डॉ वंदना कामत
मानसिक आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. नैराश्य, चिंता इत्यादी आजाराचं प्रमाण वाढताना दिसतंय. आत्महत्यांचं प्रमाण देखील वाढत आहे. हा चिंतेचा विषय आहे. आज देखील आपल्या समाजात मानसिक आजार सहजपणे स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे ते लपवण्याकडे कल असतो. मनातले विचार, भावना मोकळेपणाने बोलून दाखवणं देखील शक्य होत नाही कित्येकदा.
ह्या सगळ्यातून , माणसाला आवश्यक असलेल्या भावनिक आधाराचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. किंबहुना अन्न, वस्त्र, निवारा या इतकाच भावनिक आधार , ही आता जीवनावश्यक गरज वाटू लागली आहे.
पूर्वी देखील ताणतणाव होते पण कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांशी संवाद असे. कुटुंबातील आजी, आजोबा हे नकळतपणे भावनिक आधार देत असत. अडी अडचणीच्या प्रसंगी त्यांचं अनुभवातून आलेलं शहाणपण हे घरातील इतरांना मार्गदर्शक ठरत असे.
नातवंडं आणि आजी आजोबा यांच्यात एक अनोखं बॉंडिंग असायचं. जरा काही खुट्ट झालं किंवा आई बाबांनी ओरडलं, इतक्या साध्या गोष्टीसाठी सुध्दा मुलं आजी आजोबांकडे धाव घेत असत. आई वडिलांच्या कर्तव्यदक्ष नजरेबरोबर आजी आजोबांची जबाबदार आणि प्रेमळ नजर असे मुलांवर. त्यामुळे नकळतच एक सुरक्षिततेची भावना तयार व्हायची मनात.
आपल्याला काही बोलावसं वाटलं तर माणसं असत अवतीभवती. अगदी शेजारी सुद्धा आपल्यावर लक्ष ठेवून असत. ही सगळी भावनिक सुरक्षितता आज पन्नाशीच्या आत बाहेर असलेल्या आणि त्या आधीच्या पिढीने अनुभवलेली आहे.
काळ बदलला तशी घरातली आणि आजूबाजूची परिस्थिती बदलत गेली. आजी आजोबांचा सहवास मुलांना काही काळापुरताच किंवा अजिबातच मिळेनासा झाला. त्यामागची कारण मीमांसा करायची नाहीये पण ते वास्तव आहे. नोकरीच्या, व्यवसायाच्या चक्रात अडकलेल्या पालकांना स्वतःशी सुध्दा संवाद साधायला वेळ मिळेनासा झाला तिथे मुलांशी संवाद साधण्याची गोष्ट दूरच राहिली. पती पत्नी मधला, आईवडील आणि मुलं यांच्या मधला, इतर सदस्यांचा घरातील जेष्ठ नागरिकांबरोबरचा संवाद कमी होऊ लागला.
प्रत्यक्ष भेटीची जागा फोन वरच्या संभाषणाने घेतली. नंतर दुनिया मुठ्ठीमे करायला लावणाऱ्या मोबाईल ने तर सगळं चित्रच बदलून टाकलं. त्यातच सोशल मीडियाचं आक्रमण झालं आणि हवा असलेला संवाद मग तिथे साधण्याचा प्रयत्न सुरू झाला . त्या संवादाचा कितपत उपयोग झाला माहीत नाही पण एक निराळ्या स्पर्धेला मात्र नक्की सुरुवात झाली.
कुटुंबातील माणसांची स्वतंत्र बेटं तयार झाली .स्पेस जपण्याच्या नावाखाली ती एकमेकांपासून अधिक दुरावत गेली. अगदी लहान वयापासूनच मुलांना वेगवेगळ्या तऱ्हेने जीवघेण्या स्पर्धेला सामोरं जावं लागलं. पालकांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात स्पर्धा होतीच. नकळत सगळेच एक प्रकारच्या अदृशय तणावात जगू लागले .
ह्या सगळ्यात माणसा माणसातला प्रत्यक्ष संवाद कसा हरवत गेला ते कळलं देखील नाही. पूर्वी मित्र मैत्रिणी, नातेवाईक यांच्या प्रत्यक्ष गाठी भेटी व्हायच्या तशा आता व्हॉटसॅप ग्रुपवर होतात. एकमेकांची विचारपूस तिथेच केली जाते आणि शुभेच्छा देखील तिथेच दिल्या जातात. आपण कितीही मनापासून लिहिलं तरी भावनेचा ओलावा समोरच्याला जाणवतोच असं नाही.
पाठीवरून फिरलेला एखादा आधाराचा हात, प्रेमाने मारलेली मिठी किंवा मैत्रीने घट्ट धरलेला हात याची सर त्या संभाषणांना काही केल्या येत नाही. आणि मग सगळं असूनही माणूस कधीकधी एकटा पडल्यासारखा होतो.
त्यामुळेच की काय मग सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. तिथे हजारो मित्र संख्या असलेली व्यक्ती प्रत्यक्षात खूप एकटी पडलेली असू शकते. प्रत्येक गोष्टीला चांगल्या , वाईट अशा दोन्ही बाजू असतात. आपण त्याचा कसा वापर करतो यावर सगळं अवलंबून असतं.
अशीच सोशल मिडियाची एक सकारात्मक बाजू नुकतीच मला जाणवली. माझा एक आनंदी, प्रसन्न, बोलक्या स्वभावाचा, ग्रुपवर नियमित हजेरी लावणारा डॉक्टर मित्र अचानक आमच्या व्हॉटसअप ग्रुपवरून गायब झाला. सुरुवातीला मला वाटलं की बिझी असेल म्हणून दिसत नाही. हे बराच काळ असंच सुरू राहिल्यावर मी न राहवून त्याला फोन केला तेव्हा तो खूप अस्वस्थ असल्याचं लक्षात आलं. त्याच्याशी नियमितपणे संवाद सुरू केला. त्याच्या साठी ऐकणारा कान झाले आणि आधार देणारी मैत्रीण पण झाले. तो स्वतः देखील यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतच होता. हळूहळू त्याच्यात बदल होत गेला. आज तो अगदी पूर्वीसारखा झाला आहे.
एखाद्या व्यक्तीचं समाज माध्यमावरील वर्तन हे कधी कधी त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचं निर्देशक असू शकतं , हे लक्षात घेतलं पाहिजे. वेगळं काही आढळलं तर आपण स्वतःहून त्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. मुळात एखाद्या व्यक्तीच्या , वरकरणी कुठलंही कारण नसताना बदललेल्या वर्तनाबद्दल सजग होण्याची गरज आहे. मग ते वर्तन प्रत्यक्षातील असो वा सोशल मीडियावरील. एकदा सजगता आली की पुढचा टप्पा संवाद साधण्याचा असतो.
संवाद हा भावनिक प्रथमोपचाराचा एक भाग आहे. अर्थात संवादाचा अभाव असणं हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही. जे सजग आहेत त्यांनी आपापल्या कुटुंबातला संवाद आजही हरवू दिलेला नाही. जे लाटे बरोबर वाहत गेले त्यांनी मात्र आता सावरण्याची गरज आहे.
अजूनही आपल्या समाजात, शरीराप्रमाणेच मनाला देखील त्रास होतो, हे सहजगत्या स्वीकारलं जात नाही. मनाबद्दल काही बोललं की दुबळा किंवा थेट वेडा म्हणून संभावना केली जाते. त्यामुळे व्यावसायिक मदत (मानसोपचार तज्ञ, समुपदेशक यांची) घ्यायला लाज वाटते. अशा वेळी जवळच्या मंडळींकडून भावनिक प्रथमोपचार केले जाऊ शकतात. त्या साठी संवादाची गरज असते . असे प्रथमोपचार जर वेळीच मिळाले तर संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकतात.
आपल्या मनाला त्रास देणारं असं काही घडत असेल, कुठल्याही प्रकारे तणाव येत असेल, भीती वाटत असेल तर ह्या भावना बोलून दाखवता येतील अशी व्यक्ती असणं खूप गरजेचं असतं. “काहीही झालं तरी मी आहे तुझ्याबरोबर” हे असे शब्द जादुसारखं काम करतात. कित्येकदा त्या वेळेपुरता नुसता भावनिक आधार हवा असतो. प्रत्यक्ष समस्या सोडवण्याची क्षमता असते त्या व्यक्तीची.
कधी कधी नुसतं ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं. दर वेळेला समस्याच असते असं नाही. कधी कधी आपला दिवस खूप वाईट जातो, त्याबद्दल नुसतं कोणालातरी सांगायचं असतं. कुठल्याही प्रकारे जज न करता ऐकून घेणारं कुणीतरी हवं असतं. अशा निरनिराळ्या तऱ्हेने संवादाचे पूल बांधण्याची गरज आहे.
भावनांचा योग्य प्रकारे निचरा नाही झाला तर त्याचं मानसिक आजारात रूपांतर होऊ शकतं. आणि सहनशक्तीचा कडेलोट झाला की आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल देखील उचललं जातं.
आज भारतात दर पाच मिनिटाला एक आत्महत्या घडते. आत्महत्या करणाऱ्या दर तीन व्यक्तिमधली एक तीस वर्षे वयाच्या खालची असते . शालेय विद्यार्थ्यांमध्येही आत्महत्येचं प्रमाण लक्षणीय रित्या वाढलेलं आहे. दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. ही आकडेवारी भयानक आहे.
समस्या काल ही होत्या आणि उद्या ही असणारच आहेत. त्याचे आपल्यावर परिणाम होणारच आहेत. आपण मन मोकळं करायला शिकूया, समोरच्याचं ऐकून घ्यायला शिकूया. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनात झालेल्या बदलांकडे सजगतेने पाहायला शिकूया.
सध्या अनेक जुन्या गोष्टींना उजाळा मिळतोय. आवर्जून संवाद साधण्याचा प्रयत्न ही करून पाहूया. माणसांच्या बेटांना जोडणारे संवादाचे पूल बांधूया…
©डॉ वंदना कामत