निगडी, (लोकमराठी) : चिखली येथील गावठाणाच्या जागेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी त्या जागेतील सुमारे दोन हजार झाडे तोडली जात आहेत. निसर्गाचा ऱ्हास करून प्रकल्प उभारणीला स्थानिक नागरिक आणि लहान बालमंडळींनी विरोध केला आहे. याच्या निषेधार्थ ‘जगा व जगू द्या’ या अभियानांतर्गत लहान मुलांनी निषेध आंदोलन केले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.
‘जर एखादा देश अथवा तेथील नागरिक झाडांचा नाश करत असतील तर ते स्वतःचा नाश करत आहेत’, ‘राजकारणी, विकसक आणि अधिकारी वृक्ष लागवडीचे नियम बासनात बसवत आहेत, पालिकेचे निसर्ग संवर्धनाचे ढोंग’, ‘राजकारण्यांनो निसर्ग वाचवा अन्यथा आम्ही उद्याचे मतदार धीरे का झटका जोर से लगे’, ‘राजकीय स्वार्थासाठी पाणवठे बुजवले जात आहेत. त्याकडे का दुर्लक्ष होत आहे’, ‘दोन थेंब वापराच्या पाण्याचे कमी द्या! पण आमचे आरोग्य सदृढ ठेवा.
वाढत्या प्रदूषणाचा आम्हाला कमालीचा त्रास होत आहे’, ‘एकीकडे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे’ सांगणारे संतपीठ आणि त्यांच चिखलीत पालिकेच्या नियोजन शून्यतेमुळे प्रचंड वृक्ष कत्तल करून संतपीठाचा अवमान’ अशा घोषणांचे फलक लहान मुलांनी घेऊन आंदोलन केले.
‘जगा व जगू द्या’ अभियानचे संस्थापक डॉ. संदीप बाहेती म्हणाले, “चिखलातील जलशुद्धीकरण केंद्रासाठी सुमारे दोन हजार झाडे कापली जात आहेत. एकीकडे साडेतीन एकर जागेत महापालिकेचा जैवविविधता प्रकल्प आहे. हा प्रकल्पच मुळात हास्यास्पद आहे. या प्रकल्पासाठी महापालिका साडेतीन ते चार कोटी खर्च करत आहे. तर दुसरीकडे महापालिका तीस वर्ष वयाची सदृढ असलेली वीस एकर जागेवरील जैवविविधता महापालिका नष्ट करीत आहे.
‘वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे’ असा संदेश देणा-या संत तुकाराम महाराजांच्या चिखली पावन भूमीत संतपीठ होत आहे. त्याच चिखलीत वृक्षांची कत्तल केली जात आहे. विकासकांना एक चौरस फुटला पाच झाडे या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे बंधनकारक केले आहे. परंतु महापालिका, अधिकारी आणि राजकारणी हे बंधन बासनात गुंडाळून ठेवत आहेत. पाणीपुरवठा करणा-या पाईपलाईनमधून सुमारे 40 टक्के पाणीगळती होते. ती थांबवल्यास हा प्रकल्प तात्पुरता थांबवता येईल. या कालावधीत दुसरी जागा शोधता येऊ शकते.
उन्हाळ्यात वाढणारे एक डिग्री तापमान प्रतिमानसी एक लिटर पाण्याची गरज वाढवते. हे तापमान वाढल्यास पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 25 लाख लिटर पाण्याची गरज वाढले. तसेच बाष्पीभवन होणारे पाणी मिळून एका दिवसाला सुमारे 50 लाख लिटर पाणी अधिक लागेल. निसर्गाचा ऱ्हास करून पाण्याची मागणी वाढवली जात आहे. ‘झाडे व माणसे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, झाडे संपली तर माणूस संपायला वेळ लागणार नाही’ असा महापालिका आयुक्तांच्या लिफ्टजवळ बोर्ड आहे. पण वृक्षतोड सुरुच आहे. महापालिकेला निसर्गाबाबत जराही संवेदनशीलता नाही.
जलशुद्धीकरण केंद्रासाठी पर्यायी जागा बघावी. निसर्गाचा ऱ्हास थांबवावा. चिखली गावठाणाच्या जागेला कायमस्वरूपी संरक्षित करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.