मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने केली आहे.

आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने रातोरात आपला निर्णय बदलून मोफत एस टी बस सेवा ही केवळ महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी असेल असा निर्णय दिला. एका बाजूला शासनाने कोटा शहरातून विद्यार्थ्यांना आराम बसमधून मोफत आणले, दुसरीकडे पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराची संधी शोधत, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दुप्पट तिकीट आकारण्याचा निर्णय म्हणजे गेले दीड महिने अडकून पडले, विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे.

हे सर्व विद्यार्थी परीक्षांच्या अनिश्चित वेळापत्रकाअभावी या शहरांमध्ये थांबून होते. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबामधून असल्यामुळे अशा परिस्थितीत यांच्याकडून तिकीटाचे पैसे घेणे हे सरकारला न शोभणारी गोष्ट आहे. यामुळे सरकारने त्वरित आपला निर्णय बदलावा व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने केली आहे.