शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

पिंपरी : शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी खासदार गजानन धरमसी बाबर (वय ७९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (ता. २) दुपारी उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. गेली तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक झाली. सायंकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पिंपरी चिंचववड शहरात शोककळा पसरली.

बाबर यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांचे बंधू मधुकर बाबर यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री, उद्योजक धीरज आणि सुरज ही दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर, प्रकाश बाबर हे त्यांचे धाकटे बंधू तर, माजी नगरसेविका शारदा बाबर या भावजयी होत.

पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटना रुजविण्यापर्यंत बाबर यांचे मोठे योगदान होते. शहरात घरमालक आणि भाडेकरू असे वाद कायम होत असतं. त्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून बाबर यांनी शिवसेनेच्या मदतीने भाडेकरूंसाठी संघटना स्थापन केली होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते काळभोरनगर येथे शिवसेनेची प्रथम शाखा त्यांनी स्थापन केली.

दिवंगत बाबर यांच्याबाबत

  • पिंपरी चिंचवड महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक
  • हवेली विधानसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा शिवसेनेचे आमदार
  • मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रथम शिवेसना खासदार
  • पिंपरी चिंचवड व्यापारी संघटनेचे गेली २५ वर्षे अध्यक्ष
  • सातार जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे गेली १५ वर्षे उपाध्यक्ष