महिला पोलिसांप्रमाणेच सर्व क्षेत्रातील महिलांना कामाचे आठ तास करा : सायली नढे

महिला पोलिसांप्रमाणेच सर्व क्षेत्रातील महिलांना कामाचे आठ तास करा : सायली नढे
  • महाविकास आघाडी सरकारचे महिला कॉंग्रेसने केले अभिनंदन

पिंपरी : महिला पोलिसांना कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारी निभावताना शारिरीक तसेच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. याचा विचार करुन महाविकास आघाडी सरकारने १ फेब्रुवारी पासून महिला पोलिसांना कामाचे तास कमी करुन आठ तासांची ड्युटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचे पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसने अभिनंदन केले असून तसे पत्र पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिले आहे. यावेळी छाया देसले, सुप्रिया पोहारे, भारती घाग, आशा भोसले, सोनाली गिरी आदी उपस्थित होते.

या पत्रात पुढे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस पक्ष एक महत्वाचा घटक पक्ष आहे. कॉंग्रेस पक्ष देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष आहे. कॉंग्रेसने नेहमीच महिलांचा आदर आणि सन्मान केला आहे. कॉंग्रेस पक्षानेच देशाला प्रथम महिला पंतप्रधान, प्रथम महिला राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री मंडळात प्रथम महिला केंद्रिय मंत्री, प्रथम महिला राज्यपाल दिल्या आहेत. देशात प्रथम महिला आयएएस आणि आयपीएस देखिल कॉंग्रेसच्याच काळात झाल्या आहेत.

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी या देखिल नेहमीच महिलांचा सन्मान करुन त्यांना राजकारणासह विविध क्षेत्रात सक्षम करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. कॉंग्रेसच्या कार्यकाळातच पोलिस दलासह विविध क्षेत्रात करीअर करण्यासाठी महिलांना संधी उपलब्ध करुन देण्यात आली. कॉंग्रेसचा सहभाग असणा-या महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांना आठ तासांची ड्युटी देण्याचा घेतलेला हा निर्णय अभिनंदनीय असून महिलांप्रती सहानुभुती दर्शविणारा आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली आता शहरातील गुन्हेगारीवर वचक बसणे अपेक्षित आहे. तसेच महिला, युवतींवर होणा-या अत्याचारांच्या घटनांना पायबंद बसणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जसे की, मंडई, बस स्थानके, बाजारपेठा अशा परिसरात पोलिसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे महिलांना अशा ठिकाणी असुरक्षित वाटणार नाही. याबाबत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अशीही मागणी या पत्रात पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांनी केली आहे.