मनसे महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड | वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या चारचाकी वाहनाची आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने तोडफोड केली. या घटनेमुळे काळेवाडी तसेच शहरातील मनसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून काळेवाडी परिसरातही चांगलीच खळबळ उडाली आहे.

या तोडफोडीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी तीन अज्ञात हल्लेखोरांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मनसे महिला उपशहराध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड | वाकड पोलिसांत गुन्हा दाखल

अनिता पांचाळ यांचे चारचाकी वाहन काळेवाडी येथील पाचपीर चौक येथे त्यांच्या राहत्या घराजवळ पार्क करण्यात आली होती. पहाटे चार ते सव्वाचारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी कोयत्याच्या सहाय्याने पांचाळ यांच्या गाडीवर वार करीत गाडीच्या काचा फोडल्या.

ही घटना कळताच शहर आणि काळेवाडी परिसरातील मनसैनिकांनी पांचाळ यांच्या घराजवळ मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना अनिता पांचाळ म्हणाल्या की, सदर घटना धक्कादायक असून यासंदर्भात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आमची कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र गेल्या अनेक वर्षात काळेवाडी परिसरात आमच्या सातत्यपूर्ण करीत असलेल्या जनसेवेचा कोणाला त्रास होत असेल तर सांगता येत नाही. मात्र आपण अशा भेकड हल्ल्यांना घाबरत नाही. असे कितीही हल्ले केले तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच आवाज उठवत राहीन. आमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही, असा इशारा अनिता पांचाळ यांनी यावेळी दिला.

नेमका महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.