- कोरोनाबाबत गांभीर्याने विचार व तज्ञांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली मागणी
पिंपरी : शहरात कोरोना रुग्णसंख्या ६० हजारांवर गेली असून कोरोना बळींची संख्या एक हजारांहून अधिक झाली आहे. दिवसाला २० ते २५ रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी अत्यंत वेगाने वाढतच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासनाचा गलथाण व भोंगळ कारभार आणि योग्य समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे कोरोना बाबत गांभीर्याने विचार व तज्ञांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना संक्रमणावर प्रतिबंध बसावा यासाठी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या आरटीपीसीआर व अँटीजन चाचण्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. रॅपिड अँटेजन डिटेक्शन टेस्टचा रिपोर्ट अर्ध्या तासाच्या आत मिळतो, मात्र, आरटीपीसीआरचा रिपोर्ट येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात. तसेच काही प्रकरणात अँटीजन टेस्टद्वारे अर्ध्या तासात मिळणारा रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास तेच रिपोर्ट आरटीपीसीआर चाचणी केल्यास पॉझिटिव्ह येतात.
रुपीनगर तळवडे येथील रहिवासी कमल पांडुरंग धुकटे (वय ५८)यांनी एक सप्टेंबर रोजी यमुनानगर रुग्णालयात अँटीजन आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली, अँटीजन टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दहा दिवसानंतरही आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट आला नाही. त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना नऊ सप्टेंबर रोजी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरी देखील त्यांचे रिपोर्ट आले नव्हते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह माहित नसताना उपचारादरम्यान शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यु झाला. यामध्ये रिपोर्ट येण्याआधीच रुग्णाचा मृत्यु झाला असताना त्यावर कहर करत प्रशासनाने दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबरला रुग्णाच्या नातेवाईकांना तुमचा रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णवाहिका घेऊन रुग्णाला घ्यायला येऊ का? असे विचारून कहर केला.
मोहननगर परिसरातील नागरिक चंद्रकांत पोटघन यांनी ९ सप्टेंबरला आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. त्यांनी व त्यांच्या मुलांनी वारंवार एचडीएफसी शाहूनगर येथील टेस्टिंग सेंटरला फेऱ्या मारून देखील आजपर्यंत त्यांना रिपोर्ट मिळाले नाहीत.
आरटीपीसीआरचे रिपोर्ट आठ ते दहा दिवस येत नाहीत, रिपोर्ट येईपर्यंत हे संक्रमित रुग्ण व त्यांचे नातेवाईक समाजात फिरतात. त्यामुळे विषाणूंचा प्रसार होतो. यांसाठी मी पुढील मागण्या करत आहेत.
१) कोरोना अँटीजन व आरटीपीसीआर टेस्टिंग केलेल्या रुग्णांकडून संक्रमण होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी.
२) अँटीजन टेस्टचा रिपोर्ट अर्ध्या तासांत देण्यात यावा तसेच आरटीपी सीआर रिपोर्ट दोन दिवसांत देण्याची व्यवस्था करावी. या टेस्ट करण्यामध्ये योग्य समन्वय ठेवावा.
३) अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट करणाऱ्या रुग्णांना पॉझिटीव्ह किंवा निगेटिव्ह असल्याचा अधिकृत दाखला देण्यात यावा.