केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन 

पिंपरी, पुणे (दि. ६ फेब्रुवारी २०२३) : केंद्रातील मोदी सरकारच्या आशीर्वादामुळे गौतम अदानी हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती ठरले होते. हिंडेनबर्ग कंपनीने अदानी उद्योग समूहाची पोलखोल केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. जनतेचा पैसा धोक्यात असतानाही मोदी सरकार उद्योगपती मित्रासोबत आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केली.

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी चंद्रशेखर जाधव बोलत होते.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गौरव चौधरी, सरचिटणीस विशाल कसबे, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित शेळके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदी सरकारवर टिका करताना जाधव पुढे म्हणाले की, सेबी सारख्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाही मोदी सरकार याबाबत अदानींना क्लीनचीट देत आहे. निवडणूकीत दिलेले आश्वासन ते विसरले असून मोदी सरकारचा हात आम आदमी के साथ नसून ठराविक उद्योगपतींच्या साथ आहे.