मावळ तालुका गुणवंत शिक्षका पुरस्काराने सुमेधा काळे सन्मानित

मावळ तालुका गुणवंत शिक्षका पुरस्काराने सुमेधा काळे सन्मानित

पुणे : शिक्षण विभाग पंचायत समिती मावळ, सभापती, उपसभापती व सर्व पंचायत समिती सदस्य यांनी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यात तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिरदे या गावात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सुमेधा काळे यांचा गुणवंत शिक्षका हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

शिरदे हे मावळ तालुक्यातील अतिदुर्गम असे गाव असून सुमेधा काळे या मागील तीन वर्षांपासून तेथे ज्ञानदानाचे काम करत आहेत. तेथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी त्या सदोदित प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून पंचायत समिती मावळने त्यांना सन्मानित केले.

माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी भाजपा राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्याचबरोबर माजी आमदार दिगंबर भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रय शेवाळे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, निकिता घोटकुले आदी मान्यवर उपस्थित होते.

देशाला घडविण्याचे काम हे प्राथमिक शिक्षकांच्या शिकवणीतून सुरू होते. आणि आज मला शिक्षकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले. त्याबद्दल मी आभार मानते. असा शिक्षकांप्रती आदर चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला.

सुमेधा काळे म्हणाल्या की, “हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असणार आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य निस्वार्थपणे करण्याचा माझा सदैव पप्रयत्न राहील.”