भाजपच्या धोरणांमुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम – विशाल वाकडकर

भाजपच्या धोरणांमुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम - विशाल वाकडकर
  • विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना पदाधिका-यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पिंपरी : केंद्रातील भाजप सरकारने देशभर भाजप विरोधी असणा-या राज्यसरकारांना दबावतंत्राचे राजकारण करुन हुकूमशाहीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पातळी सोडून सुरु असणा-या या राजकारणाला नागरिक ओळखून आहेत. मागील सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चूकीची धोरणे राबवली आहेत. त्यामुळे उद्योग, व्यवसायांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. याचा सर्वात जास्त फटका तरुणांना व सुशिक्षित बेरोजगारांना बसला आहे. हे सुशिक्षित बेरोजगार तरुण घरोघरी जाऊन भाजपची चूकीची धोरणे नागरिकांपुढे मांडतील असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले.

वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड कामगार संघटनेच्या प्रमुख पदाधिका-यांनी व मुख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पिपंरी चिंचवड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते सोपान (काका) म्हेत्रे, विजय घोडके, राजनाथ यादव, मनोज पाटील, सिद्धार्थ वासनिक, संजय सावळे, किशोर शिंदे, स्वप्निल बेंडाळे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप (लाला) चिंचवडे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष योगेश गवळी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे, सरचिटणीस अक्षय माछरे, उपाध्यक्ष मयूर जाधव, प्रसाद कोलते आदी उपस्थित होते.

वाकडकर म्हणाले की, “आदरणीय लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगिण विकास केला आहे. या शहराच्या औद्योगिक प्रगतीमुळे देशभरातील बेरोजगारी व नोकरी व्यवसायासाठी पिंपरी चिंचवडला येतात. परंतू केंद्र सरकारने शेती, उद्योग, व्यवसाय, कामगार क्षेत्रासाठी प्रतिकुल निर्णय घेतले. त्यामुळे देशभर बेकारीचे प्रमाण वाढले. त्याचा परिणाम पिंपरी चिंचवड शहरावर जास्त झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आता शेतकरी, कामगारांसाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी अनुकूल निर्णय घेत आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार आणि तरुणांचा ओढा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडे वाढत आहे. याचा उपयोग आगामी सार्वत्रिक निवडणूकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी होईल.”