पिंपरी : “पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” अशा शब्दात महापौर उषा माई ढोरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्तीबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपच्या वतीने आज पिंपरीत नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले भाष्य हे निंदनीय आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं शोभत नाही. त्यांना मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची किंमत कळत नसेल तर ते काँग्रेसचे अध्यक्ष करण्याच्या लायकीचे नाहीत. काँग्रेस पक्ष अशा नालायक लोकांना अध्यक्ष करून माणसाच्या अंगावर कुत्र्यासारखे सोडत असतील, तर ते अशोभनीय आहे,” अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबद्दल अशी भाषा पटोले करत असतील तर त्यांनी समोर यावं, पुरुष नकोत, आम्ही महिलाच बास झालोत. त्याला डांबरी रस्त्यावर तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” असा एकेरी उल्लेख करत त्यांनी संताप व्यक्त केला.