्री तसेच काहीकाळ उपमुख्यमंत्री असणाऱ्या आबांचा सख्खा भाऊ असूनही तात्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात एक दोन नव्हे तर वीस वर्ष साईड पोस्टिंग केले.

एकीकडे ग्रामपंचायत सदस्याचा किंवा आमदाराचा कार्यकर्ता नातेवाईक असल्यास आत्ताचे रिक्रूट (नवं भरती) पोलिस क्रीम पोस्टिंग पदरात पाडण्यासाठी उंबरे झिजवताना पाहायला मिळतात. परंतु, तात्यांनी क्रीम काय साधे एक्झिक्यूटिव्ह पोस्टिंगसाठी देखील कधीही आबांकडे नियुक्तीची मागणी केली नाही.

गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून न मिरवता तात्यांनी नेहमीच अंतर ठेऊन काम केले. कधी कधी त्यांच्या सेवा काळाबद्दल विचार केला तर गृहमंत्र्यांचे भाऊ म्हणून काम करताना त्याचे काही तोटे सुध्दा असू शकतात हे तात्यांकडे पाहिले की जाणवते.

बीएस्सी फिजिक्स मधून शिक्षण घेऊन तात्या १९८६ मध्ये पोलिस दलात फौजदार म्हणून भरती झाले. आज पस्तीस वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त होत आहेत. या कालावधीत त्यांना ६५० हून अधिक बक्षीसे मिळाली. तसेच महासंचालक सन्मानचिन्ह आणि १५ ऑगस्ट २००६, १५ ऑगस्ट २०१९ असे दोन वेळा राष्ट्रपती पदकाने तात्यांनी गौरविण्यात आले आहे.

तात्या पोलिस भरती पूर्व परीक्षेत पास झाले आणि ही बाब त्यांनी आबांना सांगितल्यावरचा भावनिक किस्सा आठवला तरी तात्यांचे डोळे पाणावतात… घरचा पहिलाच सरकारी पगार असलेली व्यक्ती म्हणून आबांना सुध्दा नेहमी त्यांचा अभिमान सर्व कुटुंबाला आहे.

नाशिक या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन ते मुंबई येथे रुजू झाले. मुंबईचा फौजदार होणारा अंजनी गावातील पहिला तरुण म्हणजे तात्या होते.. मुंबईत काही पोलिस ठाण्यात काम केल्यावर तात्यांची कोडोली, जयसिंगपूर, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर (करवीर विभाग) अशी नोकरी झाली.

मला भावलेले तात्या

कोरोना काळात पिंपरी चिंचवड पोलिस दलातील अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांना कोविड १९ ची लागण झाली. या कालावधीत त्यांची ९२ वर्षांची आई ते काही महिन्यांचा नातू हे सगळे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.

पण शहरातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा याकाळात मृत्यू देखील झाला होता. कर्मचारी लवकरात लवकर बरे व्हावेत, एकाचाही मृत्यू होता काम नये असे तात्यांनी सर्वांना बजावले होते. लोक नातेवाईकांपासून लांब पळत होते, असा हा काळ होता.

शहरातील तीन हॉस्पिटलमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांना दाखल करण्यात आले होते. काहीजण व्हेंटिलेटर वर देखील होते. याकाळात तात्या दिवसातून दोन वेळा हॉस्पिटलमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस करीत होते.

पीपीइ किट घालून तात्या दररोज सर्व पॉझिटिव्ह पोलिसांची भेट घेत होते. संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होते. मात्र, तात्यांनी दिनक्रम बदललेला नव्हता. ते या कालावधीत देखील पॉझिटिव्ह पोलिसांची भेट घेऊन त्यांच्या उपचारांची काळजी घेत होते.

२१ जून २०१९ ते ५ फेब्रुवारी २०२१ या काळात तात्या पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात एसीपी क्राईम १ म्हणून नियुक्तीस होते. बऱ्याचदा तात्यांनी क्राईम २, प्रशासन, वाहतूक, विशेष शाखा असे सगळे अतिरिक्त पदभार ही सांभाळले. या काळात तात्यांनी भेटायला दररोज असंख्य लोक येत. येणाऱ्या प्रत्येकाला काही मिनिटे का होईना पण तात्या भेट देत. त्यांचे काम ऐकून संबंधिताला फोन लावत, ते काम कसे मार्गी लागेल असा त्यांचा प्रयत्न असायचा. अनेकांना तर तात्या केबिनच्या दारापर्यंत सोडायला जायचे. एका गृहमंत्र्यांच्या भाऊ आणि शहराचा एसीपी क्राईम असून देखील एवढा सामान्य कसा काय राहू शकतो हे अनेकांना न उलगडणारे कोडेच असायचे.

एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकदा तात्यांना पिंपरी चिंचवड मधीलच एका परिसरात सपत्नीक जायचे होते. पण कामाच्या धबडग्यात बराच उशीर झाला होता. पत्नीला कार्यक्रमाला पुढे पाठवायचे तर सरकारी गाडी दोनवेळा एकाच कामासाठी का वापरायची म्हणून त्यांनी पत्नीला काही काळ पोलिस आयुक्तालयाच्या समोरील मंदिरात थांबायला सांगितले. हा थोडावेळ म्हणजे तब्बल अडीच तास एवढा होता. पण त्याही तात्यांप्रमाणेच, कोणताही बढेजावपणा न ठेवता वाट बघत थांबून होत्या. तात्या काम संपवून साडेसात वाजता खाली आले आणि त्यानंतर सपत्नीक कार्यक्रमस्थळी गेले होते.

नोकरीतील शेवटचा दिवस आईला सॅल्यूट..

आज सेवेत असताना शेवटचे ऑफिसकडे जाताना त्यांना खूप कष्ट करून शिकवलेल्या आईला सॅल्यूट करून ते रवाना झाले. आबांच्या अकाली जाण्याने राज्यातील जनतेसह पाटील कुटुंबाला वैयक्तिक मोठी पोकळी जाणवत राहिली आहे.

आबा गेले तेव्हापासून तात्यांना पिंपरी चिंचवडमध्ये पोस्टिंग मिळेपर्यंत ते दर रविवारी आई ला भेटण्यासाठी मूळगावी जात असत. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये नियुक्ती मिळाली आणि कोरोना महामारी सुरू झाली. त्यामुळे पोलिसांच्या सुट्ट्या बंद झाल्या. रविवारच्या दिवशी पण शहर पोलिस दलातील सर्वच वरिष्ठ अधिकारी रस्तावर उतरून काम करताना पाहायला मिळत होते. त्यामुळे रविवार आला की आईच्या ओढीने तात्यांची सुरू असलेली घालमेल पाहून समोरील व्यक्तीपण व्याकूळ होत असे. अखेर कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच तात्यांची कोल्हापूर येथे बदली झाली आणि आज ते निवृत्त होत आहेत.