महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ | लेखक नितीन थोरात यांचा उपरोधिक टोला

महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ | लेखक नितीन थोरात यांचा उपरोधिक टोला

लोकमराठी न्यूज नेटवर्क

कोरोना (covid-19) नियंत्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विमानातून औषध फवारणी करणार आहेत. या संदर्भातील लेखक नितीन थोरात यांची उपरोधिक पोस्ट मोदी समर्थकांनी खरी समजून मोठ्या प्रमाणावर व्हायरल केली होती. त्यावेळी अगदी खेड्यापाड्यात लोकांनी घरात कोंडून घेतले होते. त्याप्रमाणेच आता लेखक नितीन थोरात यांनी ‘महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ’ या मथळ्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

थोरात यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक गुलाम गारठून थंड पडावा, अशी बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठ क्लोन तयार करण्यात आले आहेत. अमेरिकन गुप्तफेर यंत्रणेतल्या विश्वसनीय सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. भारतात आजवर कोणत्याही पंतप्रधानाचे क्लोन बनविण्यात आले नव्हते, त्यामुळे मोदी साहेबांच्या चाणक्य निती कौशल्याची झलक पहायला मिळत आहे. क्लोन म्हणजे हुबेहुब दिसणारी जिवंत माणसे.

मित्रांनो, आपले पंतप्रधान आंतरराष्ट्रीय नेतृत्वाच्या उंबरठ्यावर आहेत. संपुर्ण जग भारतासमोर झुकेल असे नेतृत्वगुण मोदीजींच्या अंगी असल्याने त्यांचे शत्रूही वाढले आहेत. अशावेळी खबरदारी म्हणून हुबेहुब मोदिंप्रमाणे दिसणाऱ्या आठ माणसांना तयार करण्यात आले आहे. याच माणसांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरतात.

आपणच विचार करायला हवा की, रिकाम्या बोगद्यात मोदी साहेब हात हालवू शकतात का? खिल्ली उडवली जाईल अशी लाईट तोंडावर मारु शकतात का? मोरासोबत टुकार फोटोसेशन करु शकतात का? गुहेत बसू शकतात का? प्रत्येकवेळी कॅमेऱ्याकडं बघू शकतात का? डोनाल्ट ट्रम्पला डोलांट ट्रम्प किंवा योगी आदित्यनाथ यांना आदित्य योगीनाथ असं म्हणू शकतात का? मित्रांनो, टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा वगैरे भाषणे मोदी साहेबांच्या क्लोननी केलेली आहेत. एवढेच नव्हे तर हवेतुन बाष्प बाजूला काढून पाणी तयार करणे किंवा गटारातल्या गॅसवर शेगडी पेटवणे यासारखी चकित करणारी विधान मोदींची नाहीतच. हे सगळं क्लोन बोललेले आहेत. पण, पराभवाने व्यथित झालेले विरोधक आणि त्यांचे गुलाम याच क्लोनला मोदीसाहेब समजत आहेत.

त्यामुळे यापुढे कोणत्याही गुलामाने मोदी साहेबांचा हास्यास्पद फोटो किंवा व्हीडीओ टाकला किंवा लेख लिहिला तर त्याखाली हे मोदी साहेब नाहीतच हे आपण ठामपणे नमूद केले पाहिजे. आणि आपणही मनसोक्त हासुन गुलामांना भ्रमात ठेवले पाहिजे.

यापूर्वी हुकुमशहा सद्दाम हुसेन आणि ओसामा बीन लादेन यांनी क्लोन बनवले होते. त्यांच्यापाठोपाठ महात्मा नरेंद्र मोदी हे क्लोन बनविणारे तिसरे जागतिक नेते ठरले आहेत.

टीप : ज्यांना ही माहिती खोटी वाटेल त्यांनी अमेरिकन गुप्तफेर यंत्रणेच्या अधिकृत वेबसाइट्वरून जाहीर केलेली माहिती पहावी किंवा प्रत्येक फोटोत मोदीसाहेब वेगळे का दिसतात याचा सूक्ष्म अभ्यास करावा.

नमो नमो !!

कट्टर मोदीसमर्थक नितीन थोरात