निकोप समाजासाठी लैंगिक शिक्षणाची गरज

निकोप समाजासाठी लैंगिक शिक्षणाची गरज


जेट जगदीश

खजुराहोच्या मंदिरांवर कामक्रीडेच्या मिथुन शिल्पांना सन्मानित केलेल्या आणि वात्सयानाने कामक्रिडेला निकोपतेच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवलेल्या देशात लैंगिक व्यवहारांचे निकोप शिक्षण न दिल्यामुळे समाजात आज शृंगाराच्या नैसर्गिक प्रकृतीची सीमा विकृतीला जाऊन पोहोचली आहे.

मुलं वयात आल्यानंतर त्यांच्याशी पालक लिंगसमभाव या विषयावर कधीही खुलेपणाने बोलत नाहीत की त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या बदलत्या शरीरशास्त्राची वैज्ञानिक माहितीही देत नाहीत. एवढेच काय पण शाळेतही मानवी पुनरुत्पादनाची माहिती शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थित समजून देण्याऐवजी शाळेतील शिक्षक/शिक्षिकाही मुलांना हा धडा तुम्ही स्वतः वाचा, तुम्हाला सहज समजेल, असे म्हणत हा विषय शिकवणे टाळत असतात. त्यामुळे मुले/मुली लैंगिकतेविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधू लागतात. ती नेहमीच योग्य पद्धतीने मिळतीलच असे नाही. उलट इंटरनेटमुळे चुकीच्या पद्धतीने लैंगिक व्यवहार त्यांच्या समोर येतो आणि तरुणाईला पॉर्न पाहण्याचे व्यसन लागते… विशेषतः आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलांना! त्यामुळे मुलांना लैंगिक व्यवहार म्हणजे फक्त विचित्र पद्धतीने संभोग करणे… तो लांबवणे म्हणजेच मर्दपणा आणि स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे एवढेच कळते. त्याचाच परिणाम म्हणून आज मुलांमध्ये लैंगिकतेसंबंधी मोठ्याप्रमाणावर विकृती पसरल्याचे दिसत आहे… नुकतीच वयात येणारी मुलेही बलात्कार करण्यास धजावत आहेत.

पौगंडावस्थेतील मुलांना योग्य ते लैंगिक शिक्षण न दिल्यामुळे आजची तरुणाई कामक्रीडेला वाईट समजत लपून छपून पॉर्न फिल्म पाहण्यात मोठ्या प्रमाणात रममाण झाली आहे. तरुण मुलांपासून ते प्रौढ आणि वयस्करही पॉर्न फिल्म पहाण्यात आणि सर्रासपणे नजरेने वा जमल्यास शारीरिक बलात्कार करणाऱ्यात भारत हा जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. कारण नैसर्गिक उर्मी शमवण्यासाठी त्यांच्यासमोर या उर्मीचे उन्नयन कसे करायचे हे सांगणारा दुसरा पर्यायच आपण ठेवलेला नाही. आपल्या धर्मातही उच्च संस्कृतीच्या उच्च संस्कारांचे डिंडीम बडवत ‘ब्रह्मचर्य हेच जीवन आणि वीर्यनाश म्हणजे मृत्यू’ असे म्हणत लैंगिकतेच्या नैसर्गिक उर्मीचे दमन करण्यावर जोर दिलेला आहे. पण कोणतीही नैसर्गिक ऊर्मी दाबून टाकल्यावर ती तेवढ्याच जोराने विचित्रपद्धतीने उफाळून वर येते आणि ती सगळ्या समाजाला उध्वस्त करते, हे आपण केव्हा लक्षात घेणार?

म्हणूनच आजच्या शिक्षित पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलांना वैज्ञानिक पद्धतीने लैंगिकतेच्या साधकबाधक परिणामांविषयी समजावून सांगण्याची कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झालेली आहे. पण तेच या बाबतीत संभ्रमात असतील आणि ‘पाण्यात पडले की पोहता येतेच’ या विचाराचे असतील तर तरुणाई विकृत वाटेने गेल्यास जेवढी तरुणाई बेजबाबदार ठरते यापेक्षा जास्त बेजबाबदार पालकच ठरतात. लैंगिकतेविषयीच्या अज्ञानाचा दोष जेवढा तरुणाईचा आहे त्यापेक्षा जास्त त्यांना अज्ञानी ठेवणाऱ्या शिक्षक/पालकांचा तो दोष आहे हे आपल्या केव्हा लक्षात येणार?

विवाहाने प्रस्थापित केलेल्या पुरुषप्रधान समाजात जर स्त्री-पुरुषांची कामवासना योग्य प्रकारे शमविण्याचा विचार आपण करणार असू, तर पहिल्या प्रथम पोटाच्या भुकेप्रमाणे लैंगिक भुकेची अनिवार्यता समजून घेता आली पाहिजे. जसे पोटाची भूक व्यवस्थित भागत असेल तर आपण अन्नसेवन समाधानाने, आनंदाने करतो. लैंगिक भुकेची नेमकी हीच स्थिती आहे. तरीसुद्धा ती सहजपणे भागविण्यात समाज अडथळे उभारतो. विवाहाचं वय वाढून सुद्धा विवाहपूर्व लैंगिक वर्तन हे अनैतिक ठरवतो. तेव्हा उपासमारीची स्थिती निर्माण होऊन ती भूकवासना अनावर होते. त्यातून मग मिळेल त्या मार्गाने स्त्री-पुरुषांनी शरीरसंबंधाचा प्रयत्न करणे, चोरून वेश्यागमन करणे, ब्ल्यू फिल्म्स पाहणे, बलात्कार, छेडछाड, विनयभंग, लैंगिक रॅगिंग, लहान मुलांचे लैंगिक शोषण म्हणजेच एकप्रकारे ‘तुटून पडणे’ ही सेक्सक्रिया सर्वत्र, म्हणजे चित्रपटांतून, कुटुंबातून, मैत्रीमधून, सामाजिक गुन्ह्य़ांतून आणि अगदी वैवाहिक संबंधातूनही दिसते. पण गंमत म्हणजे या गुन्ह्य़ांमागील खऱ्या कारणांना बगल देऊन स्त्रिया अंगप्रदर्शन करतात, म्हणून पुरुष गुन्हे करतात, असा दिशाभूल करणारा युक्तिवाद नेहमी केला जातो. आपल्याला वरवर विचार करण्याची सवय लावली गेल्याने असे युक्तिवाद अगदी चटकन पटतात.

जगभरात विवाहसंस्था सर्वत्र असली तरी प्रत्येक संस्कृतीत सेक्सबाबत असणारा दृष्टिकोन हा त्या त्या देशातील गुन्ह्य़ाचे प्रमाण ठरवतो. सेक्स दृष्टिकोन जितका उदार, जितका निकोप तितकी ती संस्कृती नवनव्या तंत्रज्ञानास सहजपणे सामावून घेत असते. आपण जेव्हा पाश्चिमात्य चित्रपटातील सेक्सप्रदर्शन जसेच्या तसे उचलले. पण तिथे योनीशुचितेचे अवडंबर माजवले जात नाही, हे आपण लक्षात घेत नाही. आपल्याकडे ती कल्पनाही सहन होत नाही. उलट भुकेल्या माणसास जेवणाचे ताट दाखवून ते काढून घेतल्याप्रमाणे सेक्सविषयीचा हा खेळ खेळून भारतीय मानसिकतेचा छळ करण्यासाठी या कल्पना प्रसारमाध्यमांकडून वापरल्या जात आहेत. ज्यामुळे आपला समाज झपाटय़ाने विकृतीकडे चालला आहे.

कुटुंबामध्ये पती-पत्नीने एकमेकांना प्रेमाने जवळ घेणे, प्रेमाने चुंबन घेणे हे आपल्या संस्कृतीत मुलांच्यादेखत ‘वाईट संस्कार’ समजले जातात. पण आश्चर्य म्हणजे मुलांसमोर पत्नीचा पाणउतारा करणे, तिला मुलांदेखत मारणे, एवढेच काय तर टीव्हीवर सहकुटुंब, सहपरिवार उत्तान दृश्य असलेले हिंदी चित्रपट पाहणे हे मात्र वाईट संस्कारात येत नाही!

पाश्चात्त्य देशात जर नंगानाच चालत असेल तर भारतीय मुली ज्या पाश्चात्त्य देशात शिक्षण वा नोकरी करीत आहेत, त्यांच्यावर बलात्कार वा तत्सम लैंगिक हल्ले झाल्याच्या बातम्या आपण ऐकत नाही. मात्र भारतात आलेल्या परदेशी स्त्रियांवर बलात्कार होत असतात आणि बलात्कार करून त्यांची हत्याही होत असते. पुरुषांची आपल्या समाजात कोंडून घातलेली लैंगिक इच्छा आणि पुरुषप्रधान मानसिकतेतून पुरुषाच्या मर्दपणाच्या निर्माण झालेल्या कल्पना, त्यातून पुरुषांची स्त्रीबाबत तयार झालेली भोगवादाची मानसिकता त्याचे हे वरील परिणाम म्हणावे लागतात.

जी गोष्ट आपण अनेकदा पाहतो त्या गोष्टीकडे पाहून आपली नजर मरते, तद्वतच पाश्‍चात्त्य देशात बिकीनी मधल्या स्त्रिया पाहून त्या लोकांच्या नजरा मेलेल्या आहेत. पण आपल्याकडे एकूणच सेक्सचा टॅबू असल्यामुळे आपण अशा स्त्रियांकडे वखवखलेल्या नजरेने पाहतो. म्हणून योग्य वयात मुलांच्या नजरा निकोप व्हाव्या त्यासाठी लैंगिक शिक्षणाची गरज असते हे आपण लक्षात घ्यावे.

विवाह हा नैसर्गिक मुक्त शरीरसंबंध काबूत ठेवण्याचा एक संस्कार असला, तरी मेंदूच्या कार्यपद्धती बदलण्यास तो असमर्थ ठरतो. भारतासारख्या देशात विवाहप्रथा अनिवार्य म्हणून ठामपणे पाय रोवून असूनसुद्धा लैंगिक गुन्हे आणि हिंसा-हत्येचे अन्य गुन्हे यांचे प्रमाण सतत वाढत चाललेले आपण पाहतो. यामागे गेली अनेक शतके आपण लैंगिकतेबाबत बाळगत असलेला सदोष, चुकीचा दृष्टिकोन, हे एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणून योग्य वयात मुलांना लैंगिक शिक्षण दिले तर त्यांचा त्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन सेक्स बद्दल विकृती कमी होईल. हे आपण लक्षात घेणार आहोत काय?