
पिंपरी : कोविडमुळे पतीचे छत्र हरवलेल्या पल्लवी मिलन कुमार चौधरी या भगिनीस, तिच्या पाल्याच्या पुढील शिक्षणासाठी लेवा भ्रातृमंडळ पिंपळे सौदागर यांच्याकडून तीस हजार रूपयांचा शैक्षणिक शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. पिंपळे गुरव येथे गुरुवारी (ता. २३ डिसेंबर) उद्योजक व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांचे हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
त्याप्रसंगी नगरसेवक संदीप कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, लेवा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, कार्याध्यक्ष कृष्णाजी खडसे, कार्याध्यक्ष अशोक भंगाळे व चिटणीस निर्मळ गाजरे आणि इतर सभासद उपस्थित होते.
त्यावेळी शंकरशेठ जगताप यांचा सत्कार लेवा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष श्री पिंपळे यांनी केला. नगरसेवक संदीप कस्पटे यांचा सत्कार श्री भंगाळे यांनी केला. तर सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांचा सत्कार श्री पिंपळे यांनी केला.
कार्यक्रमात श्री खडसे यांनी भ्रातृमंडळाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना जसे की, शिष्यवृत्ती योजना, अभ्यासिका, वाचनालय एवं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि स्कूल व कॉलेजच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मंडळ करत असलेल्या कामाची माहिती दिली. श्री पिंपळे यांनी निदर्शनास आणून दिले की, मंडळ निर्माण करीत असलेल्या सर्व सुविधा सर्व समाज बांधवांसाठी उपलब्ध असतात. अभ्यासिकेला महापालिका किंवा शासकीय शाळेतून शिक्षण घेणारी आणि दिव्यांग मुलांना विशेष सवलत असणार आहे. हे ग्रंथालय व अभ्यासिका केंद्र १५ जानेवारी २०२२ पर्यंत सुरु होईल असे अपेक्षित आहे.
त्यावेळी शंकरशेठ जगताप यांनी सुद्धा लायब्ररी एवं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक ती पुस्तके व अन्य मदत, वैद्यकीय उपकरणे, बॅंकसाठी मदत करण्याचे जाहीर केले. तसेच त्यांनी श्रीमती पल्लवी चौधरी हीच्या मुलाची शाळेची फी माफ करण्यासाठी व तिला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. श्री भंगाळे यांनी परिसरात मंडळ कार्यालयासाठी जागेची नितांत गरज असल्याने त्यासाठी सुद्धा सहकार्य मिळावे, अशी विनंती केली. शेवटी श्री खडसे यांनी आभार मानले.